अभिनेता श्रेयस तळपदे Shreyas Talpade आणि सुरेश सावंत यांनी सुप्रसिद्ध नाटक अलबत्या गलबत्याचा सेट चोरल्याचा आरोप निर्माता राहुल भंडारे यांनी केला. कोरोनाच्या प्रभावामुळे लॉकडाऊन काळात सर्व थिएटर सहित नाट्यसृष्टी बंद आहे. त्यामुळे माझ्या अलबत्या गलबत्या या नाटकाचा सेट प्रवीण भोसले यांच्या गोडाउनमध्ये कोळसा बंदर, काळा चौकी येथे ठेवण्यात आला होता. मात्र तो सेट कोणतीही पूर्वकल्पना न देता सुरेश सावंत यांनी गोडाऊन मालकास खोटे सांगून गोडाऊन मधून चोरून श्रेयस तळपदे यांच्या OTT प्लॅटफॉर्म च्या भक्षक या एकांकिकेच्या शूटसाठी वापण्यात आला, असा आरोप भंडारेंनी केला. भंडारे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं श्रेयसने म्हटलंय. या संपूर्ण प्रकरणात श्रेयसने त्याची बाजू मांडली आहे.
श्रेयसने मांडली आपली बाजू-
'पहिली गोष्ट म्हणजे ‘नाइन रसा’वर सादर झालेली विविध भाषांमधील सर्व नाटके किंवा एकांकिकांच्या सादरीकरणाची जबाबदारी व्यावसायिक निर्मात्यांवर सोपवण्यात आली आहे. त्यांच्याशी आम्ही एक रितसर करार करतो. त्यामध्ये नाटकाशी संबंधित विविध हक्क तसेच इतर गोष्टींचा समावेश असतो. हे निर्मातेच आपल्या कलाकृतीमध्ये कोणते नेपथ्य वापरायचे आहे, याचा निर्णय घेतात. त्याच्याशी ‘नाइन रसा’ या प्लॅटफॉर्मचा काहीच संबंध नसतो. आमच्या प्लॅटफॉर्मसाठी ‘भक्षक’ या नाटकाची निर्मिती प्रसिद्ध निर्माते-अभिनेते सुशांत शेलार यांच्या कंपनीतर्फे करण्यात आलेली आहे. त्यामुळे ‘भक्षक’मध्ये वापरलेला सेट हा नवीन आहे की अन्य कोणाचा आहे, तो आमच्या एकांकिकेत कोठून आला याची मला वैयक्तिकरित्या काहीच कल्पना नाही. त्यामुळे भंडारी यांना सेटबद्दल काही आक्षेप असतील तर त्यांनी आधी या एकांकिकेचे निर्माते सुशांत शेलार यांच्याशी संपर्क साधायला हवा होता. तसे न करता त्यांनी या प्रकाराबद्दल थेट मला वैयक्तिकरित्या जबाबदार धरून पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रकार अत्यंत अनुचित आणि माझ्या समाजातील प्रतिमेला धक्का देणारा आहे.'
'दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये गेल्या काही महिन्यांपासून आमच्या विविध भाषांमधील कलाकृतींचे चित्रीकरण सुरू आहे. करोना काळात रंगभूमीवरील व्यावसायिक नाटकांच्या प्रयोगांच्या सादरीकरणाला बंदी असली तरी ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी काही अटी आणि शर्तींसह नाटक-एकांकिकांच्या चित्रीकरणास परवानगी होती. त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने आखून दिलेल्या सर्व अटी आणि नियमांचे पालन करूनच आम्ही हे चित्रीकरण केले आहे. त्यासाठी पोलीस, महापालिका आदी यंत्रणांची रितसर परवानगी आम्ही घेतलेली आहे. त्याबद्दलची सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत. तसे आम्ही केले नसते तर सावरकर स्मारकाच्या व्यवस्थापनाने आम्हाला त्यांचे सभागृह चित्रीत करण्याची परवानगी दिली नसती. हे वास्तव असूनही राहुल भंडारी यांनी प्रसिद्धी माध्यमांकडे पाठविलेल्या पत्रामध्ये आम्ही सावरकर स्मारकामध्ये बेकायदा चित्रीकरण केल्याचा आणि नियमांचा भंग केल्याचा आरोप केला आहे. हा आरोपदेखील धादांत खोटा आहे. हे सर्व आरोप असूयेपोटी केले असावेत, असे मला वाटते.'
'अशा प्रकारचे आरोप होणे हे अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळे नेमके काय घडलेय, याची शहानिशा न करता थेट माझ्यावर असे बिनबुडाचे आरोप करणे, हे योग्य नाही. ‘नाईन रसा’ प्लॅटफॉर्मची वाढती लोकप्रियता लक्षात आल्यामुळेच कदाचित ‘चीप पब्लिसिटी’च्या दृष्टीने असे आरोप झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे झाल्या प्रकाराबाबत भंडारे यांच्याविरुद्ध कायदेशीर प्रक्रियेद्वारे मानहानीचा दावा करण्याचाही मी विचार करीत आहे.'
राहुल भंडारे यांचे आरोप-
महाराष्ट्रभर नाट्यगृह चालू ठेवण्यास मनाई असतानादेखील लॉकडाऊन काळात शासनाच्या नियमाचे उल्लंघन करत, बेकायदेशीररित्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे अलबत्याचा गलबत्या नाटकाचा सेट वापरून कमर्शिअल शूटिंग करण्यात आल्याचा आरोप राहुल भंडारे यांनी केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.