Ghar Banduk Biryani Review : आपण आतापर्यत बॉलीवूड, टॉलीवूडमधील अॅक्शनपट पाहिले आहेत. बॉलीवूडचा सलमान खान, आमिर खान, जॉन अब्राहम, अजय देवगण, अक्षय कुमार यांच्या रावडी आणि दबंग भूमिकांना आपण टाळ्या, शिट्टयांनी भरभरून दाद दिली आहे.
मात्र थिएटरमध्ये जेव्हा घर बंदुक बिरयानीमधल्या नागराजची जेव्हा इंट्री होते तेव्हा आपण त्याच्याकडे पाहतच राहतो. मराठीमध्ये इतक्या वर्षांनी दमदार इंट्री होणं आणि त्याला प्रेक्षकांची पसंती मिळणं हे सगळं काही नागराजच्या वाट्याला आलं आहे.
बहुचर्चित, बहुप्रतिक्षेत नागराजचा घर बंदुक बिरयानी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याच्या नावातच सगळे काही आहे. नागराजनं या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्तानं जे काही सांगितले ते तंतोतंत खरे आहे असे म्हणावे लागेल.
त्यानं प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचे निमंत्रण दिले आहे, तो तुम्हाला आवडेलच असे ठणकावूनही सांगितले आहे. घर बंदुक बिरयानी हा शेवटपर्यत प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे. नेहमीप्रमाणे याही चित्रपटाता हलगी वाजली, आणि तिनं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे.
Also Read -सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
काय आहे घर बंदुक बिरयानी?
कोलारगड महाराष्ट्रातील घनदाट जंगलातील एक ठिकाण. त्याठिकाणी असणाऱ्या काही डाकूंच्या टोळीनं पोलिसांच्या नाकीनऊ आणले आहेत. पोलिसांनी त्यांच्या माणसांना विनाकारण गोळ्या घालून ठार केल्याची त्यांची तक्रार.
त्यातच त्या टोळीचा प्रमुख पल्लम (सयाजी शिंदे) यांची आता त्या पोलिसांसोबत वैयक्तिक दुष्मनी आहे. त्याला कारणही तसेच आहे. काही झालं तरी पोलिसांना सोडायचे नाही. शरणागती तर अजिबात पत्कारायची नाही. यासगळ्यामागे कारण आहे तरी काय हे घर बंदुक बिरयानीच्या वाट्याला गेल्याशिवाय कळायचं नाही.
एका कॉलेजमध्ये त्या नाठाळ मुलांनी डोक्याला भलताच ताप दिला आहे. मुलींना बळजबरीनं रंग लावून त्यांची छेड काढण्यापर्यत़ त्यांची मजल गेली आहे. पोलिसांना देखील दाद न देणारी ती पोरं कुणालाही कसंही बोलत सुटलीये, मारहाण करताहेत. त्याचवेळी त्यांना धडा शिकवण्यासाठी एका रावडी, बेडर, पोलिसाची इंट्री होते आणि प्रेक्षकांच्या टाळ्या आणि शिट्ट्या ऐकायला येतात.
राया पाटीलनं त्यांना चांगलीच अद्दल घडवली आहे. आजवर साऊथमधील अॅक्शनपटांमध्ये थलापती विजय, विजय सेतुपती यांच्या डॅशिंग इंट्रीज आपण पाहिल्या आहेत. पण राया पाटील (नागराज मंजुळे) जेव्हा खाकी लूकमध्ये आपल्यासमोर येतो तेव्हा अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.
रायाचा प्रवास काही सोपा नाही. त्यानं ज्या मुलांवर हात उगारलाय ती भावी आमदार होणाऱ्या एका नेत्याची मुलं आहेत. त्यामुळे त्याच्यावर होणारी कारवाई, अन् रायाचा कोलारगडला हलणारा मुक्काम. हे सारं आपल्याला प्रभावित करणारं आहे.
कुठल्याही प्रामाणिक अधिकाऱ्याला त्याचे काम करताना येणाऱ्या अडचणी कशा त्रासदायक ठरतात हे नागराजनं त्याच्या शैलीत दाखवून दिले आहे. ते मात्र थेट प्रेक्षकांच्या काळजाला हात घालणारं आहे.
