सरोगसी मदर हा विषय मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीसाठी तसा काही नवीन राहिलेला नाही. यापूर्वी या विषयावर बेतलेले चित्रपट आलेले आहेत आणि त्यांना चांगले यशही मिळालेले आहे. आता प्रदर्शित झालेल्या ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटातही सरोगसीसारखा सामाजिक विषय हाताळण्यात आला आहे. पण तो वेगळ्या ढंगात सादर करण्यात आला आहे. दिग्दर्शक मोहसीन खान यांनी तो वेगळ्या पद्धतीने अर्थात विनोदाच्या अंगाने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे चित्रपटातील उत्सुकता ताणली गेली आहे.
चित्रपटातील कथा आहे रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करणाऱ्या दिगंबर कानतोडे (प्रथमेश परब) आणि त्याचा मित्र चोच्या (पृथ्विक प्रताप) तसेच डॉ. अमृता देशमुख (अंकिता लांडे पाटील) यांची. डॉ. अमृता देशमुखला फर्टिलिटी सेंटर सुरू करायचे असते. तिचे ते स्वप्न असते. त्याकरिता ती गावामध्ये येते आणि ती रिअल इस्टेट एजंट दिग्याभाऊ व त्याचा मित्र चोच्या यांना भेटते. दिग्याभाऊ आणि चोच्या तिला काही जागा दाखवतात.
त्यातील एक जागा ती निश्चि करते आणि तेथे हे सेंटर सुरू करते; परंतु सरोगसीबाबत गावातील मंडळींना फारशी काही माहिती नसते. मग दिग्याभाऊ आणि चोच्या डॉ. अमृता देशमुखबरोबर कमिशनच्या तत्त्वावर बोलणी करून गावातील महिलांना सरोगसीसाठी तयार करण्याचे काम करतात. मग त्यामध्ये त्यांना कशा प्रकारे अडथळे येतात, गावातील महिलांचे मन वळवताना त्यांची कशी फजिती उडते वगैरे चित्रण विनोदी ढंगामध्ये या चित्रपटात मांडण्यात आले आहे.
प्रथमेश परब, पृथ्विक प्रताप, अंकिता लांडे पाटील, गणेश यादव वगैरे कलाकारांनी भूमिका चोख पार पाडल्या आहेत. प्रथमेशचा लूक काहीसा वेगळा आहे. त्याने टपोरी-बिनधास्त अशा दिग्याभाऊची भूमिका सुरेख साकारली आहे. त्याला उत्तम साथ पृथ्विकची लाभलेली आहे. अंकिता लांडे पाटील पडद्यावर सहजसुंदर वावरली आहे. दिग्दर्शक मोहसीन खान यांनी एका नाजूक विषयाला हात घातला आहे. समाजप्रबोधनात्मक असा हा चित्रपट आहे.
चित्रपटातील संगीत आणि सिनेमॅटोग्राफी उत्तम झाली आहे. प्रथमेश परबचे नृत्य दिलखेचक झाले आहे. तरीही चित्रपटाच्या कथानकाची मांडणी म्हणावी तशी झालेली नाही. चित्रपटाच्या पटकथेवर अधिक चांगले काम होणे आवश्यक होते. ते झालेले दिसत नाही. एका नाजूक आणि संवेदनशील व सामाजिक विषयावरील हा चित्रपट आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.