Jaya Jaya Jaya Jaya Hey Review family drama commedy : राजेशची आई तर जयाच्या घरच्यांना सांगते की, तो खूप लाजरा आहे. भोळा आहे. त्याच्या तर नाकावरची माशीही उडत नाही. एवढा तो साधा आहे. जयाचे घरचे त्याला भाळतात. बरं पोराकडचे एकही रुपया न घेता मुलीच्या लग्नाला तयार आहे म्हटल्यावर आणखी काय हवं. हे म्हणजे सोने पे सुहागा असचं होतं. पण....
सध्या डिझ्नी हॉटस्टार वर जया जया जया जया है नावाचा साऊथचा चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. या विनोदीपटातून आपली विवाहसंस्था, पुरुषसत्ताक पद्धती यावर जे मार्मिक भाष्य करण्यात आले आहे. ते खरचं कौतूकास्पद आहे. विनोदाची पेरणी करत जया आणि राजेशचा संसार कसा चालला आहे हे दिग्दर्शकांनं प्रभावीपणे आपल्यासमोर मांडले आहे.
Also Read - आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....
प्रेक्षकांना दिग्दर्शक विपिन दासचा हा चित्रपट भावला आहे. आता तर हिंदी, मराठी चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रेटींनी देखील जया जया जया जय है चे तोंडभरून कौतूक केले आहे. त्यांना विषय भावला आहे. काहींनी तर त्यांच्या सोशल मीडिया स्टेटसवर या चित्रपटाचे डीपी ठेवले आहे. आयएमडीबीनं देखील त्याला चांगले रेटिंग दिले आहे. जया आणि राजेशच्या संसारात जेव्हा राजेशचा अहंभाव डोकावू लागतो तेव्हा काय घडतं हे सारं गंमतीशीर आहे.
जया पहिल्यांदा तिच्या शिक्षकाच्या प्रेमात पडते. प्रत्येक मुलीच्या मनात आपल्या होणाऱ्या राजकुमाराची जी स्वप्नं असतात तशी ती जयाची देखील आहेत. मात्र थोड्याच दिवसांत तिला त्या शिक्षकाचं खरं रुप कळतं आणि ती त्याच्यापासून लांब होते. तो ही टिपिकल पुरुषी धाक दाखवणारा, हे नको करु, ते नको करु, मोबाईलवर एवढा वेळ नको बोलू...अशा छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष घालणारा. जयाला हे सहन होत नाही. ती निर्णय घेऊन मोकळी होते.
असाच अंतिम निर्णय ती राजेशच्या बाबतीतही घेते. अनेकांनी ती दरवेळी टोकाचे पाऊल उचलणारी वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण राजेशचं तिच्यासोबतचं वागणं दिग्दर्शकानं इतक्या प्रभावीपणे आपल्यासमोर सादर केले आहे की, त्यामुळे जयाची कृती समर्थनीय वाटू लागते. लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे गोड दिवस सरले की, राजेशचा खरा चेहरा समोर येतो.
जयाला मोठा धक्का बसतो, याच्या घरच्यांनी आपल्यासमोर त्याची जी प्रतिमा उभी केली त्यापेक्षा हा किती वेगळा आहे हे कळून चुकते. जया मोबाईलमध्ये सारखं काही ना काही शोधत असते. तिच्या नवऱ्याला प्रश्न पडतो ही दिवसभर मोबाईलमध्ये काय पाहत असते, काय शोधते, तो प्रसंग पाहिल्यानंतर मग मात्र प्रेक्षकांना मोठा धक्का बसतो...आणि राजेश -जयाच्या संघर्षाला सुरुवात होते.
तुम्हाला कदाचित आठवत असेल तर यापूर्वी टॉलीवूडचा द ग्रेट इंडियन किचन नावाचा चित्रपट होता. त्यामध्ये देखील दिवसरात्र पती, सासरच्या मंडळींना खाऊ पिऊ घालणाऱ्या नायिकेची व्यथा मांडण्यात आली होती. चुल आणि मूल यापलीकडे स्त्रियांना त्यांची स्वप्नं आहेत की नाही, त्यांना त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही या गोष्टींवर चित्रपटामध्ये मांडणी करण्यात आली होती. तो चित्रपट देखील प्रेक्षकांना भावला होता.
जया आणि राजेश जेव्हा न्यायधीशांसमोर उभे राहतात तेव्हाचा प्रसंग खूप काही सांगून जाणारा आहे. न्यायाधीश राजेशला तुझ्या लेखी संसाराची व्याख्या काय असे विचारतात तेव्हाचे त्याचे उत्तर चक्रावून टाकणारे आहे. त्यानंतर जया जो निर्णय घेते ते पाहून आपणही नकळत तिच्या पाठीशी उभे राहतो. दिग्दर्शकानं हे सारं विनोदाच्या माध्यमातून प्रभावीपणे आपल्यासमोर उभे केले आहे. त्यामुळेच हा चित्रपट इतर चित्रपटांपेक्षा वेगळा ठरतो.
चित्रपटाचे नाव - जया जया जया जया है...
कलाकार - दर्शना राजेंद्रन, बसिल जोसेफ, आनंद मनमधान, नोबी मार्कोस
दिग्दर्शक - विपिन दास
लेखक - विपिन दास, नाशिद मोहम्मद फामी आणि अजित कुमार
रेटिंग - **** चार स्टार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.