Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही

पुण्यातील मेट्रोमध्येही चित्रपटाचे प्रमोशन केले होते
चंद्रमुखी
चंद्रमुखी sakal
Updated on

Marathi Movie: मराठी साहित्यातील प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील (Vishwas Patil) यांच्या  चंद्रमुखी (Chandramukhi) कादंबरीवर आधारित त्याच नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (Social Media) चंद्रमुखीची चर्चा आहे. त्याचे जोरदार प्रमोशनही करण्यात आले. बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल (Sherya Ghoshal)  हिच्या आवाजील लावणीला श्रोत्यांचा चांगला प्रतिसादही मिळाला. ट्रेलर प्रेक्षकांनी उचलून धरला. प्रसाद ओक (Prasad Oak) दिग्दर्शित या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहचली (Marathi Movie) होती. दरम्यानच्या काळात चित्रपटातील मुख्य कलाकार अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे यांनी विमानतळ, विमान, एवढेच काय पुण्यातील मेट्रोमध्येही चित्रपटाचे प्रमोशन केले होते. चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांच्या संमिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया समोर येण्यास सुरुवात झाली.

खासदार दौलतराव त्याची प्रियसी चंद्रा यांच्यातील प्रेमकहाणी दिग्दर्शकानं प्रेक्षकांसमोर ठेवली आहे. कथानकाचा काळ लक्षात घेता ज्याप्रकारे त्याची पडद्यावर मांडणी करण्यात आली आहे ती मात्र फारसी प्रभावी नसल्याचे लक्षात येते. सतत फोकस अन डी फोकस कॅमेरा तंत्राच्या साह्यानं चित्रपटातील व्यक्तिरेखा आपल्यासमोर उलगडतात. खासदाराच्या आयुष्यात आलेली चंद्रा त्याला व्यापून टाकते. दौलतरावांची बायको डॉली (मृण्ययी देशपांडे) हिला आपल्या नवरोबाच्या पराक्रमाबद्दल संशय वाटतच असतो. एका प्रसंगातून तर तो आणखीनच बळावतो. त्यानंतर जवळच्या नातलगाकडून तिच्या कानावर त्याबाबत माहिती आल्यानं मग मात्र ती पेटून उठते. दौलतरावानं आपल्याशी विश्वासघात केला या भावनेनं व्यथित होते. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या दौलतरावाला त्याच्या पुढील काळात काही करुन भुईसपाट करायचं यासाठी जवळची माणसे कटकारस्थान रचतच असतात. यासगळ्यात चंद्रा दौलतरावांच्या प्रेमाला पारखी होते. सर्वसाधारण असं हे कथेचं स्वरुप. ज्यांनी कादंबरी वाचली असेल ते जेव्हा चंद्रमुखीच्या वाट्याला जातील तेव्हा त्यांची निराशा होण्याची शक्यता अधिक आहे.

कादंबरीचा पट मोठा आहे. त्यातील शब्दसौंदर्य, लेखकानं केलेली वातावरण निर्मिती हे सारं भारावून टाकणारं आहे. हेच जेव्हा प्रेक्षक पडद्यावर पाहतो तेव्हा त्याच्या मनात हे असं असतं तर अधिक चांगलं झालं असतं अशाप्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागतात.

चंद्रमुखीची भूमिका साकारताना अमृतानं मोठी मेहनत घेतल्याचे दिसून येते. पण जेव्हा तिच्या तोंडून अस्सल ग्रामीण ढंगाचे संवाद कानावर पडतात तेव्हा विरस होतो. त्यातून अभिप्रेत अर्थ हा आपल्यापर्यत बळजबरीनं पोहचवला जातोय की काय असं वाटून जातं. आदिनाथ कोठारेनं दौलतराव प्रभावीपणे साकारला आहे. मात्र तो ही बऱ्याचदा चाचपडताना दिसतो. त्याची हतबलला आपल्याला अस्वस्थ करते. खासदार असणारा माणूस एवढा असहाय्य असु शकतो हे निदान आजच्या काळात विचार करताना नवल वाटतं. चंद्रा जुन्नरकर ही नावाजलेली कलावंतीण आहे. तिचं पंचक्रोशीत मोठं नाव आहे. तिच्या एका बैठकीला खासदार दौलतराव उपस्थित असताना त्यांच्या नजरेत चंद्राचं सौंदर्य भरतं आणि तिथुन प्रेमाचं पानं रंगण्यास सुरुवात होते. शेवटपर्यत ते रंगत की नाही हे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन पाहावं.

