Ole Aale Movie Review News: बाप - मुलाचं नातं कसं असतं? वरून जरी कठोर वाटतं असलं तरीही आतून हळवं. अनेकदा मुलगा बापाप्रती आपल्या भावना व्यक्त करत नाही. पण तेच बापाच्या बाबतीत सुद्धा लागू होतं. अनेकदा बापही लेकाजवळ व्यक्त होत नसतो. मुलगा चुकला की आई लगेच ओरडते. पण बाप मात्र अनेक प्रसंगी शांतच असतो. तो मुलाच्या कलाने घ्यायचा प्रयत्न करतो. आणि कधी सहनशक्तीचा अंत झालाच तर बापाचा राग अनावरही होतो. बाप - लेकाच्या नात्यातली हीच गंमत 'ओले आले' मध्ये पाहायला मिळते. कसा आहे नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा? वाचा..
ओले आले सिनेमाची गोष्ट आहे अशाच एका बाप - मुलाची. ओमकार लेले आणि आदित्य लेले ही बाप - लेकाची जोडी एकत्र राहत असते. त्यांच्या जोडीला आहे घरातला गडी बाबुराव. आदित्य त्याच्या करियर आणि कामात इतका व्यस्त आहे की, त्याला श्वास घ्यायलाही फुरसत नाही. आपल्या लेकाने थोडी विश्रांती घ्यावी, करीयरच्या मागे धावता धावता जरा बापालाही वेळ द्यावा अशी ओमकारची धडपड.
आदित्य मात्र बापाचं काहीही ऐकत नाही. त्याची स्वप्नं मोठी असतात. आणि ही स्वप्न साध्य करण्यासाठी रक्ताचं पाणी करायची त्याची तयारी असते. पण अचानक एक घटना घडते ज्यामुळे बापाच्या पायाखालची जमीन सरकते. आदित्यला सुद्धा भीती वाटते. आणि मग पुढे ओमकार - आदित्य हे बापलेक अनोख्या भारतभ्रमंतीवर निघतात. आता ही घटना काय? आदित्य बापासाठी वेळ देऊ शकेल का? आपल्या लेकाला जरा आराम मिळावा म्हणून बाप कोणत्या थराला जातो? याची कहाणी म्हणजे ओले आले.
ओले आलेचा विषय खूप चांगला आहे. नवीन आहे. बाप - लेकाची हळवी गोष्ट असली तरीही कुठे अतीभावुकपणा नाही. परंतु दिग्दर्शक विपुल मेहता अपेक्षित परिणाम साधण्यास कमी पडले आहेत.
एकामागून एक प्रसंग यांचा भडिमार झाल्याने कथेतली सहजता हरवली आहे. कथेचा मूळ गाभा थोडासा भावनिक आहे. परंतु तो भावनिकपणा भिडत नाही. याशिवाय केदारनाथ, गंगा आरती, ऋषिकेश अशा अनेक ठिकाणांचा सिनेमात आणखी खुबीने वापर करता आला असता. याशिवाय सिनेमा उत्तरार्धाकडे जाताना अनावश्यक लांबला आहे. त्यामुळे हळवे करणारे प्रसंग असूनही आपण त्यांच्याशी कनेक्ट होत नाही.
ओले आले सर्वार्थाने शेवटपर्यंत तारलाय तो म्हणजे नाना पाटेकर यांनी. नाना पाटेकर यांची एनर्जी, त्यांचा सहज अभिनय आणि संपूर्ण सिनेमातला त्यांचा वावर सहजसुंदर आहे. नाना पाटेकर बाप ओमकार लेलेची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारतात. छोट्या प्रसंगात सुद्धा नानांनी केलेला अभिनय, घेतलेल्या जागा लक्षात राहतात.
याशिवाय उल्लेख करायला हवा तो म्हणजे मकरंद अनासपुरे यांचा. बाबुरावच्या भूमिकेत मकरंद यांना खूप दिवसांनी मराठी सिनेमात खळखळून हसवताना पाहिलंय. नाना - मकरंद यांची विनोदी जुगलबंदी बघायला मजा येते. याशिवाय सिद्धार्थ चांदेकर - सायली संजीव यांनीही आपापल्या भूमिका यथायोग्य साकारल्या आहेत.
एकूणच नाना पाटेकर यांचे फॅन असाल आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक हलकाफुलका रोडट्रीप सिनेमा बघायचा असेल तर 'ओले आले' एकदा नक्कीच बघू शकता!!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.