'गांधींवरचा पहिला चित्रपट तयार करण्याचं श्रेय ब्रिटिशांनाच'

विशेष म्हणजे गांधीजींबद्दल एकच एक असा मतप्रवाह किंवा विचारप्रवाह आज या देशात अस्तित्वात नाही. अनेक
'गांधींवरचा पहिला चित्रपट तयार करण्याचं श्रेय  ब्रिटिशांनाच'
Updated on

- प्रा. संदीप गिऱ्हे

गांधींसारखा एक हाडा मासाचा चालता बोलता माणूस या पृथ्वीवर होऊन गेला यावर येणाऱ्या पिढ्यांना विश्वास ठेवणे अवघड जाईल किंवा यावर येणाऱ्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत. अशा आशयाचे अल्बर्ट आईनस्टाईन यांचे गांधीजींबद्दलचे एक विधान प्रसिद्ध आहे. आपण सर्वांना सर्वसाधारणपणे हे विधान वाचून वा ऐकुन माहित असते. परंतु, अल्बर्ट आईनस्टाईन सारख्या व्यक्तीला असे का म्हणावेसे वाटले असेल याचा विचार आपण करत नाही. दुसऱ्या बाजूने गांधी हे अनुल्लेखाने मारता येईल असेही व्यक्तिमत्व नाही. विशेष म्हणजे गांधीजींबद्दल एकच एक असा मतप्रवाह किंवा विचारप्रवाह आज या देशात अस्तित्वात नाही. अनेक मतमतांतरांमधून आणि विचारांमधून गांधी आपल्या समोर येत असतात. यात प्रामुख्याने साहित्यिक आणि लिखित माध्यमाचा वाटा खूप मोठा आहे. चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी मालिका असा इतर माध्यमाचा वाटा फार कमी आहे. तर यातील चित्रपट माध्यमाबद्दल आपण आढावा घेऊ.

मोहनदास करमचंद गांधी उर्फ बापू उर्फ राष्ट्रपिता महात्मा गांधी हे सर्वार्थाने एक 'Larger Than Life' व्यक्तिमत्व. तरीही आजपर्यंत जेम तेम दहा चित्रपट गांधीजींच्या जीवनकार्यावर तयार केले गेले आहेत. त्यातही पहिले दोन मुख्य चित्रपट ब्रिटीश दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी तयार केले आहेत. या सर्व चित्रपट निर्मितीचा काळ आहे १९६३ ते २००११ पर्यंतचा. यातही स्वातंत्र्यानंतरची जवळपास ५० वर्ष एकाही भारतीयाने गांधीजींवर चित्रपट निर्मित किंवा दिग्दर्शित करण्याचा प्रयत्न केला नाही. गांधीजींच्या मृत्युनंतर १६ वर्षानं 'नाईन अवर्स टू रामा' हा चित्रपट १९६३ मध्ये मार्क रॉबसन यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन केलेला हा पहिला चित्रपट होता. त्यानंतर पुढे १९ वर्षाने रिचर्ड ऍटनबरो यांचा 'गांधी' हा निर्मिती आणि दिग्दर्शन केलेला दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला जो खऱ्या अर्थाने गांधीजींवरचा सर्वश्रेष्ठ चित्रपट मानल्या जातो. पुढे श्याम बेनेगल यांनी १९९६मध्ये 'मेकिंग ऑफ महात्मा' हा पहिला भारतीय चित्रपट दिग्दर्शित केला ज्याची निर्मिती एन. एफ. डी. सी. या केंद्रीय सरकारी चित्रपट संस्थेने केली होती.

