वर्तमानातील आयुष्यावर भूतकाळातील घटना-घडामोडींनी काय परिणाम केले, ही मानवी स्वभावाला बोचणारी जखम असते. त्याची सल रुतत असते, प्रत्येकालाच वेगवेगळ्या वळणावर.
नाटकाची गोष्ट अनेक प्रश्नांचा गुंता तयार करते. हा गुंता भावभावनांचा, नातेसबंधांचा, भावस्पर्शी प्रेमाचा, सरलेल्या आठवणींचा आणि भविष्याचाही आहे. एकमेकांवर प्रेम करणारी माणसं कधीकधी दूर जातात आणि पुन्हा जवळ आल्यावर नव्याने फुलायलाही लागतात. या फुलण्याचा सुगंधही नाटकभर दरवळत राहतो.
वर्तमानातील आयुष्यावर भूतकाळातील घटना-घडामोडींनी काय परिणाम केले, ही मानवी स्वभावाला बोचणारी जखम असते. त्याची सल रुतत असते, प्रत्येकालाच वेगवेगळ्या वळणावर. जशा जखमा असतात, तशाच आयुष्यभर कुरवाळत बसावे, असे आनंदाचे क्षणही असतातच. अशाच काही सुख-दु:खांची बेरीज-वजाबाकी करून आयुष्याचा वर्तमान साजरा करता येईल का, याचा वेध घेणारे ‘मी, स्वरा आणि ते दोघं’. शीर्षकातील ‘स्वरा’च्या आधी ‘मी’ आणि अखेरचे ‘ते दोघं’ नक्की कोण, या प्रश्नाची ‘स्वरां’कित गुंतागुंत विचार करायला लावणारी आहे.
‘तुझी माझी ही जुनी कहाणी...’ या शीर्षकगीताने पडदा उघडल्यानंतर दिसते एक नीटनेटकी मांडणी केलेले मंजूषा रानडे यांचे प्रशस्त घर. तिथे असतात पन्नाशीच्या आसपासचे यशवंत पाटील. क्षणभराने मंजूषा कॉफी घेऊन येते आणि त्यांच्यातील नात्याची उकल होते. दोघांची कॉलेजपासूनची मैत्री. मंजूषाच्या वडिलांच्या कर्मठ स्वभावामुळे त्या मैत्रीचे रूपांतर लग्नात होऊ शकले नाही. मंजूषाच्या पतीचे आणि यशवंतच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर वयाच्या पन्नाशीत या दोघांचे पुन्हा सूर जुळतात आणि लग्न करण्याचा विचार करतात. दुसरीकडे स्वरा. आधी प्रियकराकडून फसलेली आणि नंतर लग्न होऊन संसार मोडल्याने दु:खी. सुशिक्षित आहे; पण आयुष्यातल्या दोन धक्क्यांनी खचलेली. नोकरी करते. तिचा कार्यालयीन सहकारी कपिल ओक याच्याशी ती मनमोकळेपणाने बोलते. त्यामुळे ती सावरत असल्याचा मंजूषाला आनंद आहे. स्वरा-कपिलचे लग्न व्हावे, असेही तिला वाटते; पण स्वरा या विषयापासून अलिप्त आहे. एक दिवस मंजूषा एकेकटे राहणारे यशवंत पाटील आणि कपिलला घरात बोलावून घेते आणि ‘लिव्ह इन’चा सर्वांसमोर प्रस्ताव ठेवते. आपण चौघांनीही या घरात सोबत राहायचे आणि एकमेकांना ओळखून घेतल्यानंतर पुढचा निर्णय घ्यायचा... या प्लॅनवर प्रचंड मतभेद होऊन, नाटक कुठल्या वळणावर जाते याची उत्सुकता वाढवणारा हा प्रयोग आहे.
