ऑन स्क्रीन : शाबास मिथू : मिताली राजचा प्रेरणादायी प्रवास

‘शाबास मिथू’ या चित्रपटात भारताची महिला क्रिकेटची स्टार खेळाडू मिताली राजचा जीवनप्रवास मांडण्यात आला आहे.
shabash mitu movie
shabash mitu moviesakal
Updated on
Summary

‘शाबास मिथू’ या चित्रपटात भारताची महिला क्रिकेटची स्टार खेळाडू मिताली राजचा जीवनप्रवास मांडण्यात आला आहे.

‘शाबास मिथू’ या चित्रपटात भारताची महिला क्रिकेटची स्टार खेळाडू मिताली राजचा जीवनप्रवास मांडण्यात आला आहे. मितालीचा एक नृत्यांगना ते सुपरस्टार खेळाडू हा प्रवास कसा झाला, या प्रवासात तिच्यासमोर कोणकोणती आव्हाने आणि संकटे आली, तिच्या कुटुंबीयांची तिला साथ कशी लाभली, समाजाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता आदी अनेक गोष्टींचे वास्तव चित्रण या चित्रपटात आहे. दिग्दर्शक सुजित मुखर्जीने ही कथा मांडताना भारतीय महिला क्रिकेट संघाची अवस्था, त्यांना भेडसावणारे विविध प्रश्न आणि त्यांच्या समस्या या गोष्टींवरही परखड भाष्य केले आहे.

कथेची सुरुवात मितालीच्या बालपणापासून होते. लहान असताना मिथू भरतनाट्यम शिकत असते. तेथे तिची भेट नुरीशी होते. नुरी अत्यंत अवखळ आणि बिनधास्त अशी मुलगी असते. मिथू आणि नुरीची गट्टी जमते. मिथूमधील प्रतिभा पहिल्यांदा नुरी ओळखते आणि ती तिला क्रिकेट खेळण्यास प्रोत्साहन देते. एके दिवशी नुरी आणि मिथू क्रिकेट खेळत असताना प्रशिक्षक संपत सरांची नजर त्यांच्यावर पडते आणि त्या दोघींनाही प्रशिक्षण देण्यास ते सुरुवात करतात. त्या दोघींच्या प्रतिभेवर त्यांचा विश्वास असतो. त्या दोघीही कठोर मेहनत आणि परिश्रम घेऊन प्रशिक्षण घेत असतात. त्यानंतर राष्ट्रीय संघात निवड होण्याचा दिवस येतो. त्याच वेळी नुरीचा निकाह होतो आणि मिताली भारतीय महिला क्रिकेट संघात पोहोचते. त्यानंतर येथून मितालीचा वेगळा प्रवास सुरू होतो.

आपल्या बॅटने शतकामागून शतके झळकावून ती सगळ्यांना आश्चर्यचकित करते. आपली निवड सार्थ ठरवून एकापाठोपाठ एक विक्रम प्रस्थापित करते. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उन्नतीसाठी आणि उत्कर्षासाठी सतत प्रयत्न करते. भारतीय महिला क्रिकेट संघाला मिळणाऱ्या अपुऱ्या सोयीसुविधा आणि त्यांचे काही प्रश्न घेऊन ती क्रिकेट बोर्डाकडे दाद मागते. महिला क्रिकेटच्या प्रगतीसाठी ती सातत्याने झटते. असा एकूणच तिचा प्रवास या चित्रपटात पाहायला मिळतो. मितालीला महिला क्रिकेटची सचिन तेंडुलकर म्हटले जाते. विश्वकरंडक स्पर्धेत तिच्या नेतृत्वाखाली दोन वेळा भारतीय महिला संघाने अंतिम फेरीत धडक मारलेली आहे. मितालीचा हा प्रेरणादायी प्रवास दिग्दर्शकाने छान रेखाटला आहे. केवळ क्रिकेट न दाखविता बालपणी तिने घेतलेले कष्ट, कुटुंबाची साथ यांचाही विचार करण्यात आला आहे.

तापसी पन्नूने मितालीची व्यक्तिरेखा साकारताना घेतलेली मेहनत पडद्यावर दिसते. तिच्या नावावर आणखीन एक वेगळी भूमिका जमा झाली आहे. प्रशिक्षकाच्या भूमिकेतील विजय राज चपखल बसले आहेत. छोट्या मिथूच्या भूमिकेत इनायत वर्मा आणि नूरीच्या भूमिकेत कस्तुरी जगनम यांनी चमकदार कामगिरी केली आहे. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी उत्तम. मात्र, काही दृश्ये कमालीची ताणली गेल्याने चित्रपट संथगतीने वाटचाल करतो. संगीतकार अमित त्रिवेदीने निराशा केली आहे. एकूणच, भारतीय महिला क्रिकेटची सुपरस्टार मिताली राजचा हा प्रेरणादायी प्रवास एकदा पाहण्यासारखा नक्कीच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.