या चित्रपटाचे कथानक मात्र गांधीजींच्या साउथ आफ्रिकेतील काळावर आधारित होते त्यात भारतातील गांधीकाळाचे संदर्भ जवळपास नव्हतेच. हा 'गांधी' या वलयावर तयार झालेला एकमेव भारतीय चित्रपट. यानंतर दशकभराने आलेला 'गांधी, माय फादर' हा गांधीजी आणि त्यांच्या मुलाच्या नातेसंबंधावर आधारित चित्रपट होता.याव्यतिरिक्त गांधीजी यांचा पात्र संदर्भ असलेले चित्रपट म्हणजे 'सरदार' १९९३ - केतन मेहता, 'जिन्ना' १९९८ - जमिला देहलवी, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' २००० - जब्बार पटेल, 'हे राम' २००० - कमल हसन, 'द लीजंड ऑफ भगतसिंग' २००३ - राजकुमार संतोषी, 'लगे रहो मुन्नाभाई' २००६ - राजकुमार हिरानी हे इतर चित्रपट. गांधी या विषयावर चित्रपट गिरीश कासारवल्ली यांचा कूर्मावतारा (२०११) हा कन्नड चित्रपट शेवटचा. एवढाच काय तो गांधीजींचा चित्रपट माध्यमाचा ऐतिहासिक संदर्भ.

सुरवातीपासूनच जगात दरवर्षी सर्वात जास्त संखेने चित्रपट तयार करणाऱ्या देशात त्या देशाच्या राष्ट्रपुरुषाची अशी कलात्मक अवहेलना होणे नक्कीच सशक्त आणि तटस्थ माध्यम व्यवसायाचे निदर्शक असू शकत नाही. गांधीजींच्या भारतातील कार्यकाळावर एकही भारतीय चित्रपट तयार होऊ नये ही गांधीजींची शोकांतिका किंवा अवहेलना नाही तर या देशातील चित्रपट माध्यमाचे वास्तव आहे. इथला चित्रपट माध्यम व्यवसाय फक्त नफेखोरीचा असून आशयाच्या व्यावसाईक मूल्यांना महत्व देणारा नाही हे वारंवार समोर येते आहे. गांधीजींबद्दलच्या चित्रपटातून व्यावसाईक नफा होणार नाही एवढा विश्वास चित्रपट निर्माता-दिग्दर्शकांना इथल्या प्रेक्षकांवर आहे म्हणून त्यांनी अशी चित्रपट निर्मिती केली नाही हे सामाजिक वास्तव आहे.

१९६२ मध्ये एका सामाजिक उपक्रमात लंडनमधील भारतीय नागरी सेवेचे अधिकारी मोतीलाल कोठारी यांची रिचर्ड ऍटनबरो यांच्याशी भेट झाली. मोतीलाल यांनी ऍटनबरो यांच्याकडे गांधीजींवर चित्रपट बनवण्याचा आग्रह धरला. ऍटनबरो यांनी गांधीजींबद्दल अगदी जुजबी, शाळेच्या मुलाएवढी माहिती आहे असे म्हणून टाळले. मोतीलाल यांनी ऍटनबरोंना गांधीजींबद्दलची अनेक पुस्तके वाचायला दिली. त्या वाचनाने एटनबरो प्रभावित झाले आणि त्यांनी चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. मात्र पुढचे काम एवढे सोपे नव्हते. ऍटनबरो यांच्या ओळखीतले कुणीही पैसे गुंतवायला तयार नव्हते. सामाजिक उपक्रमांना भरघोस देणगी देऊन ऍटनबरो यांचाही खिसा रिकामा झाला होता. मात्र गांधीजींच्या जीवनकार्य आणि विचाराने रिचर्ड एवढे प्रभावित झाले होते की त्यांना चित्रपटाचा निर्मिती खर्च कमी करण्याची निर्मात्याची अट मान्य नव्हती. त्यांनी हार मानली नाही. प्रयत्न सुरु ठेवले. तब्बल वीस वर्ष रिचर्ड हे स्वप्न साकार करण्यासाठी झटत होते. चित्रपट करण्याचे ठरविल्यानंतर त्यांनी स्वतः गांधीजींबद्दलचे वाचन सुरु केले. डी. जी. तेंडूलकर यांचे महात्मा : मोहनदास करमचंद गांधी यांचे जीवनकार्य या पुस्तकाचे आठ भाग वाचून काढले.

