लग्नाची गोष्ट : मैफल शब्द आणि सुरांची!

सुंदर शब्द आणि लक्ष वेधून घेणारा आवाज एकत्र आला, की ते गाणं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतंच. अशीच गीतकार आणि गायकाची लोकप्रिय जोडी म्हणजे अश्विनी शेंडे आणि जयदीप बगवाडकर.
Ashwini Shende and Jaydeep Bagwadkar
Ashwini Shende and Jaydeep BagwadkarSakal
Updated on

सुंदर शब्द आणि लक्ष वेधून घेणारा आवाज एकत्र आला, की ते गाणं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतंच. अशीच गीतकार आणि गायकाची लोकप्रिय जोडी म्हणजे अश्विनी शेंडे आणि जयदीप बगवाडकर. अश्विनी आणि जयदीप यांची पहिली भेट ही एकदम फिल्मी स्टाइलमध्ये झाली. अश्विनीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन त्यांचा मित्र संगीतकार नीलेश मोहरीर याच्या घरी होतं. जयदीपलाही तिथे बोलावलं गेलं होतं. जयदीप नीलेशच्या घरी पोहोचला आणि अश्विनीनं दार उघडलं. तिच्या डोळ्यातली चमक आणि हास्य पाहूनच जयदीप तिच्या प्रेमात पडला. त्यापूर्वी जयदीपनं अश्विनीनं लिहिलेली गाणी ऐकली होती, पण गंमत म्हणजे अश्विनी इतकं उत्कृष्ट लिखाण करते म्हणजे ती आपल्यापेक्षा वयाने बरीच मोठी असणार असंच त्याला वाटत होतं!

दुसरीकडं अश्विनी जयदीपचं फक्त नाव ऐकून होती. जयदीपनं गायलेलं पहिलं गाणं तिनं ऐकलं होतं आणि तेव्हाच त्याचा आवाज तिच्या मनात भरला होता. जयदीपनं त्याची ओळख करून दिल्यावर अश्विनीचा चेहरा एकदम खुलला आणि ही गीतकार अश्विनी शेंडे आहे हे कळल्यावर अश्विनी आपल्याहून बरीच मोठी असेल हा त्याचा गैरसमजही दूर झाला. त्यांच्यात छान मैत्री झाली. त्यावेळी अश्विनी अत्यंत लोकप्रिय गीतकार म्हणून नावारूपाला आली होती. तर, जयदीप दुबईतील नोकरी सोडून संगीत क्षेत्रात काम करण्यासाठी भारतात परत आला असल्यानं त्याची संगीत क्षेत्रात नुकतीच सुरुवात झाली होती. त्यामुळं अश्विनी आणि तिच्या घरचे त्याला स्वीकारतील की नाही, अशी धाकधूक त्याच्या मनात होती. पण जयदीपनं त्याच्या मनातल्या भावना अश्विनीला सांगितल्यावर सहा महिन्यात तिनं त्याला होकार दिला आणि ते २०११मध्ये विवाहबद्ध झाले.

या दोघांचं नातं अश्विनीनं ‘ओल्या सांजवेळी’ या गाण्यात लिहिलेल्या ‘मी सावली होऊन तुझी देईन साथ ही तुला’ या ओळीसारखं आहे. अश्विनी म्हणाली, ‘‘जयदीपनं ज्याप्रकारे संगीत क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे, याची मी साक्षीदार आहे. त्याच्यात रिस्क घेण्याची तयारी आहे. एखाद्या कठीण परिस्थितीत शांत राहून उत्तमप्रकारे त्यातून मार्ग काढण्याची त्याच्यात क्षमता आहे. कोणत्याही परिस्थितीत तो केलेली कमिटमेन्ट चुकवत नाही. तो अतिशय नम्र आहे. या त्याच्या गोष्टी मला विशेष आवडतात. तो खूप समजूतदार आहे आणि आम्ही नवरा-बायको असलो, तरी आधी एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. माझ्या हातून काही चांगलं घडो चूक, मी सगळ्या गोष्टी त्याला सांगते. त्यात तो मला समजून घेतो किंवा त्यातून मार्ग काढायलाही मदत करतो. लाखात एक असा जोडीदार आहे जयदीप.’’

जयदीपनं अश्विनीबद्दल बोलताना सांगितलं, ‘‘अश्विनी फिल्मी तर मी प्रॅक्टिकल. ती उत्कृष्ट गीतकार, कवयित्री असल्यानं मला तिच्यासमोर फार व्यक्त होण्याची गरज भासत नाही. मी एखाद्या गोष्टीवर कसा रिअॅक्ट करेन हे तिला माहीत असतं. तिचे विचार प्रगल्भ आहेतच, त्यासोबत वर्षागणिक तिचा समजूतदारपणा आणखीनच वाढलाय. तिनं परिस्थितीला अनुसरून स्वतःमध्ये काही बदल करून त्या परिस्थितीप्रमाणे स्वतःला अॅडजस्ट केलं आहे. आमच्या नात्यात संवाद आहे, तसंच एकमेकांच्या कामात, वैयक्तिक आयुष्यात आम्ही एकमेकांना पूर्ण स्पेस देतो, एकमेकांच्या कामाचा, एकमेकांच्या मतांचा आदर करतो आणि यामुळंच आमचं नात छान फुलत गेलं आहे. अश्विनीनं काही कविता माझ्यावरही केल्या आहेत, ज्या माझ्यासाठी खूप खास आहेत. तसंच तिनं लिहिलेली सगळीच गाणी मला आवडतात पण ‘धुके दाटले’ हे गाणं माझं ऑल टाइम फेव्हरेट आहे.’’

जयदीप आणि अश्विनी या दोघांनाही फिरायला जायला, चित्रपट बघायला खूप आवडतं. त्या दोघांच्या आनंदाचा केंद्रबिंदू म्हणजे त्यांची मुलगी. घरी हलकफुलकं वातावरण ठेवत, तिला विचार मांडण्याची मोकळीक देत, पुढं जाऊन तिचे निर्णय तिला घेता यावेत यासाठी तिला सक्षम करण्याकडं दोघांचा कल आहे. जयदीप आणि अश्विनी यांनी एकत्र बरंच काम केलं आहे, तर आगामी काळात दोघे एकत्र मिळून आपल्यासाठी काही गाणी घेऊन येणार आहेत. तर दिवाळीत अश्विनीनं लिहिलेली आणि जयदीपनं गायलेली एक हिंदी गझल आपल्या भेटीला आणण्यासाठी ते दोघे खूप उत्सुक आहेत.

- अश्विनी शेंडे, जयदीप बगवाडकर

(शब्दांकन : राजसी वैद्य)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.