Merry Christmas Review: तुम्ही दिवसभर काही खाल्लं नाही. तुम्हाला उत्सुकता आहे की घरी काहीतरी चांगलं खायला असेल आईच्या हातचं. अगदी झुणका भाकर का होईना. कारण आईच्या हातचा प्रत्येक पदार्थ चांगलाच असतो.
मग तुम्ही काम संपवून उत्सुकतेने घरी जाता. आणि बघता तर काय, आईने तुमच्यासाठी तुमच्या आवडीची श्रीखंड, पुरी, कुरकुरीत भजी आणि आणखी बरेच पदार्थ असतात.
बास्स मग! तुम्ही खुश. अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं खायला मिळालं. पोट भरलं आणि मन समाधानी. अशीच अवस्था होते श्रीराम राघवन यांचा 'मेरी ख्रिसमस' सिनेमा पाहून. आपण अपेक्षा करतो त्याहीपेक्षा जबराट झालाय सिनेमा.
(merry christmas movie review starring katrina kaif vijay sethupathi radhika apte sriram raghavan)
श्रीराम राघवन हे 'अंधाधून' मुळे सर्वांच्या परिचयाचे झाले आहेत. त्यांची काही वेगळी ओळख सांगायची गरज नाही. अंधाधूनच्या छोट्याश्या कथेला त्यांनी दिलेली ट्रीटमेंट भन्नाट होती. तशीच भारी ट्रीटमेंट 'मेरी ख्रिसमस'ला दिली आहे.
मेरी ख्रिसमस एकदम रहस्यमयी म्युझिकल ट्रीट आहे. जी नवीन वर्षात प्रत्येकाला आवडेल यात शंका नाही. बरं आता flow मध्ये सिनेमाची कथाही सांगतो.. मुंबईत एक अल्बर्ट नावाचा गृहस्थ येतो. त्याला मारिया नावाची एक महिला भेटते.
बास्स! बाकी पुढे काय घडतं हे तुम्ही सिनेमात बघा.. कारण आणखी सांगितलं तर सिनेमाचं रहस्य उघड होईल. आणि मेरी ख्रिसमसमध्ये छोट्या छोट्या गोष्टीत काहीतरी गुपीत आहे. याशिवाय मुंबई शहराचा चांगला वापर सिनेमात केलाय.
सिनेमा हे मुख्यत्वे दृश्य माध्यम आहे. सिनेमा ऐकण्यापेक्षा पाहण्यात निराळं सुख आहे. पण सध्याचे सिनेमा इतके 'बोलतात' की 'पाहायची' मजा सरते. पण मेरी ख्रिसमस मात्र याला अपवाद ठरतो. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सिनेमा संगीतप्रेमींसाठी खास पर्वणी आहे.
अनेक प्रसंगांत संवाद कमी आणि म्युझिक जास्त वाजतं. त्यामुळे मोठ्या पडद्यावर हे सिन्स आणखी खुलतात. यासाठी दिग्दर्शक श्रीराम राघवन आणि संगीतकार प्रीतम यांचं कौतुक करावं तितकं कमी. खूप दिवसांनी संगीताचा इतका खुबीने वापर अनुभवायला मिळाला.
आता दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्याबद्दल.. राघवन पुन्हा एकदा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. असं वाटतं.. सगळं शांत सुरू आहे. आणि अचानक एक ट्विस्ट येतो आणि डोक्याला चालना मिळते.
राघवन यांनी सतत प्रेक्षकांच्या कल्पनेला तडा दिलाय. पुढच्या प्रसंगात असं असं होईल असे आपण आडाखे बांधत असतो. पण होतं काहीतरी वेगळंच! सिनेमा पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या बुद्धीशी खेळण्यात दिग्दर्शक सफल झाले आहेत.
कॅमेरा अँगल आणि दिग्दर्शन एवढं कमाल आहे की, आपण मेरी ख्रिसमसच्या प्रत्येक पात्राच्या नजरेतून सिनेमा पाहत असतो. आणि कोण चूक, कोण बरोबर, की सगळेच चूक की सगळेच बरोबर असे अंदाज लागत असतो. प्रेक्षकांना कथेशी असं एकरूप ठेवण्याचं संपूर्ण श्रेय दिग्दर्शक राघवन यांना दिलं पाहिजे.
चांगले पदार्थ समोर असले की आपण फक्त खायचं असतं. जास्त डोकं लावत बसायची नाही. असंच काहीसं झालंय मेरी ख्रिसमस मधल्या कलाकारांच्या अभिनयाबद्दल.
सिनेमाच्या कथेची पकड इतकी मजबूत आहे की कलाकारांना त्यात फक्त रंग भरायचे होते. आणि हे काम कतरिना आणि विजय सेतुपती यांनी उत्तम केलंय. दोघांची केमिस्ट्री सुद्धा मस्त रंगली आहे.
दोघांची काहीशी वेगळी जोडी लक्षवेधी ठरली आहे यात शंका नाही. या कलाकारांना राधिका आपटे, अश्विनी काळसेकर, विनय पाठक यांनीही कमाल साथ दिली आहे.
राहून राहून एकच वाटतं.. सिनेमाचा प्लॉट बघता हा सिनेमा गेल्या महिन्यात ख्रिसमसच्या सिझनमध्ये आला असता तर आणखी मजा आली असती.
असो! नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला बुध्दीला चालना देणारा एक गुंग करणारा आणि आपल्या कल्पनांना चकवा देणारा खेळ बघायचा असेल तर मेरी ख्रिसमस थिएटरमध्ये नक्की बघा!
OTT वर बघू आम्ही! असं काहीजण मनातल्या मनात म्हणत असतील. पण मित्रांनो, मेरी ख्रिसमसचा थिएटरमधला विलक्षण अनुभव घरबसल्या OTT वर मिळणार नाही इतकं नक्की! बाकी निर्णय तुमचा..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.