२५ जून १९८३ हा दिवस भारतीय क्रिकेटप्रमी कधीच विसरू शकत नाहीत. या दिवशी कपिलदेवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वकरंडक जिंकला होता. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डसवर वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघाला भारतीय क्रिकेट संघाने चारी मुंड्या चीत केले होते. तमाम भारतीयांची मान अभिमानाने उंचावेल अशी ही कामगिरी होती. देशाभिमान जागविणारी अशी ही घटना होती. याच ऐतिहासिक कामगिरीवर आधारित असा ‘८३’ हा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान (Kabir Khan) आणि यशराज फिल्मने आणलेला आहे. या चित्रपटामध्ये क्रिकेट तर आहेच, शिवाय भावनिकदृष्टय़ा खिळवून ठेवणारा, क्षणाक्षणाला मनामध्ये चैतन्याचा झरा फुलविणारा. तसेच आपला उत्साह अधिक वाढविणारा, उत्कंठा निर्माण करणारा आणि आपली छाती अभिमानाने फुगविणारा असा हा चित्रपट आहे. कबीर खानने या चित्रपटावर कमालीची मेहनत घेतलेली आहे. अगदी बारीकसारीक बाबींचा विचार ही कथा मांडताना केला आहे. (83 Movie Review)
क्रिकेटची ही गाथा सांगताना त्याने सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय गोष्टींवरही भाष्य केले आहे. त्यामुळे चित्रपट अधिक रंजक झाला आहे. भारतीय संघ उपांत्य फेरीत प्रवेश करील आणि त्यानंतर अंतिम फेरी गाठेल अशी कल्पना कोणीही केली नव्हती. टीम मॅनेजर पी. आर. मानसिंग यांना परतीचे तिकीट काढा, असे आदेशदेखील देण्यात आले होते. परंतु भारतीय संघाची उमेद व जिद्द मोठी होती. कर्णधार कपिलदेवचा आत्मविश्वास दांडगा होता. त्याच्या जोडीला सगळे जिगरबाज-लढवय्ये खेळाडू होते. त्यामुळे भारतीय संघाने एकेक सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत भारतीय संघाची गाठ इंग्लंडसारख्या झुंजार संघाशी होती. त्यामुळे भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचेल की नाही अशी शंका काही जणांना होती. परंतु इंग्लंडला नमवून भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली. आता अंतिम फेरीत गाठ होती बलाढ्य अशा वेस्ट इंडिज संघाबरोबर. वेस्ट इंडीज कर्णधार क्लाईव्ह लॉईडच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानात उतरला होता. यापूर्वीचे दोन्ही विश्वचषक या संघाने जिंकलेले होते. साहजिकच त्यांचे पारडे जड होते. परंतु भारतीय संघ करो या मरो या जिद्दीने तो मैदानात उतरला होता. सुनील गावसकर, के. श्रीकांत, यशपाल शर्मा, संदीप पाटील, मोहिंदर अमरनाथ, कपिलदेव, कीर्ती आझाद. राॅजर बिन्नी, मदनलाल, सय्यद किरमानी, बलविंदरसिंग संधू असे एकापेक्षा एक सरस खेळाडू भारतीय संघात होते. जिद्द, चिकाटी आणि जिगरबाज खेळी करून भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करून दाखविली. 83 या चित्रपटामध्ये भारतीय क्रिकेटची हीच यशोगाथा मांडण्यात आली आहे.
रणवीर सिंह (कपिल देव), दीपिका पदुकोन (रोमी देव), पंकज त्रिपाठी ( पी. आर. मानसिंग), साकीब सलीम (मोहिंदर अमरनाथ), जिवा (के. श्रीकांत), अॅमी विर्क (बलविंदरसिंग संधू), हार्डी संधू (मदनलाल), निशांत दहीया (रॉजर बिन्नी), जतीन शरना (यशपाल शर्मा), चिराग पाटील (संदीप पाटील), साहिल खट्टर (सय्यद किरमानी), ताहीर राज बसीन (सुनील गावसकर), धैर्या कारवा (रवी शास्त्री), दिनकर शर्मा (कीर्ती आझाद), आर. बद्री (सुनील वॉल्सन), आदिनाथ कोठारे (दिलीप वेंगसरकर) अशा सगळ्याच कलाकारांनी अभिनयाचे चौकार आणि षटकार लगावलेले आहेत. रणवीर सिंहचा कपिलदेवच्या भूमिकेतील अंदाज पाहण्यासारखाच आहे. त्याने आपली छाप चांगलीच या भूमिकेवर उमटविली आहे. दीपिकाची छोटीशी भूमिका उल्लेखनीय आहे. पंकज त्रिपाठीनं आपलं अष्टपैलूत्व सिद्ध केले आहे. दिग्दर्शक कबीर खानने या चित्रपटासाठी खूप संशोधन केलेले दिसते आहे. संगीतकार प्रीतमचे संगीत जमून आले आहे. सिनेमॅटोग्राफर असीम मिश्रा यांनी आपल्या कॅमेऱ्याची जादू दाखविली आहे. हा चित्रपट म्हणजे भारतीय क्रिकेट संघाच्या अविस्मरणीय विजयाची यशोगाथा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.