‘आवड मला ज्याची मी...’ हे गाणं विठ्ठल शिंदे यांनी मला गायला सांगितलं. माझ्या आवाजात ते रेकॉर्ड झालं. पण कॅसेट कंपनी हे गाणं घेण्यास तयार नव्हती. शेवटी आठव्या क्रमांकाला हे गाणे टाकून कॅसेट तयार झाली. हे गाणं एवढं गाजलं की कंपनीने ‘नवीन पोपट’ या नावाचीच कॅसेट बाजारात आणली. त्या कॅसेटचा एवढा खप झाला की, कंपनीने मला मारुती ८०० व टीव्हीएस सुझुकी गाडी भेट दिली. आजही ही लकी गाडी मी जपून ठेवली आहे.
माझ्या संगीत शिक्षणाचा प्रवास खडतड आहे. वडील प्रल्हाद शिंदे यांनी क्लासिकल तबला शिकवला. त्यासाठी खूप मारही खावा लागला. संगीताचे धडे माझे चुलत बंधू ख्यातनाम संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्याकडे घेतले. त्यावेळी आम्ही कल्याणला राहायचो. घर दहा बाय दहाचे. त्यात १० जणांचे कुटुंब. विठ्ठल शिंदे राहायचे विक्रोळीतील कन्नमवारनगरात. तिथे जाण्यासाठी अनेकदा लोकलचे तिकीट काढायलाही पैसै नसायचे. त्यामुळे कल्याणपासून विक्रोळीपर्यंत पायी ‘वारी’ करायचो. परतीच्या प्रवासासाठी चुलत बंधू कधी-कधी मला दीड रुपया द्यायचे. त्याचा आनंद श्रीमंत वाटायचा. वडील त्यांच्या सुरुवातीच्या दिवसात ‘हमे तो लुट लिया मिल के हुस्नवालो ने’फेम प्रसिद्ध कव्वाल इस्माईल आझाद उस्ताद यांच्याकडे तबला वाजवायचे. मीही प्रसिद्ध कव्वाल ‘हमे तुमसे प्यार कितना’फेम परवीन सबा यांच्याकडे तबलावादन व कोरस करायचो. मोबदला दहा रुपये मिळायचा. त्यांच्याकडून मला ऊर्दू कव्वालीचे धडे मिळाले. ही तालीम माझा कलाप्रवास समृद्ध करणारी ठरली आहे.
पुढे वडिलांसोबत अनेक जलसे, कार्यक्रमात जायचो. कधी कोरस, कधी एखादी तान तर कधी पूर्ण गाणेसुद्धा गायचो. एकदा वडिलांनी संगीतकार विठ्ठल शिंदे यांना विनंती केली, की ‘‘आनंदला तुझ्याकडे एक गाणं गायची संधी दे.’’ त्या विनंतीला मान देऊन मला विठ्ठल शिंदे यांनी ‘दाट गर्दी गं सखे पुना गाडीला’ आणि ‘झाली एकदम दोन पोरं’ ही दोन गाणी गाण्याची संधी दिली आणि मी रेकॉर्ड केली. नवीन गायक असल्यामुळे माझी ती गाणी प्रसिद्ध होणार नाहीत, असं व्हिनस कंपनीने सांगितलं. त्याच्यावर तोडगा म्हणून प्रल्हाद शिंदे यांनी सहा गाणी गावी, त्यात ही दोन गाणी घेऊ, असा प्रस्ताव ‘व्हिनस’ने ठेवला. वडिलांनी माझ्यासाठी सहा गाणी गायला होकार दिला व माझ्या दोन गाण्यांचा समावेश असणारी पहिली कॅसेट आली. या कॅसेटमधील गाण्याने थोडीफार ओळख मिळाली. त्यानंतर छोटे-मोठे कार्यक्रम करत होतो. दरम्यान, पहिला मुलगा झाला, त्याचं नाव हर्षद ठेवलं.
त्यानंतर मी काही नवीन गाणी केली. ‘पाहुनी आली लाडाला’ ही माझी कॅसेट आली. खूप मेहनत करत होतो. या उमेदीच्या काळात माझा खरा उत्कर्ष झाला, प्रसिद्धी मिळाली, स्टारडम दिलं ते पोपटाच्या गाण्याने. पोपटाचं गाणं आलं आणि मी पाहता पाहता सुपरहिट झालो. दुसरा मुलगा झाला. माझा उत्कर्ष झाला म्हणून त्याचं नाव उत्कर्ष ठेवलं.
पोपटाच्या गाण्याचा किस्सा मजेशीर आहे. मुरबाडमध्ये एक कव्वालीचा सामना होता, मिलिंद शिंदे व माझ्या वडिलांच्या वयाच्या रंजना शिंदे यांच्यात. त्यावेळी प्रसिद्ध गायक गोविंद म्हशीलकर यांचे ‘तुझ्या जवळची पेरूची फोड लाल लाल पाहुनी माझा पोपट करतोय येड्यावाणी’ हे गाणं गाजत होतं. त्याचा प्रभाव गीतकार मानवेल गायकवाड यांच्यावर पडला. त्यांनी मुरबाडच्या कव्वालीच्या सामन्यात ‘आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या गं बोलण्याला आत्ता मी मानलं, शेजारची ही म्हातारी मैना लागली डोलायला...’ हे गाणं तयार केलं. रंजना शिंदे या आघाडीच्या व ज्येष्ठ गायक होत्या. आम्ही नवखे होतो. त्यामुळे रंजना शिंदे यांना कव्वालीच्या सामन्यात जेरीस आणण्यासाठी हे गाणं तयार केलं होतं. हे गाणं रेकॉर्ड करण्याच्या वेळी विठ्ठल शिंदे यांनी ते मला गायला सांगितलं. माझ्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड झालं. फक्त या गाण्यातील ‘म्हातारी मैना’च्या जागी ‘काळी मैना’ हे शब्द टाकण्यात आले. गाणं तयार झालं; पण व्हिनस कॅसेट कंपनी हे गाणं घेण्यास तयार नव्हती. शेवटी आठव्या क्रमांकाला हे गाणे टाकून कॅसेट तयार झाली. या गाण्यामुळे ही कॅसेट एवढी गाजली की व्हिनस कंपनीने ‘नवीन पोपट’ या नावाचीच कॅसेट, त्यावर ‘एएस’ आणि पोपटाचा लोगो छापून बाजारात आणली. हे गाणं महाराष्ट्रात नव्हे तर देशभर वाजलं. कॅसेटचा रेकