Prabha Atre : 'प्रभा अत्रे म्हणजे शास्त्रीय संगीतातील शास्त्रज्ञ!'

मला तर जर्मनी मधील भौतिक शास्त्राच्या पहिल्या महिला प्राध्यापक आणि अणुशास्त्रज्ञ लाईस मेटनर यांची आठवण आली.
Prabha Atre Indian Classical Vocal Artist Kiraana Gharaana
Prabha Atre Indian Classical Vocal Artist Kiraana Gharaana
Updated on

- रवींद्र मिराशी

गेल्या ३५-४० वर्षात विद्यावाचस्पती प्रभा अत्रे यांच्या सवाई मधील व अन्य अशा अनेक शास्त्रीय संगीत मैफली ऐकण्याचा प्रत्यक्ष योग मला आला. एखाद्या संगीतप्रेमीला अजून काय हवे असते!

एखाद्या कलाकाराच्या मैफलींची एकूण संख्या, बाजारात आलेल्या एकूण सीडी-कॅसेट, यु ट्यूब वरील चाहत्यांची संख्या अशा विविध प्रकारच्या विदावर आधारित (जणू मशीन लर्निंग निष्कर्ष) मापदंडाच्या पलीकडे जाऊन ताईंच्या शास्त्रीय संगीतातील योगदानाकडे पहावे लागेल. त्यांचे शास्त्रीय संगीतावर आधारित लेखन म्हणजे शोधनिबंध आहेत, असा भास होतो.

मला तर जर्मनी मधील भौतिक शास्त्राच्या पहिल्या महिला प्राध्यापक आणि अणुशास्त्रज्ञ लाईस मेटनर यांची आठवण आली. कारण एखाद्या विषयात संशोधनासाठी दोघींनी आयुष्य वेचले. ताईंना सुद्धा त्यांच्या शास्त्रीय संगीतातील संशोधनातून नवनवीन कल्पना सुचत गेल्या, आणि त्यातूनच त्यांनी काही नवीन रागांची भर देखील घातली. ताईंचे तरुणाईतील गाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध नसले तरी राग कलावती ('तन मन धन'), मारूबिहाग ('जागू मै सारी रैन'), किरवाणी ('नंदा नंदन') हे राग रचनेसहित संगीत श्रोत्यांच्या मेंदूत अक्षरशः कोरले गेले आहेत.

Prabha Atre Indian Classical Vocal Artist Kiraana Gharaana
असा सुरु झाला प्रभा अत्रेंचा संगीतमय प्रवास

हिटलर सत्तेत आल्यानंतर १३ जुलै १९३८ रोजी लाईस मेटनर यांनी डच शास्त्रज्ञांच्या मदतीने नेदरलँड गाठण्याचे पक्के केले. जर्मनीची सीमा ओलांडण्यासाठी प्रसंगी सीमा चौकीदाराला लाच देण्यासाठी ओट्टो हान यांनी आपली हिऱ्याची अंगठी दिली. सीमेवरून सुटका करून घेण्यात त्या यशस्वी झाल्या. या घटनेवरून प्रभाताईंच्या हिऱ्याच्या अंगठीची आठवण मला झाली. सवाई मधील त्यांच्या गायन कार्यक्रमासाठी मी त्यांना आणण्यासाठी हॉटेलमध्ये गेलो. त्या गाडीत बसल्यानंतर अस्वस्थ झाल्या. कारण निघताना त्यांनी हिऱ्याची अंगठी बोटात घातल्याचे त्यांना आठवत होते, परंतु बोटात अंगठी नव्हती.

मी ताईंना म्हटले की, परत आपण हॉटेलवर जाऊ शकतो. पुरेसा वेळ आपल्याकडे आहे. परंतु त्यांनी नकार दिला. कलाकार दरवाजाने गाडी रमणबाग शाळेमध्ये आत आली. ताईंच्या स्वागतासाठी अनेक मान्यवर उभे होते. या कालावधीमध्ये माझा दुसरा स्वयंसेवक मित्र पवन कलमदाने आणि मी गाडीत शोधाशोध चालू केली. पवनला ती अंगठी प्रथमतः दिसली. आम्ही ती अंगठी ताईंना दिल्यावर त्यांचा चेहरा खूप प्रसन्न झाला. कलाकारांच्या दालनामध्ये मी त्यांना सोडून येताना त्यांनी मला त्यांच्यासोबत खूप प्रसन्न मनाने फोटो काढू दिला. हे दुर्मिळ बक्षीस मी आजही जपून ठेवले आहे.

Prabha Atre Indian Classical Vocal Artist Kiraana Gharaana
Prabha Atre Death: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रेंचं निधन, संगीतविश्वातला तारा निखळला

एखादी व्यक्ती पूजनीय किंवा ऋषितुल्य अवस्थेत कधी पोहचते? ताईंच्या व्यक्तिमत्वाकडे खोलवर पाहिले की, अनेक गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. सातत्याने अनेक वर्षे एक पवित्र वर्तनाची अनुभूती देणारे त्यांचे व्यक्तिमत्व आहे.

शास्त्रीय संगीताच्या साधनेतून, तपश्चर्येतून आणि विद्या दानातून साकारलेले त्यांचे ऋषितुल्य व्यक्तिमत्व नक्कीच प्रेरित करते. त्यांच्या प्रत्येक गायन मैफिलीत लक्षवेधी ठरते ती त्यांच्या गायनातील शालीनता. ताईंच्या या सर्व गुणांच्या आधारे त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रासादिकता सुद्धा निर्माण होत राहिली, आणि ती त्यांच्या व्यक्तिमत्वात अखेर पर्यंत झिरपत राहिली. याची परिणती म्हणजे ताईंचे व्यक्तिमत्व संगीत रसिकांच्या नजरेत नकळत कधी पूजनीय होऊन गेले हे समजले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.