लुईस फिशर यांचे लाईफ ऑफ महात्मा गांधी हे पुस्तक वाचले. याच फिशर यांच्या पुस्तकातील प्रसंगावर गांधी या चित्रपटाची मूळ कथा आधारित आहे. फिशर यांचे पत्रकार म्हणून एक पात्रही चित्रपटात आहे. जे गांधी या व्यक्तिमत्वाच्या ‘Spirit’ चा अनुभव आपल्याला देतं. हे काम आपल्या आवाक्याबाहेर जातंय असं लक्षात आल्यावर ऍटनबरो यांनी तीन पटकथा लेखक चित्रपटाची कथा लिहिण्यासाठी नेमले. यासाठी लॉरेन्स ऑफ अरेबिया हा महाकाय चित्रपट लिहिणाऱ्या पटकथा लेखकाची निवड केली. १९६४ मधील पहिला ड्राफ्ट वाचल्यानंतर पंडित नेहरूंनी स्वतः खूप मोठ्या प्रमाणावर ऍटनबरो यांना मदत केली. मदत करण्याची व्यवस्था केली. पुढे अनेक ड्राफ्ट होत राहिले. इंदिरा गांधीनी आपल्या वडिलांचे स्वप्न म्हणून चित्रपटाचे भारतात चित्रीकरण करण्यासाठी पूर्ण मदत केली.

आर्थिक बाजू अजूनही भक्कम नव्हती. गोल्ड्क्रेस्ट फिल्म्सनं या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी काही आर्थिक पाठबळ दिले. ऍटनबरोयांच्या मागणीनुसार भारतात प्रत्यक्ष स्थळांवर शुटींग करण्याची परवानगी दिली. भारतात इंदिरा गांधीनी सर्व शक्ती पणाला लावली. २२ मिलियन डॉलर चित्रपटाचे पूर्ण बजेट होते, त्यातील ६.५ मिलियन डॉलर इंदिराजींनी एन.एफ.डी.सी. मधून मिळून दिले. महात्मा गांधीजींच्या अंत्ययात्रेच्या सीनच्या शुटिंग साठी चार लाख लोकांची एक्स्ट्रा कलाकारांची फौज इंदिराजींनी जमा करून दिली. त्या वेळेतील संसदेच्या अधिवेशनात या खर्चाबद्दल आणि मदतीबद्दल खूप वादळी चर्चा होत होती. परंतु इंदिराजींनी त्याकडे दुर्लक्ष करून मदत केली. पुढे चित्रपट पूर्ण झाला. पाच खंडातील वेगवेगळ्या देशातील अभिनेते. वेगवेगळ्या देशातील शुटींग आणि आर्थिक पाठबळ. ७० एम एम ची निर्मिती. सहा साऊंड ट्रॅक. खूप मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष स्थळांवर केलेले चित्रीकरण. निर्विवादपणे 'गांधी' चित्रपट म्हणून एक अजस्त्र कलानिर्मिती होती. हे एक महाकाव्याचं चित्रण होतं. या चित्रपटाला प्रतिसादही तेवढ्याच प्रमाणावर मिळाला. अकरा ऑस्कर पुरस्कारासाठी या चित्रपटाचे नामनिर्देशन झाले. त्यापैकी आठ ऑस्कर पुरस्कार या चित्रपटाने मिळवले. इतर लहान मोठ्या पुरस्कारांची तर गणतीच नाही.