वेगवेगळ्या भूमिकांमधून मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा समृद्ध ठसा उमटवणाऱ्या रंगकर्मी निवेदिता सराफ या नाटकात स्वराची आई (मंजूषा) आहेत. हे नाटक घडवण्यात आणि रंजकपणे पुढे नेण्यात मंजूषा ही या नाटकातील महत्त्वाची व्यक्तिरेखा. निवेदिता सराफ यांनी ती अभिनयाच्या सामर्थ्यावर अपूर्व सहजतेने सर्वांग सुंदर साकारली आहे. रश्मी अनपटने (स्वरा) या नाटकाचा विषय स्वत:भोवती गुंफून घेण्यास जराही कसर सोडली नाही. व्यक्तिरेखेच्या आयुष्यात आलेल्या अनेकविध भावनिक संघर्षाची तार जुळवताना रश्मीने ती स्वरांकित केली आहे. नाटकाची गोष्ट ट्विस्ट करणाऱ्या कपिलची भूमिका सुयश टिळकने यथोचित साकारली आहे. रंगमंचावर सुयशचा मुक्तसंचारही लक्षवेधी. व्यक्तिरेखेनुसार त्याच्यातला पुणेकरी अस्सलपणा भाव खाणारा आहे. यशवंत पाटीलच्या भूमिकेतून विजय पटवर्धन यांनी नाटकासाठी ओपनिंग बॅटिंग केली. अर्थात सुरुवातीला सावध खेळून नाटकाला हळूवार रंजक करण्यात त्यांचाही मोलाचा वाटा आहे.
स्वराची आई, स्वरा आणि ते दोघं म्हणजे कपिल आणि यशवंत, अशा रंगमंचावर प्रत्यक्षात दिसणाऱ्या चार पात्रांचा हा रंगव्यवहार असावा, असे वाटण्याचा फक्त आभास आहे. कारण नाट्यगोष्टीला प्रभावित करणाऱ्या आणखी दोन व्यक्तिरेखा आहेत, ज्या रंगमंचावर येतच नाहीत. त्यांचा उल्लेख स्वराच्या नातेसंबंधाशी जोडला आहे. दिसत नसल्या तरी त्यांचे स्वभावचित्रण खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे शीर्षकात असलेले ‘ते दोघं’ तेच असावेत का, असाही भास हे नाटक रसिकमनात तयार करते. मानवी स्वभावानुसार प्रत्येकालाच आपण स्वत:कडे लक्ष न देता इतरांसाठी जगलो आहोत, असे वाटत असते. स्वत:साठी जगायचे म्हणजे नेमके काय असते? की तोही फक्त वर्तमानातील आभासच असतो?
नाटक हे भासआभासाच्या अथांग अवकाशात खेळले जाते. नाटकाचे शीर्षक आणि व्यक्तिरेखांच्या नातेसंबंधातून ही अथांगता नाटकाचे लेखक आदित्य मोडक यांच्यासह दिग्दर्शक नितीश पाटणकर आणि मयुरेश केळुसकर यांच्या दिग्दर्शन साहाय्याने शोधली आहे. स्पृहा जोशीच्या भावस्पर्शी गीतांना प्रियांका बर्वे, शुभांगी कुलकर्णी, रोहित राऊतने स्वरांकित करून ती तेवढ्याच खोलवर रुजवली आहे. चंद्रकांत लोकरे यांनी निर्मिलेल्या या नाटकाचे सूत्रधार गोट्या सावंत असून, संगीत (सारंग कुलकर्णी), नेपथ्य (संदेश बेंद्रे), प्रकाशयोजना (शीतल तळपदे) हे सारे प्रयोगमूल्य सरस करण्यासाठी महत्त्वाचे ठरले आहे.
मंजूषा आणि यशवंत या व्यक्तिरेखांनी केलेला नव्वदच्या दशकातील आठव एक संचित आहे. त्यावेळेस अनेकांना आवडणारे बोरकूट, ‘कयामत से कयामत तक’चा संदर्भ त्या काळात घेऊन जातात. ‘लग्न झाल्यानंतर आयुष्य जगणं कमी आणि घालवणं जास्त’, असे काही संवादही मंजूषाच्या मनातली सल अधोरेखित करतात. मात्र मुलीचा मोबाईल अन्लॉक करणे, त्यातले मेसेज वाचणे हे नाटकात सहजपणे घडत असले, तरी तो गुन्हा आहे. कधीकधी त्याचे ओरखडे आजच्या पिढीतील तरुणाईवर आघात करणारे असू शकतात.
एकंदरीत, गोष्ट एक असली तरी समाजमनाला सावध करणारे अनेक धागे या नाटकात गुंफले आहेत. आयुष्यातला आनंद मिळवण्यासाठी लोक काय म्हणतील, या प्रश्नात अडकायचे की बिनधास्त जगायचे, अशा काही प्रश्नांची गुंतागुंत प्रयोगानंतरही रसिकमनावर राज्य करते.
mahendra.suke@esakal.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.