Shiv Thakare Ganpati Utsav 2023: गणेश चतुर्थी उद्या 19 सप्टेंबरला आहे. अनेक दिवसांपासून गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरात सुरू होती.
चित्रपट आणि टीव्ही सेलिब्रिटींनी आपल्या घरी गणपती बाप्पा आणण्यास सुरुवात केली आहे. यात बिग बॉस १६ फेम मराठमोळ्या शिव ठाकरेने यांनीही आपल्या घरी गणपती बाप्पाचे स्वागत केले. पण यावेळचा शिव ठाकरेंचा गणपती सगळ्यांपेक्षा खास आणि वेगळा आहे.
शिव ठाकरेने यंदा त्याच्या घरी पोलिसांचा गणवेश परिधान केलेले गणपती बाप्पा घरी आणले. यानिमित्ताने रात्रंदिवस सेवेत तत्पर असलेल्या मुंबई पोलिसांना शिव ठाकरेने अनोखी मानवंदना दिली. शिव ठाकरेच्या गणपती बाप्पाची सध्या सगळीकडे चर्चा होतेय.
शिव ठाकरेच्या बाप्पाचं वर्णन करायचं झाल्यास त्याने खाकी वर्दी परिधान केलीय. याशिवाय त्याच्या हातात वायरलेस फोन आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्ते शिवच्या घरी बाप्पा विराजमान झालाय.
शिव ठाकरेने सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी पोलीस थीम असलेला गणपती बाप्पा किती धूमधडाक्यात घरी आणला हे दाखवून दिले आहे. या उत्सवात 50 पोलिसही सहभागी झाले होते आणि त्यांनी भरपूर डान्स केला.
गणेश चतुर्थी आणि विसर्जन कधी?
गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर रोजी आहे आणि उत्सव 10 दिवस चालणार आहे, त्यानंतर 28 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन होईल. हा सण साजरा करण्यासाठी शिव ठाकरे खूप उत्सुक आहेत.