संपूर्ण जगभरात या चित्रपटाने १०० मिलियन डॉलरपेक्षा जास्त व्यवसाय केला. डीव्हीडी आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर अजूनही हा चित्रपट व्यवसाय करतोच आहे. निसंशयपणे हा जगात सर्वात जास्त बघितलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. दिल्लीला मोठ्या थाटामाटात चित्रपट पहिला शो दाखवला गेला. चित्रपटाची तीन तास अकरा मिनिटांची लांबी लक्षात घेता आंतरराष्ट्रीय स्तरावर हा चित्रपट एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिला गेला हे गांधी या नावा भोवतीच्या वलयामुळेच झाले. गांधीजी हे व्यक्तीमत्व जिवंत करणारा अनुभव दिला तो गांधींची भूमिका साकारणारे अभिनेते बेन किंग्जले यांनी. त्यांच्याशिवाय गांधी या चित्रपटाची कल्पनाही करता येणार नाही. बेन हे गांधीजींची भूमिका करण्यासाठीच जन्माला आले असंही त्यांच्याबद्दल नंतर बोललं गेलं. यातील अतिशयोक्ती सोडली तर चित्रपट पाहिल्यावर हे नक्कीच पटतं. बेन गांधीजींच्या रुपात आपल्या स्मरणात कायम राहतात.

'गांधी' हा एक आगळा वेगळा दृश्यानुभव आहे. ऍटनबरोयांनी दिग्दर्शन करतांना जे कौशल्य वापरले ते वादातीत आहे. कथानक मांडण्याची शांत संयमी लय, गांधीजींची व्यक्ती आणि विचार चित्रित करातांनी केलेला फ्रेम्सचा वापर. महत्वाच्या ठिकाणी केलेला वाईड शॉटचा उपयोग. तीन तासाच्या कथानकाची गती टिकवण्यासाठी कमेरा अॅंगल आणि मोमेंट्सचा केलेला वापर. कथानक उलगडत जाण्याच्या प्रक्रियेतील महत्वाचे घटनाक्रम. हे सर्व ऍटनबरोयांची २० वर्षाची मेहनत आणि हा चित्रपट पूर्ण करण्याचा ध्यास याचा परीणाम आहे. ऍटनबरो यांनी गांधी चित्रित करण्याआधी व्यक्ती म्हणून समजून घेतले. चित्रपटामधेही त्यांनी गांधी व्यक्ती म्हणून सहज सादर केले. गांधीच्या 'Larger Than Life' व्यक्तिमत्व सादर करण्याचा मोह त्यांनी टाळला. गांधीचा प्रभाव आणि करिश्मा सांगण्याऐवजी त्यांनी गांधीजींच्या लहान लहान कृती दाखऊन त्याचा सहज परिणाम साधण्यावर भर दिला.

‘गांधी’ हे रसायन तयार होण्याचा संपूर्ण प्रवास त्यांनी रेखाटला. त्याची सुरवात त्यांनी आफ्रिकेतून केली. गांधी तयार होण्याची पहिली ठिणगी इथेच पडली होती. सुटाबुटातले गांधी इथपासून हा प्रवास सुरु होतो. तेथील लढा सुरु करून गांधी भारतात येतात. येथील रस्त्यावरच्या भारतीयांची अवस्था पाहून अस्वस्थ होतात. त्यांच्या राजकीय गुरु गोखल्यांनी देशभर फिरण्याचा दिलेला सल्ला अमलात आणतात. हा भारतभर फिरण्याचा प्रवास चित्रपटात फार सूक्ष्मपणे मांडला आहे. हाच गांधीजीच्या वैचारिक जडण घडणीचा पाया आहे असे ऍटनबरो दाखवतात. या प्रवासातून परत आल्यावर पहिल्यांदा गांधींना एका राजकीय सभेत भाषण करण्याची संधी मिळते हा प्रसंग चित्रपटात विस्तृतपणे दाखवलेला आहे. गांधींना भाषण सुरु करण्याची विनंती केली जाते. गांधीला ओळखत नसलेले आणि आधीच्या कंटाळवाण्या भाषणांनी लोक जागेवरून उठून जाऊ लागतात. गांधी मात्र आपले विचार ठामपणे मांडायला सुरवात करतात. उठून जाणाऱ्या लोकांना लक्षात येतं की हा माणूस काही वेगळ बोलतोय. हा आपल्याबद्दलच बोलतोय. लोक पुन्हा येऊन बसतात. कान देऊन ऐकतात.

