Panchak Review News: कोकण म्हटलं की निसर्गरम्य परिसर डोळ्यासमोर उभा राहतो. कोकणची माणसं साधी भोळी.. काळजात त्यांच्या भरली शहाळी. अशा अनेक भावना मनात येतात. कोकणी भाषेचा गोडवा तिथल्या माणसांच्या बोलण्यात जाणवतो. आणि खऱ्या अर्थाने या माणसांच्या सानिध्यात राहिल्यावर वेगळी मजा येते.
अशाच कोकणी माणसांची हलकीफुलकी गोष्ट 'पंचक' सिनेमातून मांडण्यात आलीय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सिनेमा कसा आहे? सांगतो. त्यासाठी हा review शेवटपर्यंत वाचा.
'पंचक'चा ट्रेलर ज्यांनी पाहिला असेल त्यांना कथेचा अंदाज आला असेलच. तरीही ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो. पंचकची कथा घडते कोकणात. कोकणात खोतांचं मोठं कुटुंब. या कुटुंबातील भाऊंचं निधन होतं. त्यामुळे संपूर्ण कुटुंब दुःखात. अशावेळी घरात भटजी येतो आणि सांगतो की पंचक लागलं. मग पुन्हा एकदा सगळ्यांची घबराट होते. भाऊंनंतर आता घरातला कोणता सदस्य मृत्युमुखी होणार, यामुळे सगळ्यांच्या मनात धाकधूक निर्माण होते. आणि मग सुरू होतो श्रद्धा - अंधश्रध्देचा पाठशिवणीचा खेळ. हा खेळ मनोरंजन करतो की कंटाळा आणतो याचं उत्तर तुम्हाला पंचक पाहून कळेल. आता पंचक म्हणजे नेमकं काय? याचं उत्तरही तुम्हाला सिनेमा बघून कळेल. मी जास्त खोलात शिरत नाही.
एकूणच व्हेंटिलेटर नंतर खूप दिवसांनी मराठीमध्ये एक निखळ कौटुंबिक सिनेमा आलाय. पंचक मध्यंतराआधी एकदम मस्त झालाय. खोत कुटुंबातल्या समस्येशी आपण एकरूप होतो. काही प्रसंग धम्माल आणतात. तर काही प्रसंग हशा पिकवतात. कोकणातली घरं, निसर्ग आणि माणसांच्या स्वभावाची नस दिग्दर्शकाने अचूक पकडली आहे. सर्व कलाकारांची कामं सुध्दा अफलातून झाल्याने त्यांची आपापसातील केमस्ट्री बघायला मजा येते.
मध्यंतरानंतर मात्र पंचक थोडा खेचल्यासारखा वाटतो. काही प्रसंग लांबल्याने थोडीशी रंगत आणि गंमत कमी होते. पण तरीही कलाकारांचा अभिनय पंचकला शेवटपर्यंत तारतो. एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायला हवा तो म्हणजे.. राहुल आवटे आणि जयंत जठार या दिग्दर्शक जोडीने संगीताचा वापर चांगला केलाय. संगीतकार मंगेश धाकडे यांनी काही सहज सोप्पे प्रसंग ऑपेरा संगीताच्या माध्यमातून सुंदर खुलवले आहेत. विशेषतः 'पंचक शांती'चा सीन बॅकग्राऊंडला ऑपेरा वापरल्याने मस्त जुळून आलाय. त्यामुळे म्युझिकचा हुशारीने केलेला वापर वाखाणण्याजोगा.
आता अभिनयाबद्दल... सर्वात आधी उल्लेख तो म्हणजे दिलीप प्रभावळकर यांचा. खूप छोटी भूमिका वाट्याला येऊनही दिलीपकाकांनी भन्नाट काम केलंय. त्यांचा वावर माहोल प्रसन्न करतो. पंचकचा आवाजही त्यांचा असल्याने दिलीपकाकांना बघायला आणि ऐकायला मजा येते. त्यांच्या वाट्याला अजून प्रसंग असते तर आणखी छान वाटलं असतं असं राहून राहून वाटतं.
दुसरा उल्लेख तो म्हणजे भारती आचरेकर आणि सतीश आळेकर यांचा. दोघेही कसलेले कलाकार असल्याने त्यांच्यातली केमिस्ट्री पाहणं हा अविस्मरणीय अनुभव. दिलीप - भारती - सतीश आळेकर या दिग्गज नटांची अभिनय जुगलबंदी पाहणं ही सर्वांसाठी एक पर्वणी आहे.
इतर कलाकारांनी सुद्धा म्हणजे आदिनाथ कोठारे, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, दीप्ती देवी, नंदिता पाटकर, संपदा जोगळेकर कुलकर्णी, सागर तळशीकर, आशिष कुलकर्णी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर यांनीही आपापली कामं चोख पार पडली आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे या सर्वांची केमिस्ट्री एकमेकांशी जुळून आल्याने कोणीही अभिनय करतंय असं वाटत नाही.
पंचकची निर्मिती केलीय माधुरी दिक्षितने. भारतीय मनोरंजन विश्वावर तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने मोहिनी घालणारी माधुरी दिक्षित. मुळात आपल्या पहिल्यावहिल्या निर्मितीसाठी माधुरीने महाराष्ट्रातल्या मातीत घडणाऱ्या मराठी सिनेमाची निवड केली हे निश्चित कौतुकास्पद.
तर शेवटी एवढंच सांगावं वाटतं... नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मराठी मनोरंजन विश्वात एक हलकीफुलकी करमणूक करणारा पंचक आलेला आहे. माधुरी दिक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांनी सिनेमाची निर्मित केलीय. दोन घटका हसता हसता टेंशन विसरायचं असेल आणि निखळ करमणूक हवी असेल तर पंचक एकदा नक्कीच बघू शकता. माझ्याकडुन या सिनेमाला 3 स्टार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.