ऑन स्क्रीन : जाने जान : कलाकारांनी ‘जान’ भरल्यानं सुसह्य

सुजॉय घोष हा दिग्दर्शक आणि ‘कहानी’ हा चित्रपट एक द्वैत आहे. या चित्रपटातून सुजॉयनं निर्माण केलेल्या अपेक्षा एवढ्या प्रचंड आहेत, की त्याच्या प्रत्येक चित्रपटाची तुलना ‘कहानी’शी होते.
Jaane Jaan Movie
Jaane Jaan Moviesakal
Updated on

सुजॉय घोष हा दिग्दर्शक आणि ‘कहानी’ हा चित्रपट एक द्वैत आहे. या चित्रपटातून सुजॉयनं निर्माण केलेल्या अपेक्षा एवढ्या प्रचंड आहेत, की त्याच्या प्रत्येक चित्रपटाची तुलना ‘कहानी’शी होते आणि प्रेक्षकांच्या पदरी निराशा येते.

सुजॉयचा ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित ‘जाने जान’ हा चित्रपट तसं पाहिलं तर सर्वांगसुंदर आहे, कथा, दिग्दर्शन, करिना कपूर, जयदीप अहलावत व विजय वर्मा या तिघांचा अभिनय, लोकेशन्स, संगीत या सर्वच आघाड्यांवर तो समाधानकारक कामगिरी करतो, मात्र सुजॉयनंच निर्माण केलेल्या अपेक्षा तो पूर्ण करीत नाही, एवढीच काय ती खंत...

‘जाने जान’ची कथा पश्‍चिम बंगालमधील कलिम्पोंग इथं सुरू होते. माया डिसूझा (करिना कपूर) आपल्या १४ वर्षांच्या मुलीसह या गावात स्थायिक झाली आहे. तिचा पूर्वाश्रमीचा पती अजित म्हात्रे (सौरभ सचदेव) मोठ्या कालावधीनंतर तिला भेटायला येतो, बोलाचाली होतात आणि अजित मारला जातो.

मायाचा शेजारी टीचर ऊर्फ नरेन (जयदीप अहलावत) गणितातील संशोधक व शिक्षक आहे व मायाच्या बाबतीत घडलेली घटना पाहून तिला मदत करायचं आश्‍वासन देतो. तरुण इन्स्पेक्टर करण आनंदकडं (विजय वर्मा) या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी येते. या प्रकरणात माया ही एकमेव संशयित आहे, मात्र करणनं गोळा केलेल्या पुराव्यांवरून तिला दोषी सिद्ध करणं अशक्य बनतं.

खऱ्या खुन्यापर्यंत करण पोचतो का, नरेन आणि मायामधील नातं नेमकं काय असतं, पुरावे आपल्या बाजूनं करण्यात मायाला नक्की कोण मदत करतं अशा उत्कंठावर्धक प्रश्‍नांची उत्तरं चित्रपटाचा शेवट देतो.

चित्रपटाची कथा किगो हिगाशिने या जपानी साहित्यिकाच्या ‘द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ या कादंबरीवर बेतली आहे. कथेची सुरुवात अत्यंत वेगवान आहे. नरेनचं गणिती सूत्रांच्या मदतीनं प्रसंगांचं आकलन करणं आणि मायाला मदत करणं उत्सुकता निर्माण करतं. मात्र, एका टप्प्यानंतर तपास थोडा मागं पडून काही प्रमाणात विषयांतर होतं.

करण आणि नरेन वर्गमित्र दाखवण्यासारखा योगायोग कथेचा वेग आणि गांभीर्य कमी करतो. एका टप्प्यावर नरेननं मायाला काय टिप्स दिलेल्या असणार आणि ती कशी वाचणार याचा अंदाज प्रेक्षकांना येतोही. तरीही, शेवटपर्यंत उत्कंठा कायम ठेवण्यात व शेवटी छोटा का होईना (‘कहानी’ एवढा जोरदार नाही.) धक्का देण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरतो.

निसर्गरम्य आणि बर्फाच्छादित डोंगराळ भागातील चित्रण कथेतील गूढ आणखी वाढवतं. संगीत आणि ‘जाने जान’ या जुन्या गाण्याचा नेमका वापर कथेला पूरक.

चित्रपटातील तीन प्रमुख कलाकारांचा अभिनय कथेला उत्कंठावर्धक बनवण्यात आणि खिळवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. करिना कपूरनं आपल्या मुलीला सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या, यासाठी कोणतंही साहस करण्यास तयार असलेल्या मायाची भूमिका जबरदस्त साकारली आहे.

करणला आव्हान देणारी व त्याचवेळी नरेनची साथ घेणाऱ्या मायाच्या मानसिकतेतील अनेक छोटे पैलू तिनं जोरकसपणे उभे केले आहेत. जयदीप अहलावतनं साकारलेला नरेन ए-वन. मायावर मनातून प्रेम करणारा, मात्र ते व्यक्त न करणारा, तरुण दिसण्यासाठी सतत प्रयत्न करणारा, मायाला मदत करण्यासाठी अनेक त्याग करणारा नरेन साकारताना त्यानं अनुभव पणास लावला आहे.

विजय वर्मा ‘ओटीटी’वरील अनेक चित्रपट व वेब सिरीजमध्ये दर्शन देत असतो. त्यानं साकारलेला करण जोरदार. एकंदरीतच, अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेल्या कथेमध्ये कलाकारांनी ‘जान’ भरल्यामुळं हा चित्रपट सुसह्य झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.