त्या सामान्य माणसांची एका क्षणात गांधींशी नाळ जोडली गेली ती कायमचीच. पण हे सहज घडलं नाही. ते घडण्याची प्रक्रिया ऍटनबरोउलगडून दाखवतात. अशा एकेक प्रसंगातून ऍटनबरोंनी गांधींचे नेतृत्व कसे घडत गेले आणि त्यांना जनतेचा पाठींबा कसा मिळत गेला हे क्रमाने दाखवत नेले आहे. या सोबतच अधे मध्ये गांधी व्यक्ती म्हणून किंवा त्यांच माणूसपण दाखवणारे प्रसंग चित्रित केलेले आहेत. अशा काही प्रसंगांमध्ये गांधीजी स्वताबद्दल बोलत आहेत. हे प्रसंग लुई फिशर यांच्या पुस्तकातून घेतलेले आहेत. ते तसेच चित्रपटात चित्रित केलेले आहेत. गांधी आणि अमेरिकन पत्रकार यांच्या भेटीचे हे प्रसंग. अशाच एका प्रसंगात गांधीजी या पत्रकारासोबत संध्याकाळी पोरबंदरच्या समुद्रकिनाऱ्यावर बसून आपल्या लहानपणाबद्दल बोलत आहेत. गांधीजी सांगतात की त्यांची हिंदू म्हणून वाढ झाली असली त्यांच्या गावातील मंदिरातील पुजारी कुराणही वाचून दाखवत होते याचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला.

याच संदर्भाने एके ठिकाणी लोकांना सांगतात ‘मी हिंदू आहे, मी मुस्लीम आहे, ख्रिचन आणि ज्यू ही आहे, मी तुम्ही सर्वच आहे.’ याच संदर्भाने फाळणीच्या वेळेला गांधी जिनांना म्हणतात हिंदू आणि मुस्लीम हे या देशाचे डावा आणि उजवा डोळा आहेत, कुणी गुलाम नाही कुणी मालक नाही. त्यावर जिना उत्तर देतात की हे जग म्हणजे महात्मा गांधी नाही, मी सर्व सामान्य माणसांबद्दल बोलतोय. हा गांधी आणि इतर नेत्यांमधील विचाराचा फरकही तुलनात्मक पद्धतीने समोर येतो. फाळणीच्या काळातील एक टप्यावर जीनांच्याच घरी सुरु असलेल्या देशातील सर्व महत्वाच्या नेत्यांमधील बैठकीत गांधी समानतेचे महत्व सांगत आहेत ते आपल्या कृतीतून पटवून देण्यासाठी ते बैठकीकडे चहाचे कप घेऊन येणाऱ्या जिनाच्या घरातील नोकराला पायऱ्यावरच अडवतात, त्याच्या हातातील कप घेतात व सर्वाना स्वतःहा चहा वाटतात. असे गांधीच्या मोठेपणातले सहज पदर आणि विचारातला प्रामाणिकपणा अनेक प्रसंगात चित्रित केलेला आहे. सोबतच व्यक्ती म्हणूनही काही प्रसंग चित्रित केलेले आहेत. जसे की कस्तुरबा स्वतः स्वच्छतागृहाची साफसफाई करण्यास नकार देतात तेंव्हा गांधीजी त्याच्यावर रागावतात आणि हे काम त्यांना करावेच लागेल हे ठामपणे सांगतात. म्हणजे गांधीना रागही येतो इथपर्यंतच हा प्रसंग मर्यादित नाही. गांधी व्यक्ती, विचार आणि काळ या संदर्भाने हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

