Scoop Trailer: हंसल मेहता यांची नवीन वेब सीरिज 'स्कूप'चा ट्रेलर सोमवारी रिलीज झाला आहे. करिश्मा तन्ना या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाचं कथानक आधारित आहे ते २०११ मध्ये पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येच्या केसवर, ज्यामध्ये पत्रकार जिग्ना वोराला आरोपी म्हणून ताब्यात घेतलं होतं.
२ मिनिटं ४६ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये हंसल मेहताची ही सीरिज सुन्न करून सोडते. कथा आणि तिला दिलेली ट्रिटमेंट अंगावर काट आणेल हे नक्की. हंसल मेहतानं आपल्या या सीरिजला जिग्ना वोराचं आयुष्य आणि कोर्टाच्या ट्रायल्स यामध्ये गुंफलेलं आहे. करिश्मा तन्नानं सीरिजमध्ये पत्रकार जागृति पाठक ही व्यक्तिरेखा साकारली आहे. जिला आपल्या सोबत काम करणाऱ्या पत्रकाराच्या हत्येसाठी आरोपी ठरवलं जातं.
स्कूप ट्रेलरची सुरुवात एका फोन कॉलने होते. बोललं जातं की जागृति पाठकसाठी कुणा नानाचा फोन आहे,दुबईहून. नाना म्हणजे छोटा राजन . जागृती क्राइम रिपोर्टर आहे. ती फक्त ७ वर्षाच्या तिच्या करिअरमध्ये डेप्युटी ब्युरो चीफ बनते. जागृतीला ओळखलं जातं ते खळबळजनक बातम्या देण्यामुळे.
जागृतीची पोलिसच नाही अंडरवर्ल्ड मध्ये देखील चांगली ओळख आहे. पण तिचं आयुष्य तेव्हा बदलतं जेव्हा तिच्यासारखाच हुशार आणि तितकाच प्रसिद्ध पत्रकार जयदेव सेन याची हत्या होते. पोलिसांच्या तपासत जागृती मुख्य आरोपी बनते. हे प्रकरण तेव्हा तापतं जेव्हा छोटा राजन फोनवर म्हणतो की त्यानं जागृतीच्या सांगण्यावरनं जयदेवला मारलं.(Hansal Mehta Scoop trailer karishma Tanna in lead web series)
हंसल मेहता ची ही सीरिज जागृतीच्या कायदेशीर लढाईवर आधारित आहे. तिचं कुटुंब आणि मित्रपरिवार तिला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मोठा संघर्ष करतात. स्कूप वेबसीरीज २ जून रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम केली जाणार आहे.
सीरिजमध्ये करिश्मा तन्ना व्यतिरिक्त मोहम्मद जीशान अयूब,हरमन बावेजा,तनिष्ठा चटर्जी,तेजस्विनी कोल्हापुरे,शिखा तलसानिया देखील सामिल आहेत. ही वेब सीरिज जिग्ना वोरा चं पुस्तक 'बिहाइंड बार्स इन भायखला:माय डेज इन प्रीजन' वर आधारित आहे. जिग्ना वोराला या केसमध्ये ६ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
जिग्ना वोरा ही एशियन एजची पत्रकार होती. मिड डे वृत्तपत्राचे पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येमध्ये दोन संशयित आरोपींपैकी ती एक होती. ११ जून २०११ ला पवई येथे हिरानंदांनी विभागात अज्ञात लोकांनी ज्योतिर्मय डे यांची हत्या केली होती. ते हत्यारे छोटा राजन गटातील असल्याचं नंतर समोर आलं. सुरवातीच्या तपासात मुंबई पोलिसांनी छोटा राजन आणि जिग्ना वोरा यांच्यावर आरोप केला. २०१६ मध्ये ही केस सीबीआयला सोपवण्यात आली होती.
तपासा दरम्यान मुंबई पोलिसांनी २५ नोव्हेंबर,२०११ रोजी जिग्ना वोराला ताब्यात घेतलं. जिग्ना त्यावेळी एशियन एज वर्तमानपत्राच्या मुंबई ब्युरोची डेप्युटी ब्युरो चीफ होती. त्यावेळी तिचं वय ३७ वर्ष होतं. तिच्यावर छोटा राजनला ज्योतिर्मय डे विषयी महत्त्वाची माहिती देण्याचा आरोप लावण्यात आला होता,ज्यामध्ये डे यांचे घर,त्यांची बाईक,लायसन्स प्लेट नंबर अशा गोष्टी सामिल होत्या.
फेब्रुवारी २०१२ मध्ये मुंबई पोलिसांनी जिग्ना वोराच्या विरोधात अनेक चार्जशीट दाखल केल्या होत्या. रिपोर्ट्सनुसार कळतंय की त्यावेळेला जिग्ना वोराच्या विरोधात मिळालेल्या पुराव्यांमध्ये तिनं छोटा राजनला तीन फोन कॉल केल्याचं समोर आलं होतं. यानंतर स्पष्ट झालं की जिग्ना वोरानं छोटा राजनला हे फोनकॉल मुलाखतीसाठी केले होते.
दुसरीकडे छोटा राजनच्या मते, जिग्ना वोरानं आपली व्यावसायिक दुश्मनी काढण्यासाठी गॅंगस्टरला ज्योतिर्मय डे ची हत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं होतं. त्यावेळी मिड डे कार्यकारी संपादक सचिन कालबाग यांनी इंडिया टुडे ला दिलेल्या मुलाखतीत छोटा राजनच्या या वक्तव्याचं खंडन केलं होतं. त्यांनी दावा केला होता की जिग्ना वोरा असं करु शकत नाही कारण त्या लेवलच्या दुश्मनीसाठी ती ज्योतिर्मय डे पेक्षा खूप ज्युनिअर होती.
जिग्ना वोराला नंतर या प्रकरणात जामीन मिळाला आणि २७ जुलै २०१२ ला तिला जेलमधून सोडण्यात आलं. पीटीआयच्या वृत्तानुसार,जिग्नाला जामीन मिळाला कारण ती सिंगल मदर होती आणि तिला आपल्या लहान मुलीला सांभाळायचं होतं.
जिग्नानं त्यानंतर या पूर्ण प्रकरणावर एक पुस्तक लिहिलं जे २०१९ मध्ये प्रकाशित करण्यात आलं. त्या पुस्तकात तिनं तुरुंगातील आपले दिवस,आणि क्राइम रिपोर्टरच्या कामासंबंधित अनेक भ्रमांचा पर्दाफाश केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.