Ashvini Kasar News: मुंबईत स्वतःचं हक्काचं घर मिळणं ही सर्वांसाठीच आनंदाची गोष्ट असते. मुंबईत कामासाठी स्ट्रगल करता करता भाड्याच्या घरातून हक्काच्या घरात प्रवेश करणं ही कोणत्याही व्यक्तीसाठी खास गोष्ट. अशीच एक गोष्ट मराठी अभिनेत्रीच्या आयुष्यात घडलीय.
मालिका, नाटकांमधून झळकलेली अभिनेत्री अश्विनी कासार हिला म्हाडाची लॉटरी लागली आहे. अश्विनीने तिच्या वाढदिवशी ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केलीय.
अश्विनी कासारने सोशल मीडियावर नवीन घराच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ शेअर करत लिहीलंय की, "आपण काम करत असलेल्या क्षेत्रामुळे आणि काम करतोय त्या शहरात हक्काचं स्वतःचं घर होणं....... हे एकतर स्वप्न आहे किंवा कधी काळी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरलंय...!! खूप संमिश्र भावना आहेत. माझ्या वाढदिवशी आनंद द्विगुणीत करणारी गोष्ट तुम्हा सगळ्यांनाही सांगण्यासाठी हा शब्दप्रपंच.
काही वर्षांपूर्वी बदलापूर पासून सुरु झालेल्या माझ्या प्रवासामुळे दिवसाच्या शेवटी माझ्या राहत्या घरापर्यंत मी पोहोचू शकायचे नाही. पण माझ्या मित्र मैत्रिणींनी, त्यांच्या (आणि आता माझ्याही) कुटुंबियांनी, नातेवाईकांनी मला घराची उणीव कधी जाणवू दिली नाही."
अश्विनी पुढे लिहीते, "नुसतं घरच नाही तर ‘घरपण’ सुद्धा दिलं. त्यासाठी मी त्यांची कायम ऋणी आहे. तरीही माझ्या एकत्र कुटुंबाच्या प्रेमापोटी आणि ‘आपलं घर ते आपलं घर’ या भावनेपोटी मी बदलापूर गाठायचे. आज रात्री बेरात्री केलेले प्रवास, तब्येतीच्या तक्रारी, मनावर दगड ठेवून घेतलेले निर्णय आणि तरीही अभिनय क्षेत्रावरचं प्रेम, कामाप्रती श्रद्धा, जिद्द, आसू आणि हसू हे सगळं सगळं आठवतंय. सगळं ‘Worth’ वाटतंय. आता कंबर कसून जास्त छान काम करू ही ताकद या घराने दिली आहे."
अश्विनी शेवटी लिहीते, "‘मुंबई’ ने आपलं म्हटलं बुवा एकदाचं असं काहीसं वाटतंय..!! माझ्या घर मिळण्याच्या प्रवासात खूप जणांनी मदत केली आहे. त्या सगळ्यांचे मनापासून आभार. म्हाडा आणि महाराष्ट्र शासनाचे आभार..!!
तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम यांच्या प्रतीक्षेत मी आणि माझं घर कायम असू..!!
भावना समजून घ्याल याची खात्री आहे..!!"
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.