गांधी चित्रपट १९८२ मध्ये प्रदर्शित झाला. तोपर्यंत वेगवेगळ्या प्रोपगंडामधून वेगवेगळे गांधी जनमानसाच्या मानगुटीवर बसलेले होते. देशाची फाळणी करणारा गांधी, भगतसिंगांना मदत न करणारा गांधी, ५५ कोटीचे दान देणारा गांधी असे कितीतरी गांधीजी समाज जीवनात होते. स्वातंत्र्यानंतरच्या या पिढीला ऍटनबरो यांनी हे गांधी दाखवले. ते लोकांना भावले आणि या चित्रपटाला जगात सर्वत्र भरभरून प्रतिसाद मिळाला. मी जेंव्हा हा चित्रपट पहिल्यांदा पहिला तेंव्हा त्याच्या अवाढव्य रूपाने भाराऊन गेलो होतो. हळू हळू तो प्रभाव थोडा कमी झाला. मात्र चित्रपट पाहून पहिल्या वेळेस पडलेला प्रश्न अजून गंभीर झाला. २० वर्ष गांधी चितारण्याचा ध्यास केलेल्या माणसाला गांधींची चित्रकथा सांगण्याची सुरवात आणि शेवट गांधीना गोळी घालून मारणाऱ्या माणसापासून का करावीशी वाटली असेल ? ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ बद्दल मी एकूण होतो मात्र कधी पाहण्या - वाचण्याचा संबंध आला नाही. गांधी चित्रपट पाहिल्यानंतर तशी इच्छा आणि गरजही राहिली नाही. त्या गोळीने गांधी शरीराने मेले ते ऍटनबरो आणि बेन यांनी माझ्यासाठी शरीराने आणि सोबत विचाराने पुन्हा जिवंत केले. मात्र आज माझा वर्तमान पुन्हा गांधी संदर्भ घेऊन उभा आहे.

भारतीय स्वातंत्र लढ्याचे भाग म्हणून जनमानसातील गांधींची प्रतिमा पुसून टाकण्यासाठी आजच्या काळात खूप जोरकस राजकीय प्रोपगंडा राबवल्या जात आहे. गांधी म्हणजे फक्त स्वच्छतेचे पुजारी एवढीच फक्त प्रतिमा निर्मिती केली जातेय. सत्तर वर्षापूर्वी जे शरीर गोळीने मारले त्याचे विचार आता दीडशे वर्षाच्या जयंती पर्वावर झाडूने साफ करण्याची स्वच्छता मोहीम देशभर राबवली जात आहे. दुसऱ्या बाजूला स्वातंत्र लढ्यातील इतर काही निष्प्रभ व्यक्तिमत्वांना स्वातंत्र योद्धे व स्वातंत्रवीर म्हणून समोर आणले जात आहे. गांधींच्या आश्रमात जाऊन सुत कातून त्याच सुताने गांधी विचाराचा गळा घोटला जातोय.

एका शाळकरी मुलीला गांधीच्या चष्म्याचे बोधचिन्ह सुचते आणि ते तीन रंग मिसळून या स्वच्छता मोहिमेचे बोधचिन्ह बनते हा वाटायला सहज सोपा भाग. पण अगदी सामान्य माणसालाही काही वावगं वाटणार नाही आणि सर्व काही सहज सोपे वाटेल असा असणे हेच प्रोपगंडाचे पहिले उद्दिष्ट असते. या प्रोपगंडाचे परिणाम लगेच दिसणार नाहीत कदाचित. पण ते दूरगामी असतील. यातील गांभीर्य आज लक्षात येत नसेलही. पण लक्षात येईल तेंव्हा वेळ गेलेली असेल. आज माझा मुलगा अडीच वर्षाचा आहे. त्याला मी अजून वीस वर्षांनी त्याच्या जाणत्या वयात विचारले की गांधीजी कोण होते? तर माझ्या मुलाला गांधीजी कसे माहिती असतील हाच मोठा प्रश्न आहे. त्याला दाखवायला माझ्याकडे ऍटनबरोचे गांधी आहेत एवढाच काय तो दिलासा.

( या लेखाचे लेखक न्यू आर्टस, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज. अहमदनगर येथील संज्ञापन अभ्यास विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.