Sooryavanshi Movie Review: एन्टरटेन्मेंट, एन्टरटेन्मेंट आणि एन्टरटेन्मेंट... दिग्दर्शक रोहित शेट्टीचा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचं पुरेपूर पॅकेज असतं. त्याचे ‘गोलमाल’, ‘सिंघम’ आणि ‘सिम्बा’ असे काही चित्रपट त्याचे उत्तम उदाहरण. नुकताच प्रदर्शित झालेला ‘सूर्यवंशी’ही त्याच पठडीत बसणारा टिपिकल रोहित शेट्टी स्टाईल चित्रपट... डोळ्यांचं पारणं फेडणारी अॅक्शन दृष्यं, हवेत उडणारी वाहनं, कॉमेडीचा तडका वगैरे वगैरे सगळा मसाला त्यात ठासून भरलेला आहे. ‘सिंघम’ आणि ‘सिम्बा’ चित्रपटांच्या यशानंतर रोहितचं पोलिसांवरील प्रेम वाढलंय. त्याचाच परिणाम म्हणून की काय, अक्षय कुमारला दहशतवादविरोधी पथकाचा प्रमुख सूर्यवंशी बनवून त्याने आणलंय. चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये अक्षयबरोबरच रणवीर सिंग आणि अजय देवगण यांची झालेली एन्ट्री म्हणजे प्रेक्षकांसाठी वेगळीच ट्रिट आहे. चित्रपट अडीच तास छान करमणूक करणारा आहे.
चित्रपटाची कथा कर्तव्यनिष्ठ आणि देशभक्त पोलिस अधिकारी वीर सूर्यवंशी (अक्षय कुमार) याच्या भोवती फिरणारी आहे. सूर्यवंशी आपली पत्नी (कतरिना कैफ) आणि मुलाबरोबर आयुष्य जगत असला तरी त्याचं आपल्या कर्तव्यावर-नोकरीवर खूप प्रेम असतं. मुंबईत झालेल्या बॉम्बहल्ल्यात त्याने आपल्या आई-वडिलांना गमावलेलं असतं. बॉम्बहल्ल्याचा मास्टरमाइंड बिलाल (कुमुद मिश्रा) आणि ओमर हफीज (जॅकी श्रॉफ) यांना शोधून काढणं, हेच त्याच्या आयुष्याचं ध्येय बनतं. मुंबई बॉम्बहल्ल्यासाठी प्रत्यक्षात एक हजार किलो आरडीएक्स आलं होतं. त्यापैकी केवळ ४०० किलो स्फोटासाठी वापरलं गेलं. उरलेलं ६०० किलो आरडीएक्स अजूनही मुंबईत लपवून ठेवल्याची गुप्त माहिती त्याला मिळते. मुंबईत पुन्हा एका मोठ्या बॉम्बस्फोटाच्या कटाचे धागेदोरेही त्याच्या हाती लागतात. मग सूर्यवंशी कट हाणून पाडण्यासाठी अक्षरश: जीवाचं रान करतो. दहशतवाद्यांचा कट उधळून लावण्याचा तो प्रयत्न करतो आणि त्यामध्ये सिम्बा (रणवीर सिंग) आणि सिंघम (अजय देवगण) त्याला साथ देतात. तिघेही पोलिस अधिकारी कशा प्रकारे दहशतवाद्यांचा डाव हाणून पाडतात आणि मुंबईला कसं वाचवतात, हे चित्रपटात पाहणं उत्तम ठरेल. चित्रपटात विनोदाबरोबरच अॅक्शन, रोमान्स आणि रोमांच असा सगळा मसाला पुरेपूर भरण्यात आलाय.
दिग्दर्शक रोहित शेट्टीची ही कथा आहे. त्याने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्नही केलाय. अक्षय कुमार, कतरिना कैफ, जॅकी श्रॉफ, जावेद जाफरी, कुमुद मिश्रा, अभिमन्यू सिंग, गुलशन ग्रोव्हर आदी कलाकारांचा दमदार अभिनय आहे. अक्षयबरोबरच अजय आणि रणवीर यांनी धमाकेदार एन्ट्री केलीय. क्लायमॅक्समध्ये तिघांच्या अॅक्शनबरोबरच विनोदनिर्मितीही छान होते. कतरिनाने चांगली साथ दिलीय. तांबेची भूमिका साकारणारा पोलिस अधिकारी आशिष वारंग लक्षात राहणारा आहे. त्याने आपली भूमिका मस्त वठवली आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधवची छोटी झलक सुखावह आहे. चित्रपटाचं पार्श्वसंगीत चांगलं जमून आलंय. ‘टिप टिप बरसा पानी’ आणि ‘छोडो कल की बाते’ गाणी रिक्रिएट करण्यात आलीयत. त्यांचं चित्रणही उत्तम आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध काहीसा लांबलेला वाटतो. त्यामुळे चित्रपट मोठा झालाय. तरीही मनोरंजनाचं एक उत्तम पॅकेज देण्यात रोहित शेट्टी आणि टीम यशस्वी झालीय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.