Low Budget Movie: आजकाल सिनेमांचे बजेट पाहिले की आपले डोळे गरगर फिरतील एवढे त्याचे आकडे वारेमाप मोठे असतात. सिनेमा बनवण्यात आणि त्यातील कलाकारांना मानधन देण्यातच करोडो रुपये जातात. पण यातच आता एका अशा सिनेमाविषयी आपण जाणून घेणार आहोत, ज्याला बनवण्यासाठी एक लाख रुपयांपेक्षा कमी पैसे निर्माता-दिग्दर्शकाचे खर्च झाले. तर त्याहून गमतीशीर गोष्ट कळाली आहे या लो बजेट सिनेमाविषयी ती म्हणजे सिनेमातील कलाकारांना मानधन न देता त्याऐवजी मोमोज आणि नूडल्स खाण्यास दिले गेले होते. जेवढी इंट्रेस्टिंग सिनेमाची कथा आहे त्याहून भावूक करुन टाकणारी किंवा आपण म्हणू शकतो खूप संघर्षमय कथा सिनेमाच्या मेकिंगची आणि दिग्दर्शकाची आहे, ज्याला मुबंईत मायानगरी कडून नेहमी रिजेक्शनच मिळालं.(Indian Action Movie that was made in just 95 thousand...)
एक लाख रुपयांहून कमी बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाचं नाव आहे लोकल कुंग फू. ज्या सिनेमाला Kenny Basumatary यानं दिग्दर्शित केलं आहे. २०१३ मध्ये रिलीज झालेला हा एक आसामी भाषेतील सिनेमा होता,जो एका मार्शल आर्ट्स कॉमेडी विषयावर आधारित होता.
सिनेमाची कथा कुंग फूच्या प्राचीन कलेपासून प्रेरित होती,ज्यात अॅक्शन तर होतंच पण प्रेम आणि कॉमेडीचा तडका देखील सिनेमाला दिला होता. या सिनेमात मार्शल आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी काम केलं होतं. आणि त्यांनी कुठल्याही तांत्रिक मदतीशिवाय सिनेमातील सगळे अॅक्शन सीन परफॉर्म केले होते.
तुम्हाला कदाचित हे ऐकून आश्चर्य वाटेल की या सिनेमात काम करण्यासाठी कोणताच कलाकार तयार होत नव्हता,इतकंच काय साधी सिनेमाची कथा ऐकण्यासही कुणी तयार नव्हतं. तेव्हा केनीनं हतबल होऊन शेवटी २० लोक कसेबसे एकत्र केले आणि सिनेमा बनवला. अर्थात या लोकांचा अभिनयाशी दुरुनही संबंध नव्हता. या सिनेमाला १०० दिवसात शूट करण्यात आले होते.
केनीनं दिल्ली आयआयटी मधून शिक्षण घेतले आहे. पण त्याचं अभिनेता बनण्याचं स्वप्न होतं, तर त्यानं शिक्षण मध्येच सोडलं आणि आपलं स्वप्न पूर्ण करायला मुंबईत आला. सुरुवातीला केनीनं काही जाहिरातींमधून छोटया-मोठ्या भूमिका देखील केल्या. काही कथा लिहिल्या. पण स्वप्न दिग्दर्शक बनण्याचं होतं. आणि हाच विचार मनात ठेवून 'लोकल कुंग फू' नावाची स्क्रिप्ट लिहिली. पण केनीला बॉलीवूड कडनं निराशाच पदरी आली. कोणी त्याची साधी स्क्रिप्टही ऐकायला तयार होत नव्हतं असं त्यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं.
बॉलीवूड कडून पदरी निराशा आल्यानंतर केनी आपलं होमटाऊन असलेल्या गुवाहाटीला परत गेला. त्यानं कुटुंबाच्या मदतीनं कसेबसे ९५ हजार गोळा केले आणि सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली. त्याच्याकडे एवढे पैसे नव्हते की तो आपल्या टीमला मनाधन देऊ शकेल. आणि त्यामुळे तो आपल्या टीमला नूडल्स आणि मोमोज खाण्यास द्यायचा अन् त्याबदल्यात शूटिंग करुन घ्यायचा. त्यानंतर 'लोकल कुंग फू' सिनेमा रिलीज झाला अन् त्यानं आसाम मध्ये कमाल करुन दाखवली, IMDB वर सिनेमाचं रेटिंग ८.३ असं होतं.
या सिनेमाला २०१२ मध्ये पार पडलेल्या एशियन फिल्म फेस्टिव्हल मध्ये देखील दाखवलं गेलं होतं. सिनेमा कमाल करतोय हे पाहिल्यावर निर्माता दुर्लव बरुआनं पुढे येऊन ४ लाख रुपये सिनेमावर लावले आणि सिनेमाला योग्य पद्दतीनं डिस्ट्रिब्युट केलं. दोन वर्षानंतर 'लोकल कुंग फू' चा सीक्वेलही बनला,अन् त्यानंतर देखील सिनेमानं खूप कमाई केली. सीक्वेलच्या पोस्ट प्रॉडक्शनसाठी दिग्दर्शक केनीनं काही रक्कम जमवली आणि तेव्हा कुठे जाऊन सिनेमा तो पूर्ण शूट करु शकला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.