Kiran Mane: गेली काही दिवस किरण माने बरेच चर्चेत आहेत, सुरवातीला वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे किरण माने सध्या बिग बॉस मुळे वेगळ्या अर्थाने चर्चेत आले. आपल्या स्वभावाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळंच स्थान निर्माण केलं.
किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सातत्याने ते काहीना काही पोस्ट करत असतात. आज त्यांनी एक पोस्ट करत त्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव सांगितला आहे.
किरण माने यांनी आपल्या करियरच्या सुरुवातीला नाटक पाहण्यासाठी केलेली धडपड, त्यातून उमगत गेलेल्या गोष्टी आणि हातात आलेलं एक मोठं यश.. असा प्रवास त्यांनी मांडला आहे. त्यातील समीक्षकांनी त्यांच्यावर केलेला कौतुकाचा वर्षाव विशेष लक्ष वेधून घेतो.
(kiran mane shared post about his marathi drama play ti geli tevha inspired by actor saurabh shukla)
किरण माने यांनी लिहिलं आहे की, "किरण्या, तिकीट का काढलंस? लै श्रीमंत झालास का?" असं म्हणत किशोर कदमनं माझ्या खिशात शंभर रूपये कोंबले... सत्तावीस वर्षांपूर्वी, 'स्ट्रगल'च्या त्याकाळात, शंभर रूपये खूप मोठ्ठे होते माझ्यासाठी.. मला नाटकाची नाईट ऐंशी रूपये मिळत होती ! तरीही पृथ्वी थिएटरवर जाऊन एक हिंदी दीर्घांक पहाण्यासाठी मी तिकीट काढलंवतं...''
'प्रयोग सुरू झाला.. आणि त्या अभिनेत्याचा भन्नाट परफाॅर्मन्स पाहून अक्षरश: खुर्चीला खिळून गेलो... तासाभराच्या त्या अद्भूत अभिनयाच्या आविष्कारानं मना-मेंदूवर कब्जा केला... त्या दीर्घांकाचं नांव होतं 'पियानो बिकाऊ है' आणि तो अभिनेता होता सौरभ शुक्ला !'
'...नंतर माझा मित्र प्रसाद वनारसे यानं त्याच दीर्घांकाचं मराठीकरण केलं-'हॅलो'. अस्सल मराठमोळं वाटावं इतकं भन्नाट लिहीलंवतं त्यानं. ते स्क्रीप्ट मी घरी एकटाच वाचत बसायचो. घरातल्या घरात परफाॅर्मन्सही सुरू केले.. त्यानंतर हळूहळू या गोष्टीला पंधरा सोळा वर्ष उलटून गेली.'
''तोपर्यन्त इकडे यथावकाश माझी व्यावसायिक नाटकातल्या करीयरची गाडी रूळावर आली होती. एक दिवस गडकरी रंगायतनमधल्या व्हिआयपी रूममध्ये लताबाईंना मी 'हॅलो'चा परफाॅर्मन्स करुन दाखवला. त्यांना लैच आवडला. म्हणाल्या, "यावर तू दोन अंकी नाटक लिही. मी प्रोड्यूस करते."
''सातारला माझा दोस्त झाकीरच्या घरी राजीव मुळ्ये आणि मी, दोघांनी अनेक चर्चा करुन पंधरा दिवसांत दोन अंकी नाटक लिहीले. बघता-बघता 'श्रीचिंतामणी'तर्फे हे नाटक रंगभुमीवर आलंही.. नाटकाचं नांव होतं 'ती गेली तेव्हा' !''
''अभिनेता म्हणून हे लै लै लैच मोठ्ठं चॅलेंज होतं... सव्वादोन तास पूर्णवेळ मी स्टेजवर - आठ वेगवेगळ्या भूमिका.. वेगळी बेअरिंग्ज,भिन्न आवाज.. एकही 'ब्लॅकआऊट' नाही... सगळा कस पणाला लावणारं नाटक.''
''मध्येमध्ये चार-पाच पात्रंही पेरली होती. नाटक थोडं आडवळणाचं असल्यामुळं मीच दिग्दर्शन करायचं ठरवलं.. हिराॅईन योगिनी चौक होती. रोहीत चव्हाण, अजिंक्य ननावरे या सातार्यातल्या माझ्या ग्रुपमधल्या कलाकारांनाही मी संधी दिली.''
''या नाटकानं अभिनेता म्हणून माझा आत्मविश्वास एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला ! लोकसत्ताचे रविंद्र पाथरे यांनी अर्धा पान भरून लिहीलं. "किरण माने यांची आवाजावरची हुकुमत अलिकडच्या काळात कुठल्याच अभिनेत्यात नाही." असंही लिहीलं.. तर म.टा.च्या जयंत पवार यांनी 'एक भक्कम नट' अशी भलीमोठी हेडलाईन दिली ! ठाण्याच्या मधुकर मुळुकांनी लिहीलं, 'मराठी रंगभुमीला काशीनाथ घाणेकर मिळाले'.''
''आज मागं वळून पहाताना जाणवतं.. एका अफलातून अभिनेत्याच्या परफाॅर्मन्सपासून मिळालेली प्रेरणा आपल्याला कुठून कुठपर्यन्त घेऊन जाते ! लब्यू सौरभजी.'' अशा शब्दात किरण माने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.