Hiroshima Day; जगात जपानी माणसाला चँलेज नाही, गोष्ट'हिरोशिमा'ची

हिरोशिमा दिनानिमित्तानं त्याच नावानं प्रदर्शित झालेल्या माहितीपटाचं विश्लेषण...
hiroshima day
hiroshima day
Updated on

- प्रा.संदीप गिऱ्हे

मानवी इतिहासामध्ये अनेक संहार झालेले आहेत. त्यात काही भूकंप, दुष्काळ अशी नैसर्गिक आहेत. तर काही युद्ध, दंगली अशी मानवनिर्मित आहेत. अणुबॉम्ब हे यासाठी सर्वात संहारक मानवनिर्मित शस्त्र. हिरोशिमा आणि नागासाकी ह्या त्याच्या मानवी इतिहासातील न मिटणाऱ्या खुणा. या संहाराच्या भौतिक खुणा कदाचित कधीतरी मिटूनही जातील. पण त्या वेदनेची सल मानवी अस्तित्वा पर्यंत टिकून राहील. हाच अनुभव देणारा माहितीपट म्हणजे ‘हिरोशिमा. पॉल विल्मशर्स्ट यांनी दिग्दर्शित केलेला आणि ०७ ऑगस्ट २००५ रोजी बीबीसीने प्रदर्शित केलेला हा माहितीपट.

जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अमेरिकेने केलेले अणुबॉम्ब हल्ले हा दुसऱ्या महायुद्धातील निर्णायक क्षण होता. या घटनेने दुसरे महायुद्ध जवळपास संपवले. परंतु या दोन क्षणात जवळपास साडेतीन लाख लोक मारली गेली. एवढ्या कमी सेकंदात एवढा संहार झालेली ही मानवी इतिहासातील एकमेव घटना असावी. मात्र या माहितीपटाचे वैशिष्ट्य म्हणजे एवढ्या मोठ्या घटनेबद्दल या माहितीटात कुठलेली भाष्य केलेले नाही. या घटनेबद्दल कुणावरही दोषारोप केलेले नाहीत, कुणाकडेही बोट दाखवलेले नाही, कुणावरही आरोप केलेले नाहीत, कुणालाही माफी मागायला लावलेली नाही आणि कुणाबद्दल अवास्तव आस्थाही दाखवलेली नाही. माहितीटात दिसतं ते फक्त घटनेचं तटस्थ चित्रण. खूप अस्वस्थ करणारं, असह्य वेदनेनं भरलेलं एक कथन. या घटनेची भयानकता व घटनेतील सहभागी लोकांचे अनुभव या मिश्रणातून संपूर्ण माहितीपट मांडलेला आहे. त्यासाठी अनेक तपशिलांचे पुनर्निर्माण, काही अर्कायव्हल चित्रफिती, काही ग्राफिक्स अशा मिश्रणातून विषय सूत्रबद्धपने उलगडून दाखवलेला आहे.

विशेषतः अणुबॉम्ब स्फोटातून होरपळून निघालेल्या लोकांचे अनुभव खूप दाहकपणे परंतु तटस्थपणे घडलेल्या घटनांचा पट आपल्यासोमार ठेवतात. डॉ. हिदा, नर्स किनुको दोई, सात आठ वर्षाचा ताकाशी अशा अनेक प्रत्यक्षदर्शींचे अनुभव ‘त्या’ घटनेला जिवंत करतात. अणुबॉम्ब टाकण्याच्या खूप आधीपासून आणि अणुबॉम्ब टाकल्यानंतर पुढे बराच काळ असा तीन आठवड्याचा विस्तीर्ण पट पाहताना खूपच अवस्थ व्हायला होतं. मात्र माहितीपट पाहून झाल्यानंतर आपण आपल्यातील माणूसपणाचा नव्याने शोध घेतो ही खरी या माहितीपटाची कमाल आहे.

