सुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे नुकतेच पुण्यातीळ सह्याद्री रुग्णालयात निधन झाले. त्या खूप दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्या कासव चित्रपटाने ६४व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्ण कमळ पुरस्कार जिंकला होता. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
''दोघी' मी आठवीत असताना पाहिला होता. मग दहावी फ, देवराई, नितळ, घो मला असला हवा, एक कप चा, वास्तुपुरुष, संहिता, अस्तू, कासव पाहत राहिले. पार आत जाऊन स्पर्श करणारे हे सिनेमे. २०१५ ला 'आपण जरूर एकत्र काम करू' केलेलं प्रॉमिस आज तुटलं,' अशा शब्दांत अभिनेत्री हेमांगी कवीने दु:ख व्यक्त केलं.
'आत्ताच सुमित्रा भावे ताई यांच्या दु:खद निधनाची बातमी कळली. सुमित्राताई या चित्रपट दिग्दर्शनाचे विद्यापीठ होत्या. त्यांनी हाताळलेला प्रत्येक विषय हा धाडसी आणि सर्वसामान्य माणसांच्या जीवनाशी जगाचा परिचय करून देणारा होता. दोघी, दहावी फ, वास्तूपूरूष, देवराई, नितळ, एक कप चा, घो मला असला हवा, संहिता, कासव, अस्तू यांसारख्या अप्रतिम चित्रपटांनी भारतीय तसेच जागतिक चित्रपट प्रेमींना मराठी चित्रपटांची आदरयुक्त दखल घ्यायला लावली. आम्हा सर्वांशी त्या अत्यंत आपुलकीने बोलायच्या, आमच्या चित्रपटातील त्यांना आवडणाऱ्या व नावडणाऱ्या गोष्टी सांगून त्या मार्गदर्शन करायच्या. आज त्यांच्या जाण्याने केवळ मराठीच नव्हे तर संपूर्ण भारतीय चित्रपट सृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. सुमित्राताई भावे यांना भावपूर्ण श्रद्धांजली,' असं दिग्दर्शक रवी जाधव यांनी लिहिलं.
'भारतातील एक अत्यंत हुशार दिग्दर्शक आम्ही गमावला. तुमचे चित्रपट नेहमीच आम्हाला प्रेरणा देतील,' अशा शब्दांत अभिनेता सुबोध भावेने श्रद्धांजली वाहिली.
'सुमित्रा ताई, तुमचं सिनेमॅटिक जिनीएस अनुभवायला मिळालेल्यांपैकी मी एक भाग्यवान. हळुवारपणे, साधेपणाने चित्रपट उलगडत जायचा. चित्रीकरणाच्या दरम्यान मजा यायची तुमच्या शूटिंगना. छान दिसताय, हे तुमचं रशेझ बघितल्यानंतरचं वाक्य. छान दिसतंय. तुम्ही लिहिलेल्या, दिग्दर्शित, निर्मित केलेल्या चित्रपटांची, लघुपटांची यादी एवढी मोठी आणि भारी आहे. मेजवानीच! सुमित्राताई, तुमचा अखेरचा चित्रपट, दिठी, हा स्पिरीच्युअॅलिटीचा अनोखा अनुभव.. चित्रपट पाहून, भारावून, तुम्हाला फोन केला आणि तेव्हा आपल्या झालेल्या गप्पा मी हृदयात जपल्या आहेत,' अशी पोस्ट अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी लिहिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.