मुंबई : चित्रपटसृष्टीचा दिवसेंदिवस विस्तार वाढत चाललेला आहे. नवनवीन ओटीटी प्लॅटफॉर्म येत आहेत. त्याचबरोबर नवनवीन वाहिन्यांचे आगमन होत आहे. बिग बजेट आणि नावीन्यपू्र्ण प्रोजेक्टच्या घोषणा होत आहेत. दिवसेंदिवस चित्रपट निर्मितीची संख्या वाढत आहे.
एकीकडे असे चांगले चिन्ह दिसत असले तरी दुसरीकडे काहीसे निराशादायक चित्र दिसत आहे. गेल्या काही वर्षातील तब्बल चार ते साडेचार हजार चित्रपट रुपेरी पडद्याची प्रतीक्षा करीत आहेत. विविध भाषांतील हे चित्रपट प्रदर्शित न झाल्यामुळे या चित्रपटांवर गुंतविलेले कोट्यवधी रुपये वाया जाणार की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे.
भारतात चित्रपट उद्योग हा एक महत्त्वपूर्ण उद्योग मानला जातो. येथे वर्षाला विविध भाषांमध्ये हजार ते बाराशे चित्रपट बनत असतात. सरकारला या उद्योगातून चांगला महसूल मिळत असतो. वर्षाला कोट्यवधी रुपयांची उलाढाल या उद्योगातून होत असते. अनेक कुटुंबांचा चरितार्थ या उद्योगावर अवलंबून असतो. मात्र गेल्या काही वर्षातील चार ते साडेचार हजार चित्रपट आणि तेदेखील विविध भाषांतील प्रदर्शित न झाल्यामुळे या चित्रपटांवर गुंतविलेले कोट्यवधी रुपये वाया जाणार की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे.
या चित्रपटांमध्ये मराठीतील दोनशे ते अडीचशे तसेच हिंदीतील सहाशे ते सातशे चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय तमीळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, गुजराती, बंगाली, भोजपुरी, नेपाळी, हरियाणवी आदी विविध भाषांतील चित्रपटांचा समावेश आहे. यातील काही चित्रपट अर्ध्यावरच बंद पडलेले आहेत.
काही चित्रपट सेन्सॉर व्हायचे आहेत. काही चित्रपटांच्या निर्मात्यांकडे पुढील कामासाठी फंड नसल्यामुळे ते पुढे सरकलेले नाहीत तर काही मार्केटिंग आणि वितरणाअभावी रखडलेले आहेत. हे सगळे चित्रपट काही ना काही कारणास्तव रखडलेले असले तरी त्यावर गुंतविलेले कोट्यवधी रुपये पाण्यात जाणार आहेत असे चित्र आता तरी दिसत आहे. विशेष बाब म्हणजे हिंदी व मराठीतील मोठमोठ्या कलाकारांचा आणि दिग्दर्शकांचा यामध्ये समावेश आहे.
याबाबत चित्रपटाचे वितरण आणि मार्केटिंग करणाऱ्या प्राईम कम्युनिकेशन या कंपनीचे अध्यक्ष नारायण भारद्वाज म्हणाले, की सध्या द केरला स्टोरी हा चित्रपट चांगला व्यवसाय करीत आहे. दाक्षिणात्य भाषेतील चित्रपटांना सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत असली तरी तमीळ, तेलगू, कन्नड, मल्याळम या भाषांबरोबरच भारतातील अन्य विविध भाषांतील चार ते साडेचार हजार चित्रपट धूळ खात पडलेले आहेत.
यातील प्रत्येकाची व्यथा काहीशी वेगळी आहे. त्यामध्ये प्रामुख्याने चित्रपटाला पुरविला जाणारा निधी ही मोठी समस्या आहे. पुरेसा फंड न मिळाल्यामुळे हे चित्रपट रुपेरी पडद्यावर आलेले नाहीत. आजही त्यांना पुरेशा फंडची आवश्यकता आहे.
याबाबत झी स्टुडिओच्या मराठी विभागाचे वितरण प्रमुख सादिक चितळीकर म्हणाले, की कोरोनानंतर चित्रपटसृष्टीची अवस्था बिकट आहे. कित्येक चित्रपट काही ना काही कारणास्तव रखडलेले आहेत. त्यातच सध्या म्हणावा तसा प्रेक्षक वर्ग चित्रपटगृहात येत नाही. त्यामुळे निर्मातेदेखील चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस करीत नाहीत. तरीही रखडलेल्या चित्रपटांपैकी उत्तम चित्रपट प्रदर्शित होणे आवश्यक आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.