दिग्दर्शकाने घटनेच्या दोन्ही बाजू तटस्थपणे मांडलेल्या आहेत. अणुबॉम्ब टाकण्याचा निर्णय घेणारे, तो टाकण्याची तयारी करणारे आणि तो टाकणारे अशी घटनेची या बाजूची परिस्थिती. तर अणुबॉम्ब टाकल्या जाण्याच्या वेळी आधी आणि नंतरचं हिरोशिमातील वातावरण, तिथल्या लोकांचे दैनंदिन जगणे, अणुबॉम्बने झालेली वाताहत, त्यानंतरची परिस्थिती ही बाजू अधिक तपशीलवारपणे मांडलेली आहे. एका क्षणात जाळून खाक झालेलं शहर, पायरीवर बसल्या ठिकाणी जळून वाफ झालेल्या लोकांचे बसल्या ठिकाणी फरशीवर पडलेले काळे डाग या घटनेची विदारकता स्पष्ट करतात. स्पोटानंतर कोळसा होऊन पडलेल्या मृतदेहांचा खच, जखमींवर उपचारासाठी दवाखानाही नाही आणि औषधीही नाही. दवाखान्याच्या इमारती स्फोटात उध्वस्त झालेल्या. जखमी नर्स आणि डॉक्टर आपली वेदना विसरून इतरांवर मिळेल तेथे मिळेल त्यावर उपचार करत आहेत मात्र उपचार करण्यासाठी काही नाही. जखमी अवस्थेत दु;खानं विव्हळत लोक मरणाची वाट पाहत आहेत अशी भयावह परिस्थिती पाहून भितीने थरकाप उडतो.

तहानलेल्या लोकांना प्यायला पाणी नाही. जखमी तहानलेली लोक पाण्यासाठी तलावात मोडून पडत आहेत. तेही पाणी पिण्यासारखं नाही. काही काळाने या जळणाऱ्या शहरावर काळा पाऊस पडायला सुरवात होते. सर्व जाळून हवेत उडणारी राख घेऊन पावसाचे काळ्या पाण्याचे थेंब तहानलेल्या नजरेने काळ्याभोर आकाशाकडे पाहणाऱ्या चेहऱ्यावर पडतात. अतीव वेदना आणि दुःखाचा हा संहार.अणुबॉम्बच्या स्फोटाने क्षणात होत्याचे नव्हते केले एवढ्यावरच हा संहार थांबत नाही. अणुबॉम्बच्या स्फोटाने झालेल्या रेडिऐशन ने अनेक लोक हळूहळू वर्षानुवर्ष मरण भोगत राहिली. मानवी जीवांचा संहार एवढ्यापुरताच हा विनाश मर्यादित नव्हता तर तांदूळ पिकवणाऱ्या समृद्ध जमिनी सुद्धा वांझोट्या होऊन पडल्या होत्या.

hiroshima day
सेलिब्रेटींच्या सुरक्षेवर सरकारचा कोटींचा खर्च, नावांची यादी पाहिली?
hiroshima day
'केवळ प्रसिद्धीसाठी बायोपिक करणं विद्याला मान्य नाही'

यातनांची ही साखळी संपतच नव्हती. त्याही परिस्थितीत जपानी माणूस उभा राहिला. या एका घटनेने जपानला आणि जपानी माणसाला जगाची प्रचंड सहानुभूती मिळून दिली. मात्र जपानी माणूस ती कुरवाळत बसला नाही. उद्वस्त झाला तरी मोडून पडला नाही. जळलेल्या खोडाच्या आधाराने पुन्हा उभा राहिला. त्या भग्न अवशेषांचे सुशोभीकरण करत राहिला नाही. नवनिर्मितीचा ध्यास घेऊन कामाला लागला. आजचा एवढ्या कठीण कोरोना काळातही ऑलम्पिकच्या निमित्ताने जग कवेत घेऊन बसलेला आहे. हिरोशिमा जशी मानवी संहाराची गोष्ट किंवा घटना म्हणून आपण बघतो त्यापेक्षा ती राखेतून उभं राहून पुन्हा सशक्त काळाच्या निर्माणाची गोष्ट आहे. जपानी माणसानं याची दुसरी बाजू सहज स्वीकारली. माहितीपट मात्र कोणतीच बाजू घेत नाही. चांगल्या कलाकृती अशा सहज असतात. माणसाचं माणूसपण असंच सहज असायला हवं. हा धडा मात्र हिरोशिमापासून आपण घेऊ शकलो नाही. अण्वस्त्रांची तर जागतिक पातळीवर देशा देशांची स्पर्धा चालू आहे. या चढाओढीतून आता जर तिसऱ्या महायुद्धाचा स्फोट झाला तर राखेचा धुरळा चंद्रापर्यंत नक्कीच जाईल.

(या लेखाचे लेखक हे न्यू आर्ट्स कॉमर्स अंड सायन्स महाविद्यालयातील संज्ञापन अभ्यास विभागाचे विभागप्रमुख आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()