मुघल आणि इंग्रजांचे आक्रमण झाले. शिवछत्रपतींच्या जन्मासाठी मराठी जनतेला ४५० वर्षे वाट पाहावी लागली.
रत्नागिरी : हिंदू धर्म (Hinduism) विराट आहे. त्यामुळेच या धर्मातच अनेक योद्धे, साहित्यिक, दानशूर, स्वातंत्र्यसैनिक यांसह अष्टपैलू व्यक्तिमत्त्वं जन्माला आली; पण हिंदू धर्मातच का, याचा आपण कधी विचार केला आहे का? असा सवाल अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी केला.
मनाची मॅनेजमेंट करणारे मनाचे श्लोक समर्थ रामदासस्वामी यांनी लिहिले. संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी विसरलो. उद्याचा भारत घडवायचा असेल तर संस्कृती जतन केली पाहिजे. चांद्रयानसुद्धा चंद्रावर पाठवले पाहिजे आणि संस्कृतीही राखली पाहिजे. भारताला महासत्ता नव्हे विश्वगुरू व्हायचे आहे, असे प्रतिपादनही अभिनेते, व्याख्याते शरद पोंक्षे यांनी केले.
चतुरंग आणि रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या विद्यमाने ‘स्वातंत्र्याचे पूर्वरंग’ या अंतर्गत भारत-काल, आज आणि उद्या या विषयावर ते बोलत होते. या वेळी सभागृह तुडुंब भरले होते आणि अनेक श्रोते जिन्यातही थांबले होते. सुरवातीला वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी शरद पोंक्षे यांचा सत्कार केला.
पोंक्षे म्हणाले, राजमाता जिजाबाईंनी शिवरायांना लहानपणापासून श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या गोष्टी शिकवल्या. त्यामुळे श्रीराम व श्रीकृष्ण कधी अवलंबायचे, हे कळणारा एकमेव राजा शिवछत्रपती म्हणावे लागतील. ते राजकारण धुरंधर होते. श्री म्हणजे वीरश्री. शहाजीराजांनीसुद्धा मुघलांकडे चाकरी करत असूनही हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले होते. हे सर्व आम्ही विसरलो आहोत.
त्यामुळे मुघल आणि इंग्रजांचे आक्रमण झाले. शिवछत्रपतींच्या जन्मासाठी मराठी जनतेला ४५० वर्षे वाट पाहावी लागली. त्यांच्यानंतर आजही आपण पुन्हा शिवराय जन्म घेतील, याची वाट पाहत आहोत. भारत विश्वगुरू होण्याकरिता आपल्याला आपला वैभवशाली जुना इतिहास जाणून घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
भारतात बांधलेल्या इमारतींचे कारागिर भारतीयच होते. ब्रिटिशांना भारतावर राज्य करताना शेळपट, गुलाम तयार करायचे होते. तशी शिक्षणपद्धती मेकॉलेने काढली. संस्कृत भाषा हद्दपार केली. आपण वेद वाचायचे बंद केले. हिंदू असण्याचा अभिमान आपल्याला वाटत नाही, ही खंत पोंक्षे यांनी बोलून दाखवली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.