रायाचा कौटूंबिक संघर्ष, त्यात त्याची होणारी ओढाताण हे दिग्दर्शक हेमंत अवताडे आपल्यासमोर आणतो. त्याशिवाय येणाऱ्या काळात कोलारगड मधील जीवघेण्या संकटांना तो कसा सामोरा जाईल हे देखील ताकदीनं आपल्यासमोर मांडले आहे.
कधी विनोदी ढंगानं, तर कधी कठोर संवादानं बिरयानीचा प्रवास पुढे सरकत राहतो. पुढे काय होणार, कोणाचा विजय होणार, हे सारे प्रश्न प्रेक्षकांच्या डोक्यात पडू लागतात. दरम्यान बाकीच्या गोष्टी आपल्यासमोर येऊ लागतात.
आकाश ठोसरनं खाल्ला भाव...
आकाशनं या चित्रपटामध्ये राजू ची भूमिका साकारली आहे. एका हॉटेलमध्ये तो आचाऱ्याच्या भूमिकेत आहे. लग्न करुन गोडी गुलाबीनं संसार करण्याची त्याची इच्छा आहे.
सगळी बोलणीही झाली आहे. पण राजूची गाडी पुढे सरकायला मागत नाही. त्याला लग्नासाठी काही अटी घालण्यात आल्यात. त्या काय हे घर बंदुक बिरयानी पाहिल्याशिवाय कळणार नाही.
संगीत, संवाद, गाणी सारं काही भन्नाटच..
नागराजच्या चित्रपटातील गाणी हा नेहमीच प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय असतो. आतापर्यत त्याच्या चित्रपटातील सगळीच गाणी ही कमालीची लोकप्रिय झाली आहेत. घर बंदुक बिरयानीमधील सगळीच गाणी कडक आहेत.
थिएटरमध्ये ती जेव्हा वाजू लागतात तेव्हा तर येणारी गंमत चित्रपट पाहिल्याशिवाय अनुभवता येणार नाही. त्या गाण्यांवर झालेले चित्रिकऱण सुंदर आहे. संगीत आणि पार्श्वसंगीत यासाठी संगीतकार ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी बाजी मारली आहे.
यापूर्वी ट्रेलरमध्ये नागराजच्या तोंडून आपण आता चालच बिघडवायची आहे असा संवाद ऐकला होता. मात्र जेव्हा तुम्ही हा चित्रपट पाहता तेव्हा मात्र त्यापेक्षा वरचढ संवाद चित्रपटात आहे हे कळते.
सयाजी शिंदे, आकाश ठोसर, नागराज यांचे संवाद चित्रपटाची रंगत आणखी वाढवताना दिसतात. अभिनयाच्याबाबत सांगायचे झाल्यास सगळ्याच कलाकारांच्या भूमिका प्रभावी आहेत. यासगळ्यात निवड करायची झाल्यास सयाजी शिंदे आणि नागराज यांच्या भूमिकांनी चित्रपट वेगळ्याच उंचीवर गेला आहे.
नागराज जिंकला...
दिग्दर्शक म्हणून नागराज काय आहे हे त्यानं त्याच्या आतापर्यतच्या चित्रपटांतून दाखवून दिलं आहे. त्यानं यापूर्वी फँड्री, सैराट, नाळ आणि झुंडमधून अभियनही केला आहे.
पण पूर्णवेळ अभिनेता म्हणून त्यानं घर बंदूकमध्ये त्यानं घेतलेली उडी ही जबरदस्त आहे. मराठीमध्ये यापूर्वी अशा प्रकारची भूमिका कोणी इतक्या ताकदीनं केलेली आठवत नाही.
बिरयानी रंगली, नावं ठेवायला जागा नाही..
खरं तर नागराजच्या घर बंदुक बिरयानीला नावं ठेवायला त्यानं कुठेच जागा ठेवलेली नाही. एक दोन ठिकाणी चित्रपट थोडासा रेंगाळलेला वाटतो.
पण ती उणीव गाण्यांनी भरुन काढलेली दिसते. बाकी कथा, संवाद, अभिनय, गाणी, संगीत, संकलन आणि छायाचित्रण या साऱ्या बाबतील दिग्दर्शक हेमंत अवताडे यांची बिरयानी रंगली आहे.
चित्रपटाचे नाव - घर बंदुक बिरयानी
दिग्दर्शकाचे नाव - हेमंत अवताडे
कलाकार - नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील, दीप्ती देवी
रेटिंग - ****
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.