भारतात विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचं वारं जोरात वाहत असताना ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संख्या घटली आहे. दुसरीकडं, पॅलेस्टाईनमधील ‘हमास’ या दहशतवादी संघटनेनं इस्राईलवर हल्ला केला आणि जग अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकलं. या हल्ल्यानंतर इस्राईलच्या ‘मोसाद’ या गुप्तहेर संघटनेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
एवढी मोठी योजना या निष्णात संघटनेच्या नजरेतून कशी सुटली, याबद्दल जगभरातून आश्चर्य व्यक्त झालं. त्याच अनुषंगानं ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मवर ‘मोसाद’ संदर्भातील काही माहितीपट, चित्रपटही चाळून झाले. मात्र, ‘द स्पाय’ ही गिदोन रैफ दिग्दर्शित ‘नेटफ्लिक्स’वरील वेब सिरीज विशेष वाटली.
मोसादनं १९६०च्या दशकात आपले शेजारी राष्ट्र सीरियावर हल्ला करण्याआधी एका गुप्तहेराला माहिती गोळा करण्यासाठी पाठवलं होतं आणि त्यानं मिळवलेल्या (इस्राईलच्या दृष्टीनं) देदीप्यमान यशाची सत्यकथा ही वेब सिरीज मांडते. कथा, पात्ररचना, अभिनय, दिग्दर्शन अशा सगळ्याच आघाडीवर उजव्या आणि गुप्तहेर संघटना नेमकं कसं काम करतात हे केवळ फिल्मी पद्धतीनं नव्हे, तर अगदी अभ्यासपूर्ण पद्धतीनं मांडलेलं पाहायचं असल्यास ही २०१९मध्येच प्रदर्शित झालेली वेब सिरीज नक्की अनुभवा.
‘द स्पाय’ची सत्यकथा आहे एली कोहेन (साचा बारोन कोहेन) या एका मध्यमवर्गीय, एका स्टोअरमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची. पत्नी नादियासमवेत तो सुखात जगत असतानाच ‘मोसाद’ त्याला सीरियामधली एका मोहिमेसाठी कामावर घेते आणि त्याला एका खडतर प्रशिक्षणातूनही जावं लागतं. त्याचं नामकरण कामेल थाबेट केलं जातं. एली सीरियामध्ये दाखल होतो; तेथील अरब समुदायाशी मैत्री करतो.
याच काळात इस्राईल आणि सीरियामधील तणाव शिगेला पोचतो आणि सीरियाची पुढची चाल काय असणार याचा थांगपत्ता लावण्याची जबाबदारी एलीवर येते. तेथील स्थानिक एजंटांच्या मदतीनं तो सत्तेसाठी हपापलेल्या व अध्यक्ष होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या अमिन अल हफिझ यांच्यापर्यंत जाऊन पोचतो. त्यांच्या कार्यालयातून काही गुप्त माहिती मिळवतो व आपल्या व्यवसायाच्या नावाखाली ही माहिती दमास्कसमधून इस्राईलमध्ये पोचवतो.
सीरियाच्या सीमेवर सर्व लष्करी ठाण्यांची माहिती मिळवतो. आणखी पुढचा टप्पा गाठत मोठ्या बंडाला हातभार लावत अमिन अल हफिझला सत्ता हस्तगत करण्यास मदतही करतो. हफिझचा विश्वास मिळवल्यानं तो सीरियन सरकारच्या अगदी जवळ जाऊन पोचतो व अगदी गुप्त माहिती इस्राईलला पुरवत राहतो. मोहमंद बिन लादेन व हफिझच्या भेटीची माहितीही आपल्या देशात पोचवतो.
हफिझ एलीला डेप्युटी मिनिस्टर ऑफ डिफेन्स हे मंत्रिपद स्वीकारण्याची गळ घालतो. पाण्याच्या प्रश्नावर सीरिया आणि इस्राईल युद्धाच्या उंबरठ्यावर असताना मिळालेली ही ऑफर स्वीकारायची अथवा नाही, हे एली इस्राईलमधील अधिकाऱ्यांना विचारतो आणि मोठ्या चर्चेनंतर त्याला मान्यता मिळते. पुन्हा सीरियात गेलेल्या एलीच्या बाबतीत आता वेगळ्याच घटना घडू लागतात आणि मोठ्या थरारक, विस्मयकारक घटनांनंतर या कथेचा शेवट होतो.
खऱ्या गुप्तहेराचं आयुष्य किती संकटांनी घेरलेलं असतं आणि त्याला एका क्षणात किती महत्त्वाचे निर्णय जिवावर उदार होऊन घ्यावे लागतात, याचा अंदाज ही सत्यकथा पाहताना येतो. एखादा हेर शत्रूराष्ट्राच्या संरक्षणमंत्री पदापर्यंत जातो, ही कल्पनाही करता येणार नाही अशी गोष्ट एलीच्या बाबतीत घडते.
त्यासाठी त्यानं केलेलं प्रयत्न, लावलेली जिवाची बाजी, प्रसंगावधान, कुटुंबाशी फारकत याचं खुलासेवार चित्रण कथेत पाहायला मिळतं. दिग्दर्शकानं साठच्या दशकातील इस्राईल व सीरिया उभा करण्यासाठी घेतलेले कष्टही दिसतात. साचा बारोह कोहेन यांनी साकारलेला एली जबरदस्त. ‘मोसाद’ची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी अवश्य पाहा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.