Oscar 2023: चित्रपट जगतातील सर्वोच्च समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा आज लॉसएँजलीस येथील डॉल्बी सभागृहात मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी जगभरातील दिग्गज कलाकार या सोहळ्याला हजर होते. आणि विशेष म्हणजे आजचा दिवस भारतीयांसाठी अत्यंत महत्वाचा ठरला. कारण 'द एलिफेंट व्हिस्पर' या शॉर्ट फिल्मने बेस्ट शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला.
गेले काही दिवस या लघुपटाची बरीच चर्चा होती. 41 मिनिटांचा हा लघुपट हत्ती आणि त्याला सांभाळणाऱ्या दांपत्याच्या आयुष्यावर भाष्य करतो. पण नेमकं या लघुपटात काय आहे.. हे पाहूया...
(oscar winning short film the elephant whisperers parenting story and where to watch)
द एलिफंट व्हिस्परर
याशीर्षकाचं सरळसोट भाषांतर करायचं तर हत्तींशी कुजबुज....किंवा हत्तींशी बोलणारा किंवा बोलणारी असा काहीतरी अर्थ मिळेल.
पण द एलिफंट व्हिस्परर अर्थाच्या फार पलिकडे आहे. ही एक अतीव सुंदर फिल्म आहे. यातला निसर्ग आणि त्यातली माणसं अतिशय सुंदर आहेत. मनाने निर्मळ आहेत. जेवढा देखणा आणि खरा निसर्ग तेवढीच खरी आणि निर्मळ माणसं आहेत. ही गोष्ट आहे, एका जोडप्याची ज्यांनी हत्तींची दोन बाळं सांभाळली आहेत.
कोणत्याही प्राण्याची बाळं आपल्याला फार गोग्गोड वाटतात. असतातच ती तशी. बालपण मग कुठलंही असो ते अतीव निर्मळ आणि गोड असतं. पण या बाळांना मोठं करणं फार कठीण असतं. सगळ्याच प्राणी, मानव पालकांसाठी ते बऱ्यापैकी आव्हानात्मक असते. त्यातही बाळ आपल्या प्रजातीचं नसेल तर हे आणखीच कठीण असतं आणि त्या पालकाकडे विशेष संवेदनशीलता असणं अत्यंत गरजेचं असतं.
दक्षिण भारतातले बोम्मन आणि बेल्ली यांच्याकडे ती आहे. त्याच्याच जोरावर या दोघांनी हत्तीची दोन बाळं वाढवली. रघु आणि अम्मू ही त्यांची हत्तीबाळं. ही दोन बाळं आणि बोम्मन बेलीचं त्यांचे पालक होणं हा सगळा प्रवास या फिल्ममध्ये दाखवला आहे. अर्थातच दक्षिण भारतातला देखणा निसर्ग आहे.
बोम्मन, बेली दोघं आदिवासी किंवा जंगलात राहणाऱ्या जमातीतले आहेत. दोघांची निसर्गाशी नाळ जोडलेली होतीच. पण ती नाळ त्यांनी या हत्तींशीही जोडून घेतली. अगदी साधी, दरिद्री किंवा निरक्षर म्हणता येतील अशी माणसं पण त्यांच्या मनात अपार प्रेम आहे.
बोम्मन वनखात्यासाठी काम करत असताना त्याच्याकडे आला रघू. त्याच्या शेपटीला कुत्रे चावले होते. आई मरण पावली होती. असं ते बाळ बोम्मनकडे आलं आणि त्याच्या जोडीला होती बेल्ली. दोघांनी खरोखरच आईबापाप्रमाणे काळजी घेतली आणि रघुबाळ हसतं खेळतं झालं.
रघुबरोबरच्या दोघांच्या गप्पा, रघुबरोबर दोघांचं असलेलं जिवाभावाचं नातं या फिल्ममध्ये दिसतं आणि त्यासोबतच दिसतो बदलता निसर्ग. रघुसाठी बांबूच्या फांद्या तोडण्यापासून, त्याला दुध पाजेपर्यंत आणि त्याच्यासाठी रात्री शेकोटी करेपर्यंत प्रत्येक गोष्टींत दिसतं ते फक्त प्रेम. ही आपली जबाबदारी आहे, याची मनापासून जाणीव. शिवाय ही जबाबदारी टाकलेली नाही तर आपण आनंदाने स्वीकारलेली आहे, ही शहाणीव.
