सोनाली कुलकर्णी साकारणार रणरागिणी 'छत्रपती ताराराणी'

sonalee kulkarni
sonalee kulkarni
Updated on

छत्रपती महाराणी ताराबाई भोसले... मुघलांना सळो की पळो करून सोडणाऱ्या या रणरागिणी म्हणजे महाराष्ट्रातल्या इतिहासातील एक कर्तृत्ववान राजस्त्री होत्या. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या आणि छत्रपती राजाराम भोसले यांच्या पत्नी असणाऱ्या ताराबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामागे कणखरपणे स्वराज्याची धुरा सांभाळली. त्या एक उत्तम राजकारणी, व्यवस्थापिका तर होत्याच याव्यतिरिक्त एक आदर्श सून, पत्नी आणि माता या जबाबदाऱ्याही त्यांनी पार पाडल्या. अशा या रणरागिणीची शौर्यगाथा सर्वांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने राहुल जनार्दन जाधव दिग्दर्शित 'छत्रपती ताराराणी' या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. डॉ. जयसिंगराव पवार लिखित 'मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी' या चरित्रग्रंथावर आधारित या चित्रपटात ताराराणीची भूमिका मराठीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी साकारणार आहे. 

'छत्रपती ताराराणी' या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक राहुल जाधव सांगतात, ''छत्रपती ताराराणी चित्रपटाद्वारे फक्त एक व्यक्तिचित्र रेखाटण्याचा नाही तर एक अद्वितीय व्यक्तिमत्व जगापुढे मांडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, ज्याचा आदर्श आजच्या पिढीने, विशेषतः स्त्रियांनी जरूर घ्यावा. कारण त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते.'' 'हिरकणी'नंतर सोनाली पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या भूमिकेविषयी ती म्हणाली, ''छत्रपती ताराराणींचे प्रेरणादायी आयुष्य आणि तडफदार व्यक्तिमत्व पडद्यावर साकारण्याचे भाग्य लाभणे म्हणजे एका कलाकारासाठी किंबहुना एका मराठी मुलीसाठी तिच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याच बरोबरीने आजवर ज्या रणरागिणीविषयी कुठल्याही चलचित्र माध्यमात वाच्यता झालेली नाही  तिच्या कर्तृत्वाचे पोवाडे गाणे हे अत्यंत आव्हानात्मक काम असेल, त्यामुळे ही भूमिका मला खूपच जबाबदारीने पार पाडायची आहे. त्यासाठी श्रींचा आणि महाराजांचा आशिर्वाद आम्हाला लाभो, आई भवानीने आमच्या मनगटात ही कामगिरी पार पाडण्याचे बळ द्यावे, हीच प्रार्थना.'' 

औरंगजेबासारख्या क्रूर, बलाढ्य आणि महत्वाकांक्षी पातशहाला लढा देणाऱ्या या रणरागिणीची शौर्यगाथा आणि तिचे वैयक्तिक आयुष्य प्रेक्षकांना 'छत्रपती ताराराणी'च्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात होणार आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.