प्रा. संदीप गिऱ्हे
Year Ender 2022: कोरोना काळात, विशेषता लॉकडाऊनच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर प्रचंड प्रमाणात होत होता. कालांतराने न्यू नॉर्मल म्हणजे कोरोना नंतरच्या काळात वातावरण मोकळे झाल्यानंतर वापर कमी होत गेला. २०२२ हे वर्ष ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी संमिश्र प्रकारचे होते.
आता चित्रपट अनिर्बंधपणे प्रदर्शित होत आहेत व काही कालावधी नंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म फक्त त्याच प्लॅटफॉर्मसाठी तयार केल्या गेलेल्या ‘ओरीजनल्स’ च्या माध्यमातून आपला प्रेक्षकवर्ग टिकवण्याची धडपड करत आहे.
मात्र या प्रयत्नांना फारसे यश येतांना दिसत नाही. या चढाओढीत सर्वात पुढे आहे साहजिकच नेटफ्लिक्स. २०२२ या वर्षात नेटफ्लिक्सने सर्वात जास्त संखेने चित्रपट, टीव्ही शोज, सिरीज प्रदर्शित केलेल्या आहेत. या तुलनेत इतर प्लॅटफॉर्मला या जवळपासही पोहचता आले नाही.
Also Read - Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?
२०२२ या वर्षात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या शो मध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण शो आहेत. यामध्ये थायलंड मधील गुहांमध्ये अडकलेल्या लहान फुटबॉल खेळाडूंच्या सुटकेच्या घटनेवर आधारित ‘Thai Cave Rescue’ ही सिरीज आवर्जून पहावी अशी आहे.
ही घटना जगाने वेगवेगळ्या माध्यमातून अनुभवलेली होती, त्यामुळे त्यात आता काय नवीन बघायचं असं वाटू शकतं, परंतु या घटनेचे चित्रण व कथेची मांडणी खूप उत्कंठावर्धक व औसुक्यपूर्ण पद्धतीने केलेले आहे.
पडद्यावर घटना साकारताना कथेला दिलेला Human Touch अगदी प्रभावीपणे जाणवतो. तो अनुभव सिरीज पाहून घ्यावा असाच आहे. विशेषतः लहान मुलांसाठी हा खूपच प्रेरणादायी अनुभव आहे.
आजच्या जागतिक राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारा ‘Dont Look Up’ हा आवर्जून बघावा असा वेगळ्या धाटणीचा चित्रपट. बहुतांश जग सत्तांतरातून अति उजव्या व मुलतत्ववादी विचारांकडे ओढले जात असतांना, आपल्या पुढे भविष्यात काय मांडून ठेवले आहे याचा मिश्कील शैलीतला हा अनुभव आहे.
सध्याच्या मौज मस्तीच्या टींडरमय जगातला ‘The Tinder Swindler’ हा माहितीपट नागवल्या गेलेल्या महिलांची विदारक परिस्थिती दाखवतो.
भारतीय निर्मितीमध्ये ‘She’ आणि ‘Jamtara - Sabka Number Ayega´या सिरीजचे पुढील सिझन आधीच्या एवढे प्रभावित करू शकले नाही. पुढील भागांतील कथानक आधीच्या सिझन पासून भरकटलेले वाटते. Delhi Crime 2 मात्र याला अपवाद ठरावी.
Yeh Kaali Kaali Ankhein आणि Khakee: The Bihar Chapter ह्या दोन नवीन सिरीज मात्र भाव खाऊन गेल्या. चित्रपटांच्या बाबतीत दसवी, डार्लिंग हे वेगळ्या विषय आणि मांडणीचे चित्रपट पाहण्यासारखे आहेत. 83 व शाब्बास मिथ्यु हे दोन क्रिकेट विषयीचे चित्रपट त्या त्या खेळाडूंच्या जडण घडणीची उकल करतात. ती समजून घेण्यासारखी आहे.
‘शेरदिल’ हा मात्र आवर्जून पहावा असा चित्रपट. उपेक्षितांचे जगणे साध्या नर्म विनोदी पद्धतीने मात्र प्रखरपणे मांडलेले यात पहायला मिळेल. हे पाहताना पंकज त्रिपाठी आणि नीरज काबी यांच्या सहज अभिनयाची प्रशंसाही करता येईल. सोनी लिवचा इतर सोनीच्या प्लॅटफॉर्मसारखा क्राईम आणि कॉमेडी यावर जास्त भर असतो.
