ऑन स्क्रीन : अफवाह : डोळे उघडणारा पॉलिटिकल ड्रामा

देशात सोशल मीडियानं पाय रोवले आणि अफवा या शब्दाचे आयाम पूर्णपणे बदलून गेले. सत्ता, पैसा व ताकद असलेले गट या माध्यमाच्या जोरावर एखादी घटना लोकांपर्यंत त्यांना हवी तशा पद्धतीनं पोचवण्यात यशस्वी होऊ लागले.
afwaah movie
afwaah moviesakal
Updated on

देशात सोशल मीडियानं पाय रोवले आणि अफवा या शब्दाचे आयाम पूर्णपणे बदलून गेले. सत्ता, पैसा व ताकद असलेले गट या माध्यमाच्या जोरावर एखादी घटना लोकांपर्यंत त्यांना हवी तशा पद्धतीनं पोचवण्यात यशस्वी होऊ लागले. त्यातून गोहत्या, लव्ह जिहाद, लिन्चिंगसारख्या घटनांना हवा तसा रंग देण्याचा जमाना सुरू झाला.

सुधीर मिश्रा या जाणत्या दिग्दर्शकानं या सर्वांचा लेखाजोखा ‘अफवाह’ या चित्रपटातून मांडत प्रेक्षकांना आरसा दाखवण्याचं काम केलं आहे. ‘तुम्ही स्वतःला प्रश्‍न विचारणार आहात की नाही?’ असा रोकडा सवाल दिग्दर्शक चित्रपटभर उपस्थित करीत तुम्हाला ‘गाढव’ बनण्यापासून वाचवू पाहतो. नेमकी कथा, संकलन, अभिनय यांच्या जोरावर चित्रपट प्रेक्षकांना किमान विचार करायला भाग पाडण्यात यशस्वी ठरतो.

‘अफवाह’ची कथा राजस्थानमधील एका छोट्या गावात सुरू होते. निवडणुकांच्या तोंडावर गावातील राजकारण टिपेवर पोचलं आहे. विकी बना (सुमीत व्यास) सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळवू पाहतो व त्यासाठी त्याला चंदन (शारिब हाश्‍मी) या आपल्याच भावाचा काटा काढणं गरजेचं ठरतं. त्याची होणारी पत्नी निवेदिताला (भूमी पेडणेकर) हा प्लॅन समजतो व ती विकीला सोडून जायच्या तयारीत असते.

परदेशातील उच्चपदस्थ नोकरी सोडून देशात परत आलेला रहाब अहमद (नवाजुद्दीन सिद्दिकी) आपल्या पत्नीला भेटण्यासाठी निघालेला असताना त्याला विकीचे गुंड निवेदिताला त्रास देताना दिसतात. आपलं कर्तव्य म्हणून तो तिला वाचवण्यासाठी गर्दीत घुसतो आणि तिला घेऊन आपल्या गाडीतून निघून जातो.

विकीला हे समजताच तो आपल्या सोशल मीडिया टीमकडून याला ‘लव्ह जिहाद’चा रंग देऊन व्हिडिओ व्हायरल करतो. चंदन आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर पडतो व एका ट्रकमधून प्रवास करू लागतो. या ट्रकमधून गोमांसाची तस्करी होत असल्याची अफवा परसवून चंदनचीही गोची केली जाते. अफवांची ही भाजणी चढतच जाते आणि परिसरातील लोकांमध्ये तुफान दहशत पसरते.

सुधीर मिश्रांनी आपल्या चित्रपटांतून सामाजिक विषय अगदी थेट मांडले आहेत व इथंही ते जातीय व धार्मिक प्रश्‍न मांडताना हात आखडता घेत नाहीत. राजकीय फायदा उठवण्यासाठी प्रत्येक गोष्टीला धार्मिक रंग देणं आणि त्यातून लोकांमध्ये फूट पाडणं देशात सर्वत्र पाहायला मिळतं. त्याचं नेमकं आणि विदारक चित्र कथेतून उभं करण्यात आलं आहे.

निवेदिता व रहाबचं जगणं एका अफवेमुळं कसं असह्य होतं आणि अशा घटनांकडं पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन कसा वरवरचा असतो हे दिग्दर्शक नेमकेपणानं टिपतो. या अफवा त्या परसवण्यावरही उलटू शकतात, हेही अधोरेखित केलं जातं. कथेचा शेवट अपेक्षित असला, तरी विचार करायला लावणारा आहे.

एखाद्या घटनेसंदर्भात आपण तिच्या सत्य-असत्यतेबद्दल प्रश्‍न विचारणार आहोत अथवा नाही, हे दिग्दर्शक प्रत्येक टप्प्यावर विचारत राहतो. कथा आणि त्यातील विचार महत्त्वाचा असलेले चित्रपट हल्ली खूप कमी निघतात, त्यामुळं अशा चित्रपटाचं स्वागत आवश्‍यक ठरतं.

नवाजुद्दीन सिद्दिकीच्या वाट्याला वेगळ्या धाटणीची, त्याच्या व्यक्तिमत्त्वाला विपरीत भूमिका आली आहे व त्यानं ती मन लावून केली आहे. परिस्थितीमुळं असहाय ठरलेला रहाब उभा करताना त्यानं अभिनयाचे विविध रंग साकारले आहेत.

भूमी पेडणेकर वेगळ्या भूमिका निवडून त्यात आपले कसब दाखवत असते व या चित्रपटातही तिनं हेच काम अत्यंत लिलया केलं आहे. सुमीत व्यास व शारिब हाश्‍मीनं आपल्या भूमिका जोशात साकारल्या आहेत. ‘आज ये बसंत थोडा बावरा हुआ’ हे एकमेव गाणं लक्षात राहतं. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहाता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.