kishor kumar: आजही गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे ज्यांच्या गाण्याचे सूर ऐकू येत असतात, अशा दैवी आवाजाच्या किशोर कुमार यांचा आज स्मृती दिन. अवघ्या 57 व्या वर्षी जगाचा निरोप घेणारे किशोर दा अत्यंत कमी वयात प्रचंड मोठी कामगिरी करून गेले. त्यांचे संगीतक्षेत्रातील योगदान हे केवळ दखल घेण्याजोगे नाही तर पुढच्या कित्येक पिढ्यांना मार्गदर्शन करणारे आहे. संगीतासोबत अभिनयातही आपले नाव ठसठशीत कोरणाऱ्या किशोरदांनी कधीही कुठेही संगीताचे अधिकृत प्रशिक्षण घेतले नाही. यावर विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. म्हणूनच जाणून घेऊया त्यांच्या सांगीतिक प्रवासाविषयी..
किशोर कुमार यांचे खरे नाव आभास कुमार. त्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 रोजी मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात झाला. सुरवातीला त्यांच्या आवाजाची जादू कुणालाच ठाऊक नव्हती, कारण त्यांनी अभिनेता म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. ‘शिकारी’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली तर 1948 मध्ये आलेल्या 'बॉम्बे टॉकीज' चित्रपटात किशोर कुमार यांनी पार्श्वगायक म्हणून पहिले गाणे गायले. हा आवाज त्यांनी 'देवानंद' यांच्यासाठी दिला होता, पुढे देवानंद यांच्या बहुसंख्य गाण्यांना किशोर कुमार यांचाच आवाज देण्यात आला.
बघता बघता त्यांचा आवाज लोकांना एवढा भावला की गायक म्हणून पुढे येऊ लागले. 'हाफ तिकीट' चित्रपटातील 'आके सीधे लगी दिल पे जैसी कटारिया' या गाण्याचा हा किस्सा खूप प्रसिद्ध आहे. चित्रपटातील हे गाणे किशोर कुमार (Kishore Kumar) आणि लता मंगेशकर यांना एकत्र रेकॉर्ड करायचे होते. परंतु, काही कारणास्तव लतादीदी हे गाणे रेकॉर्डिंग करू शकल्या नाहीत. यावेळी किशोर कुमार म्हणाले की, मी एकदा हे गाणे दोन आवाजात गाण्याचा प्रयत्न करून पाहतो. त्यानंतर त्यांनी हे गाणे पुरुष आणि महिला अशा दोन्ही आवाजात रेकॉर्ड केले. एका टेकमध्ये फायनल झालेले हे गाणे पुढे सुपरहिट झाले.
किशोर कुमार यांनी त्यांच्या कारकिर्दीत सर्व भाषांमध्ये तब्बल 2000हून अधिक गाणी गायली तर जवळपास 80हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. गायन आणि अभिनयासोबतच लेखन, चित्रपट निर्मितीही केली. त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीत त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची कला ही दैवी होती. म्हणूनच त्यांचा आवाज कायम अजरामर राहिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.