सोनी लिववर Undekhi Season 2, Scam 2003: The Telgi Story, Maharani 2 ह्या क्राईम सिरीजचे पुढील भाग आधीच्याच लईत पुढे जाणारे आहेत. Tanaav ही यावर्षी यात नवीन पडलेली भर. कॉमेडीच्या बाबतीत गुल्लकचा तिसरा सिझनही आधी एवढाच मजेशीर आहे. Nirmal Pathak ki Ghar Vapsi आणि The Salt City हा थोड्या क्विर्की पद्धतीचा पण मजेशीर अनुभव जरूर घ्यावा असा आहे.
The Rocket Boys हा मात्र एकदम वेगळा प्रयोग. दोन वैज्ञानिकांची यशोगाथा, त्यांची वैज्ञानिक प्रतिभा, वैयक्तिक जीवन, व्यावसाईक संघर्ष, तेंव्हाच्या काळातील राजकीय, सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी हे अगदी तपशीलवारपणे या सिरीजमध्ये दाखवलेले आहे.
‘डॉ. अरोरा’ ही म्हणजे पाहिलीच पाहिजे अशी सिरीज. गुप्तरोग आणि सेक्स समस्या असा विषय घेऊन एवढी संवेदनशील चित्रनिर्मिती इतर कुठेही बघायला मिळणार नाही.
आपल्या शारीरिक वैगुण्याची बोच आणि त्यातून येणारी सामाजिक कुचंबना या फेऱ्यात अडकलेली पात्र, त्यांना या फेऱ्यातून बाहेर काढणारा आणि स्वतः हे दुख भोगून त्याची सल कायम उराशी बाळगणारा डॉक्टर असं नाजूक विषयाचं अतिशय तरल चित्रण या मालिकेत दिसतं.
डिझ्ने हॉटस्टारला मोठ्या संखेने या वर्षात काही नवीन बघायला मिळाले नाही. बबली बाउन्सर आणि गुड लक जेरी हे चित्रपट थोडी करमणून करतील. मात्र कौन प्रवीण तांबे हा आवर्जून पाहिलाच पाहिजे असा चित्रपट. क्रिकेटवर निस्सीम प्रेम करणारा आणि देशासाठी एकही मॅच न खेळता रिटायर झालेल्या एक प्रतिभावान खेळाडू आणि साध्या माणसाची ही अगदी साधी गोष्ट. यातील साधेपणा पाहण्याचा हा असाधारण अनुभव आहे.
डिझ्ने हॉटस्टारला या वर्षात आलेली सर्वात अफलातून चित्रकृती म्हणजे The Great Indian Murder. ही दिसायला केवळ सूड उगवणे हा हेतू असलेली गोष्ट आतून एक क्लिष्ट राजकीय षडयंत्र अधोरेखित करत राहते.
आपल्या सभोवताच्या नैतिक, नैतिक, राजकीय, आर्थिक भ्रष्टाचाराच्या वावटळीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुन्ना आणि एकेती साठी जरूर बघावी अशी ही मालिका.
द ग्रेट इंडियन मर्डर ही मालिका विशाल, गुंतागुंतीच्या आणि तीव्रपणे विभागलेल्या राष्ट्राच्या जीवनातील साचलेपण दाखवणारा आरसा आहे. त्यात आपल्याला आपलेही प्रतिबिंब पाहता येते.
पटकथेच्या बाबतीतील थोडा ढिसाळपणा सोडून मूळ मुद्दा लक्षात घेतला तर नक्की रंगत येईल.
ऍमेझॉन प्राइमवरही ओरीजानल्स म्हणून खूप काही पाहण्यासारखे या वर्षात नव्हते. मिर्झापुर मालिकेने आपली कमाल दाखवणे यावर्षीही पुढे सुरु ठेवले.
पंचायत शिवाय तर या वर्षातील आपली करमणूक पूर्ण होऊ शकणार नाही. द फॅमिली मॅन ने मात्र आपली नजर छोट्या पडद्यावर खिळून ठेवली होती. दुसरीकडे फोर मोर शॉट्स नको प्लीज अशी अवस्था झालेली होती.
एकंदरीत ऍमेझॉन प्राइमवर खूप काही नाविन्यपूर्ण असे काहे या वर्षात पहायला मिळाले नाही. इतर ओटीटी प्लॅटफॉर्मचीही थोड्याफार प्रमाणात अशीच अवस्था आहे. त्यामुळे त्यांचा धांडोळा घेऊन वेळ वाया घालवण्याची गरज नाही.
- प्रा. संदीप गिऱ्हे (लेखक, हे न्यू आर्टस, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालय, अहमदनगर येथील संज्ञापन अभ्यास विभागाचे प्रमुख आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.