RRR Movie: ज्या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या तीन वर्षांपासून वाट पाहत होते तो आरआरआर हा नुकताच प्रदर्शित झाला. टॉलीवूडच्या या अॅक्शनपटानं बघता (Entertainment News) बघता प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या ट्रेलरला मिळालेला तुफान प्रतिसाद त्यानंतर रिलिज झालेलं गाणं, नाटो नाटो गाण्यातून (Tollywood News) ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण यांचा डान्स हे सारं प्रेक्षकांना कमालीचं भावलं होतं. त्यामुळे त्याची चर्चाही होते. तीनवेळा या चित्रपटाला प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. कोविडचा फटका बसला. आता या चित्रपटाला विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्स या (The Kashmir Files) चित्रपटाला सामना करावा लागणार असं बोललं जात होतं. मात्र आरआरआरचा रुबाबच वेगळा आहे. या चित्रपटानं प्रेक्षकांना मोठ्या संख्येनं थिएटरमध्ये खेचून आणलं आहे. त्यात बाहुबलीच्या दिग्दर्शकाचा नवा चित्रपट म्हणून RRR प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा ठरला आहे.
राजामौली (S S Rajamauli) यांचे चित्रपट पाहायला जाताना काही गोष्टी डोक्यातून बाहेर काढून ठेवाव्या लागतात. तर त्यांच्या चित्रपटाचा आनंद घेता येतो. म्हणजे टिपिकल लॉजिकल प्रश्न घेऊन तुम्ही त्यांच्या चित्रपटाला जोखण्याचं काम केलं की फसलात म्हणून समजा. जवळपास पाचशे कोटींपेक्षा अधिक बजेट असलेल्या RRR चं कामचं भव्य आहे. सेट, लोकेशन, व्हिएफएक्स, वेशभूषा, कलाकार, स्थानिक कलाकार हे जेव्हा आपण मोठ्या पडद्यावर पाहतो तेव्हा थक्क व्हायला होतं. मुळातचं RRR हा थिएटरवर अनुभवण्याचा विषय आहे. तो जर तुम्ही टीव्ही, मोबाईलवर पाहणार असाल तर मजाच नाही. RRR चा आवाज कमाल आहे. त्याचं संगीत, तो थरार, संवाद हे सांर काही थिएटरमध्येच आपण प्रभावीपणे अनुभवू शकतो. त्यासाठी RRR ला तोड नाही. रामचरण, ज्युनि. एनटीआर यांनी कमालीची मेहनत घेतली आहे. ती ठायीठायी दिसते.
RRR जेव्हा सुरु होतो तेव्हा नकळत आपण त्याचाच एक भाग होऊन जातो. हा चित्रपट एक वेगळ्याच प्रकारचा माहौल तयार करतो. त्यामुळे तीन तासांच्या या थरारपटात तुम्ही कुठेही रेंगाळत नाही. डबिंगच्या बाबत जरा तक्रार आहे. बाहुबलीचं जेवढं ताकदीचं डबिंग होतं तेवढं RRR चे नाही हे सांगावं लागेल, त्यामुळे ते थोडसं खटकतं. ब्रिटीशकालीन भारतामध्ये ब्रिटिशांनी कशाप्रकारे अन्याय, अत्याचार केला समाजातील गरीब समुहाला आपल्या फायद्यासाठी धारेवर धरलं. त्यांचा अमानुष छळ केला. हे सारं RRR मध्ये आपण पाहतो. वरवर पाहता स्टोरी आपल्याला ऐकल्यासारखी, वाचल्यासारखी वाटेल. मात्र ती ज्याप्रकारे पडद्यावर साकारण्यात आली आहे ते कमाल आहे. त्यामुळे RRR च्या वाटयाला गेात तर शंभर टक्के मनोरंजन होणार हे पक्कं लक्षात ठेवावं.
राजु आणि भीम यांच्या माध्यमातून RRR पुढे सरकतो. दोघेही देशभक्तच. पण त्याचं ते देशप्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे. एकजण ब्रिटीशांची चाकरी करुन देशासाठी काही वेगळं करण्याचा विचार करतो तर दुसरा थेट ब्रिटिशांना सळो की पळो करुन सोडतो. रामचरण आणि एनटीआरच्या पॉवरपॅक सादरीकरणानं चाहत्यांची मनं जिंकली गेली आहेत. थिएटरमध्ये तर दोघांच्या अभिनयाला उस्फुर्त दाद मिळते. खासकरुन त्यांनी नाटो नाटो गाण्यावर जो डान्स केला आहे तो पाहताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. तो डान्स डोळ्यांची पारणं फेडणारा आहे. असा डान्स यापूर्वी पाहिल्याचा आठवत नाही. दोघांमध्ये तुलनाच होऊ शकत नाही असं हे सादरीकरण आहे. कुणाला बेस्ट म्हणावं हा प्रश्न यावेळी आपल्याला पडत नाही. याचं कारण रामचरण आणि एनटीआरच्या मेहनतीला द्यावं लागेल.
राजामौली यांच दिग्दर्शन, के के सेंथिल कुमार यांचं छायाचित्रण, एम एम किरावाणी यांचं संगीत हे सारं भन्नाट आहे. त्यामुळे जेव्हा आपण RRR थिएटरमध्ये पाहतो तेव्हा तीन तास वेगळ्याच धुंदीत असल्याचं जाणवल्याशिवाय राहत नाही. क्लायमॅक्समध्ये रंगलेला थरार तर गजब आहे. त्यातील अॅक्शन, आवाज, सारं आपल्याला भुलावणारे आहे. एकुणच मनोरंजनाची शंभर टक्के खात्री देणारा चित्रपट म्हणुन RRR चा एकदा अनुभव घ्यायला हरकत नाही.
चित्रपट - RRR
दिग्दर्शक - एस एस राजामौली
कलाकार - ज्यु, एनटीआर, रामचरण, आलिया भट्ट, अजय देवगण
स्टार - ****
---------------------------------------------------------------------------------------------
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.