पावसाळा येणार असतो त्याची जाणीव झाल्यावर आनंदित होणारा आणि, ''रघु आता तुझ्यासाठी भरपूर गवत येईल हा'' असं सांगणारा बोम्मन म्हणजे अगदी शाळेतून लेकाला घरी घेऊन येणारा आणि त्यावेळी आता आपण तुला गंमत घेऊ हा... असं म्हणत त्याच्याशी गप्पा मारणारा बाप वाटतो.
''दुध नीट पी रे, ती नळी खाऊ नको'', म्हणून दटावणारी आई बेल्ली...
रघुनंतर या दोघांकडे आणखी एक बाळ येतं अम्मू. हा अम्मू तर आणखी लहान आहे आणि आणखी गोडुला आहे. बिस्कीट पटकन घेणारा, वनखात्याच्या पिंजऱ्यातून (म्हणजे सर्कशीतला पिंजरा नव्हे. हत्तींचा निवारा, लहान हत्ती कुठे पळू नयेत, हरवू नयेत.
म्हणून बांबू वगैरे लावून बंद केलेला)सोंडेने जगाचा अंदाज घेणारा अम्मु जेव्हा रघुबरोबर राहायला येतो तेव्हा मोकळा मोकळा होतो. रघु त्याला अनेक गोष्टी शिकवतो. जसं रघुला दुसऱ्या हत्तीने शिकवलेल्या असतात.
आपण आपल्या या बाळांना सगळं काही शिकवू शकत नाही, याची बोम्मन आणि बेल्लीला जाणीव आहे, त्याचं उगाचचं शल्यबिल्य नाही. आपण प्राणी नाही, त्यामुळे हे शिकवू शकणार नाही, हे माणसाचं काम नाही अशी खेडूताची एक निर्मळ शहाणीव आहे ती.
दरम्यान रघुची काळजी घेता घेता बोम्मन बेल्ली एकमेकांची काळजीही घ्यायला लागलेत आणि त्यांचं एकत्र येणं, त्यांचं लग्न इतकं सुंदर आहे. खरं खरं निसर्गातलं लग्न. त्यातले मुख्य पाहुणे आहेत. रघु आणि अमू.
थोड्या दिवसांनी रघु मोठा झाल्यावर वनखात्याने दुसऱ्या केअरटेकरकडे त्याची जबाबदारी दिली. बोम्मन, बेल्ली, अमु तिघांनाही हे फार जड गेलं होतं. बोम्मन म्हणतो, असा देव नसेल ज्याला आम्ही नवस केला नाही पण तरी रघु आमच्याकडून गेलाच.
अर्थात आताही रघु, बोम्मन भेटतात. बोम्मन कौतुकाने सांगतो, ''मी हाक मारली की रघु लगेच धावत येतो माझ्याकडे विसरला नाहीये तो मला.'' हे सांगताना लेकाच्या कतृत्त्वाने हुशारीने फुललेल्या बापाची भावना दिसते.
''तू इथे आडवा झाला नाहीस तर मी तुझ्याशी बोलणार नाहीये'', असं अमुला दटावतानाची बेल्ली, आधी नाही नाही म्हणणारा मग नंतर हळूच तिच्या मांडीजवळ आडवा होणारा अमु....
बेल्लीची नात आल्यावर अमुच्या निवाऱ्याजवळ शेकोटी पेटवून तिथेच दोघींनी पथारी पसरलीय... नातीला गोष्ट सांगताना ती ऐकणारा अमु... त्याची लाडिक सोंड...सगळ्या माहौलालाच छान थोपटणारी बेली.
''आता मी जंगलाला घाबरत नाही, रघुने माझी भीती घालवली. हे हत्ती म्हणजे माझी गेलेली लेक आहे. आता लोक मला हत्तीची आई म्हणून ओळखतात. मला आवडते ही ओळख'' म्हणणारी बेल्ली...
ही सगळी फिल्म मला फार आवडली. हे कळलं असेलच. यात भावनाविव्हळ वगैरे वाटेल कुणाला. पण तुम्ही फिल्म पाहिल्यावर तुमच्या डोळयांतून काही पाण्याचे थेंब कधी बाहेर येतील कळणारही नाही तुम्हाला.
आपण मोठे झाल्यावर, नोकऱ्या, सततची स्पर्धा, ट्रोलिंग, शहरांच्या वाढत्या भूका या महासागरात स्वत:ला लोटल्यावर या लाटांशी झुंजत आपली नौका पुढे रेटताना, बोम्मन-बेलीसारख्यांची भावनांची अशी एखादी संथ तरंगणारी होडी काय सुकून देते ते पाहूनच कळेल.
कुठे पहाल?
The Elephant Whisperers ८ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज झाली होती आणि आता ओटीटीच्या माध्यमातून आपण ''नेटफ्लिक्सवर' ती कधीही पाहू शकतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.