Kabir Bedi News: कबीर बेदी हे भारतीय मनोरंजन विश्वातील उत्कृष्ट दिग्दर्शक - अभिनेते. कबीर यांनी आजवर विविध सिनेमांच्या माध्यमातुन लोकांचं मनोरंजन केलंय. नुकताच कबीर यांना इटलीतील सर्वोच्च नागरी सन्मान मिळालाय.
मुंबईतील गेटवे ऑफ इंडियासमोर झालेल्या एका खाजगी समारंभात अभिनेते कबीर बेदी यांना "ऑर्डर ऑफ मेरिट ऑफ द इटालियन रिपब्लिक" (मेरिटो डेला रिपब्लिका इटालियाना) या सर्वात उच्च दर्जाच्या इटालियन नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या समारंभानंतर गायक - संगीतकार निकोलो फॅबी यांनी एक खास लाईव्ह म्युझिकल परफॉर्मन्स दिला. ज्यामुळे या समारंभाला चार चॉंद लागले.
कबीर बेदी म्हणाले, "ऑर्डर ऑफ मेरिट, इटलीचा सर्वोच्च सन्मान मिळणे हा माझ्यासाठी खूप भावनिक पुरस्कार आहे. त्यांनी मला बारा वर्षांपूर्वी दिलेल्या कॅव्हॅलियर (नाइट) पेक्षाही हा सर्वोच्च सन्मान दिला होता. या सन्मानाबद्दल पंतप्रधान मेलोनी आणि मला खूप आनंद झाला. आता इटली आणि भारतातील महान चित्रपट उद्योगांनी जागतिक स्तरावर एकत्र चित्रपट बनवण्याची वेळ आली आहे."
इटलीचे कौन्सुल जनरल अॅलेसॅंड्रो डी मासी यांनी आपल्या भाषणात इटलीचे राष्ट्राध्यक्ष मॅटारेला यांचं मनोगत वाचून दाखवले. ते म्हणतात, "कबीर बेदी... गेल्या 30 वर्षांपासून मानवतावादी आणि कलात्मक गोष्टींद्वारे इटलीशी जोडलेले आहेत."
इटलीचे कौन्सुल जनरल अॅलेसॅंड्रो डी मासी म्हणाले, “गेली अनेक वर्ष कबीर भारत आणि इटली यांच्यातील चांगले संबंध वाढवण्यासाठी चांगली भूमिका बजावत आहेत. त्यांची लोकप्रियता इटालियनच्या सर्व पिढ्यांमध्ये पसरलेली आहे. त्यामुळेच इटलीच्या राष्ट्रपतींनी त्यांना ऑर्डर ऑफ मेरिट हा इटलीचा सर्वोच्च सन्मान देण्याचा निर्णय घेतला आहे. कबीर आमच्या सर्व इटालियन लोकांसाठी खूप खास आहे. कबीर हा इटलीचा खरा मित्र आहे आणि त्याचे इटलीशी घट्ट नाते आहे.