अजय अतुलच्या संगीतानं चंद्रमुखीमध्ये जीव आणला आहे. त्यांनी केलेली गाणी श्रवणीय आहेत. ठेका धरायला लावणारी आहे. मात्र त्यावर केलेलं चित्रिकरण मनावर काही केल्या ठसत नाही. क्रांतीसूर्य नावाच्या बंगल्यात फुलणारी चंद्रमुखीची प्रेमकहाणी आपल्याला गुंतवून ठेवण्यास कमी पडते. पूर्वाधात बाणेदार असणारी चंद्रमुखी उत्तरार्धात एवढी भावून होऊन जाते की आपल्याला प्रश्न पडतो ती हे सगळं दौलतरावांच्या प्रेमापोटी करते की स्वताचं मोठेपण अधोरेखित सिद्ध करण्यासाठी... दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये चंद्रा पत्रकारांना विनवणीच्या स्वरात आपल्या संबंध तमाशा कलावंताचा पाढा वाचते. कुणाचे किती योगदान, कुणाचा किती संघर्ष याविषयी सांगते. तेव्हा आजवर या लोकांची माध्यमांनी दखल घेतली नाही अशी तिची खंत आहे.

चंद्रमुखीच्या संवादाबाबत बोलायचे झाल्यास ते लक्षात राहणारे आहे. दुकानात लाईटिंग असली की गिऱ्हाईक खुश होतं. हे जेव्हा चंद्राची मावशी तिला सांगते तेव्हा दिग्दर्शकानंही चंद्रमुखीचे प्रसंग उठावदार करण्यासाठी प्रयत्न केले असते तर तो चित्रपट आणखी खुलला असता. बाकी बत्ताशाच्या भूमिकेत असणारा समीर चौगुले आपल्या लक्षात राहतो. भलेही त्याच्या वाट्याला छोटेखानी भूमिका असेल मात्र त्यात त्यानं आपली छाप उमटवली आहे. प्रेक्षकांना बत्ताशा हा अनेकदा दौलतरावांपेक्षा जवळचा वाटू लागतो. दौलतरावांच्या सासऱ्यांच्या भूमिकेत डॉ.मोहन आगाशे यांची भूमिका लक्षवेधी आहे. त्यांनी आपल्या संवादातून प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. मध्यंतरापूर्वी एका वेगळ्या लयीवर चाललेला चंद्रमुखी मध्यंतरानंतर मात्र आणखीनच अस्वस्थ होतो. अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि चंद्रमुखीचा सवाल जवाब तर फार उरकता घेतला आहे. त्यात आणखी रंजकता आणता आली असती असं वाटून जातं.

दिवाळीच्या दिवशी क्रांतीसूर्य बंगल्यावर डॉली आणि चंद्रमुखीचा सामना होतो. तो प्रसंग लक्षात राहणारा आहे. मृण्यमीयनं उत्तमरीत्या आपली भूमिका पार पाडली आहे. असं असलं तरी चंद्रमुखी आपल्याला गुंतवून ठेवत नाही. तो अनेक जागा रिकाम्या सोडत शेवटाकडे निघतो. शेवटचा प्रसंगही आपल्या मनाला भिडत नाही. चंद्रमुखीचं रडत राहणं आणि दौलतरावांची निराशा, त्यांच्या मनाची दोलायमान स्थिती, अंगकाढूपणा हे खुपत राहतं. त्यामुळे एरवी बोर्ड़ावर वीजेप्रमाणे कडाडणारी चंद्रमुखी आपल्याला हताश वाटू लागते. तमाशाच्या वाटेला न गेलेल्या प्रेक्षकांना चंद्रमुखी एक वेगळा अनुभव देणारी कलाकृती निश्चितपणे म्हणत येईल. मात्र ग्रामीण भागातील प्रेक्षकांना त्यात फारसं नाविन्य वाटावं असं काही नाही. खासदार असणाऱ्या दौलतरावाला चंद्रमुखीचं प्रेम टिकवून ठेवता आलं नाही. त्यानं तिचा केलेला अपमान त्यांना आणखीनच अस्वस्थ करु शकतो.

चित्रपट - चंद्रमुखी

दिग्दर्शक - प्रसाद ओक

कलाकार - डॉ.मोहन आगाशे, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, आदिनाथ कोठारे, समीर चौगुले

स्टार - **1/2

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()