Kiran Mane Post News: अभिनेते किरण माने यांनी काहीच दिवसांपुर्वी शिवबंधन बांधत शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. किरण माने सोशल मीडियावर विविध विषयांवर लिहीत असतात.
अशातच मानेंनी नुकतंच सोशल मीडियावर प्रबोधनकार ठाकरे, कर्मवीर भाऊराव पाटील आणि शाहू महाराज यांच्या कार्याची महती सांगणारा एक किस्सा सांगितला आहे. तो सर्वांनी वाचावा असा आहे.!
(kiran mane shared special post of shahu maharaj prabodhankar thackeray karmaveer bhaurao patil)
किरण माने लिहीतात, "तुम्ही जर शिवाजी कॉलेजला माझे नांव देणार असाल तर मी तुम्हाला दोन लाख रुपये देणगी देतो" खान्देशातल्या एका श्रीमंत माणसानं कर्मवीर भाऊराव पाटील यांना निरोप पाठवला. रयत शिक्षण संस्थेला त्यावेळी लै गरज होती पैशांची. कर्मवीर मदतीसाठी शोध घेत होते. दोन लाखांची तूट भरून काढायची होती.
एका सेकंदाचाही विचार न करता कर्मवीरांनी त्या पैसेवाल्याला उत्तर पाठवलं, "एकवेळ मी माझ्या जन्मदात्या बापाचं नाव बदलेन, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कदापीही बदलणार नाही. तुमची देणगी गेली उडत. काय खतरनाक माणसं होती राव आपली !"
किरण माने पुढे लिहीतात, "कुणीतरी कर्मवीरांना या विषयावर विचारलं असता ते म्हणाले, "हा बाणेदारपणा मी माझ्या एका गुरूकडनं घेतला. तो गुरू म्हणजे प्रबोधनकार ठाकरे !"
लै भारी गोष्टय प्रबोधनकारांची. प्रबोधनकारांनी नुकतीच सरकारी नोकरी सोडली होती. कारण नोकरी सांभाळत दूसरीकडं बहुजन समाजाच्या जागृतीचं कार्य..व्याख्यानं..पुस्तकं लिहीणं.. त्यातनं सरकारी धोरणांवर टीका... लै ओढाताण होत होती. दिली सोडून नोकरी. बहुजनांच्या सेवेचं काम सुरू केलं. पण पोटापाण्याचं काय? मग टांग्यांना कलर देणं, दुकानाचे बोर्ड रंगवणं... बुक बाईंडींगपास्नं पत्र्याचे डबे तयार करण्यापर्यन्त वाट्टेल ते केलं त्यांनी. बोर्ड रंगवताना वर्चस्ववादी बघे मुद्दाम गर्दी करायचे, "हे बघा बहुजन समाजाचे उद्धारक. पैसा कमावण्यासाठी काय वेळ आली बघा ठाकर्यांवर." असं ट्रोलिंग करत ते फिदीफिदी हसायचे. हल्ली फेसबुकवर ट्रोल पिलावळ असते बघा. त्यांचेच हे बापजादे.
...हे सगळं शाहू महाराजांना कळलं. त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंना मदत म्हनून ५००० रूपयांचा चेक पाठवला. तो घेऊन गेलेल्या माणसाच्या अंगावर चेक फेकून प्रबोधनकार कडाडले, "असल्या भिकेवर थुंकतो मी. जा घेऊन. असल्या रकमा फेकून महाराज माणसं विकत घेत असतील, तर त्यांच्याविषयी माझा आदर ओहोटीला लागला. सांगा जाऊन त्यांना."
किरण माने शेवटी लिहीतात त्यानंतर समक्ष भेटून शाहूमहाराज म्हणाले, "काय रं वांड. लै गुर्मी आली व्हय? आमच्या चेकवर थुंकतो तू?" त्यावर नम्रपणे प्रबोधनकार म्हणाले, "माफ करा सरकार, पैशाच्या जोरावर तुमची ओझी वहाणारा गाढव बनणं मला मंजूर नाही." दोघंबी खळखळून हसले. कारण पूर्वी कधीतरी शाहूमहाराज ठाकरेंना म्हणालेवते, "पैसा बघून अनेक माणसांची गाढवं झालेली मी बघितली आहेत."
...त्यानंतर छत्रपतींनी अतिशय नम्रपणे प्रबोधनकारांना पुस्तक छपाईसाठी ५००० रूपयाची देणगी दिली. एवढंच नाही, तर त्या पुस्तकांच्या २००० प्रती स्वतः संस्थांनासाठी खरेदी केल्या.
अशी आपली माणसं.. आणि असे एकेक प्रेरणादायी किस्से ! वाचून मन भरून येतं. विचारधारेसाठी पैसा कमावण्याचे रूढ मार्ग नाकारणार्यांना पैशांची चणचण भासतेच हो. चांगल्या कामासाठी कुणी देऊ केले तर स्विकारावे लागतात. पण त्यापोटी कुणी आपल्याला गृहीत धरत असेल.. लाचार समजत असेल.. तर मात्र न डरता त्याला त्याची जागा दाखवून द्यायलाच पायजे. ज्या महामानवांच्या विचारांचा वारसा सांगू पहातोय, त्यांच्यातलं एक टक्का जरी सत्त्व आपल्यात आलं तरी धन्य होऊ !
प्रबोधनकार ठाकरे आणि कर्मवीरअण्णांच्या बाणेदारपणाला आणि तत्त्वनिष्ठेला सलाम...कडकडीत सलाम."
किरण मानेंच्या या पोस्टवर लोकांनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव करत पसंती दर्शवली आहे. अभिनय क्षेत्रात सक्रीय असणारे माने राजकीय क्षेत्र कसं गाजवणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.