सध्याचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आहे. तंत्रज्ञानामध्ये वेगवेगळे शोध लावले जात आहेत आणि विविध प्रयोगदेखील केले जात आहेत. आजच्या आधुनिक युगात मानवाची जागा रोबोट कितपत घेईल, यावरदेखील संशोधन केले जात आहे. अशातच आता प्रदर्शित झालेल्या ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ या चित्रपटामध्ये रोबोट आणि मानव यांची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे.
दिग्दर्शक अमित जोशी आणि आराधना शाह या जोडीने एक वेगळी कथा-कल्पना या चित्रपटात मांडलेली आहे आणि विशेष म्हणजे या कथेला ट्रिटमेंट उत्तम दिली आहे. रोमान्सबरोबरच विनोद आणि विज्ञान यांची सांगड घालण्याचा प्रयत्न दिग्दर्शक द्वयींनी केला आहे. त्यांच्या या प्रयत्नाला शाहिद कपूर, क्रिती सेनॉन, डिम्पल कपाडिया आदी कलाकारांनी आपल्या उत्तम अभिनयाने चार चांद लावलेले आहेत.
खरं तर हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांच्या रोबोट या चित्रपटाची आठवण येणे साहजिकच आहे; परंतु त्या चित्रपटामध्ये रोबोट मानवाच्या प्रेमात पडतो आणि या चित्रपटात मानव रोबोटच्या प्रेमात पडलेला दाखवण्यात आला आहे.
आर्यन अग्निहोत्री (शाहिद कपूर) हा रोबोटिक्स इंजिनियर असतो. तो आपल्या आई-वडील आणि अन्य कुटुंबीयांसमवेत एकत्रित कुटुंबामध्ये राहात असतो. आता त्याचे लग्नाचे वय झाल्यामुळे पूर्ण कुटुंब त्याने लवकरात लवकर लग्न करावे, असा तगादा त्याच्या मागे लावतात. त्याच्यासाठी मुलीही पाहतात; परंतु तो काही लग्नाचा विचार मनात आणत नाही. कारण त्याला कोणतीही मुलगी पसंत पडत नाही.
अशातच त्याची मावशी उर्मिला (डिम्पल कपाडिया) त्याला एका प्रोजेक्टवर काम करण्यासाठी अमेरिकेत बोलावून घेते. ती एका रोबोटिक्स कंपनीची मालकीण असते आणि गेली कित्येक वर्षे ती रोबोट्सवर निरनिराळे प्रयोग करीत असते. साहजिकच तिच्या आग्रहास्तव आर्यन अमेरिकेत पोहोचतो. तेथे मावशीने त्याची काळजी घेण्यासाठी सिप्रा (क्रिती सेनॉन) नावाच्या रोबोटला ठेवलेले असते.
या सिप्राचे एकूणच रूप, गुण आणि सौंदर्य पाहून आर्यन तिच्या प्रेमात पडतो. त्यानंतर सिप्रा ही मुलगी नसून एक रोबोट आहे हे आर्यनला समजल्यानंतर या कथेमध्ये मोठा ट्विस्ट येतो. आर्यन मनाने हळवा आणि भावुक असतो. तो आपल्या भावनांना आवर घालण्यात अयशस्वी ठरतो आणि आपल्या मावशीला विनंती करून सिप्रा या रोबोटला भारतात आणतो. कुटुंबीयांना आपण सिप्राशी लग्न करणार आहे, असे सांगतो. मग त्यानंतर कशा आणि कोणत्या गमतीजमती घडतात, हे विनोदी ढंगाने पडद्यावर मांडलेले आहे.
दिग्दर्शक अमित जोशी आणि आराधना शाह यांच्या या कथा-कल्पनेला आणि त्यांच्या उत्तम मांडणीला दाद द्यावीच लागेल. कारण चित्रपटामध्ये विनोदाबरोबरच नाट्य, प्रेम आणि रोमान्स असा सगळा मसाला त्यांनी उत्तम भरलेला आहे. चित्रपटातील गाणी ‘तेरी बातो में ऐसा उल्झा जिया’ आणि ‘अंखियां गुलाब’ ही अगोदरच लोकप्रिय ठरलेली आहेत आणि या गाण्याची कोरिओग्राफी उत्तम झाली आहे.
तसेच ‘तुम से...’ आणि ‘लाल पिली अखियां’ या गाण्यांनादेखील चांगली पसंती मिळाली आहे. अर्थात क्रिती आणि शाहिदने धमाकेदार नृत्य केले आहे. खरे तर शाहिद आणि क्रिती पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करीत आहेत; परंतु त्यांची पडद्यावरील केमिस्ट्री छान जमली आहे. त्या दोघांनी चित्रपट आपल्याच खांद्यावर घेतलेला आहे. आर्यनच्या भूमिकेत शाहिदने; तर सिप्राच्या भूमिकेत भूमिकेत क्रितीने चांगलेच गहीरे रंग भरलेले आहेत.
लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटातील सिनेमेटोग्राफी अतिशय चांगल्या प्रकारे हाताळली आहे. पडद्यावर क्रिती सुंदर दिसली आहे; तर शाहिदचा मस्तमौला आणि रोमँटिक अंदाज सगळ्यांना आवडेल असाच आहे. धर्मेंद्र, डिम्पल कपाडिया, राकेश बेदी, ग्रुषा कपूर, राजेश कुमार, आशिष वर्मा आदी कलाकारांनी आपापली कामे चोख केली आहेत.
तांत्रिक बाबींमध्येही चित्रपट सरस आहे. तरीही चित्रपटाची कथा विकसित करण्यात दिग्दर्शकांनी अधिक वेळ घेतला आहे. काही बाबी अतार्किक वाटतात. त्यामुळे निराशा येते खरी. मात्र चित्रपट हसतखेळत पुढे सरकतो. मनाची छान पकड घेतो आणि पुढील भाग येणार याची कल्पना देतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.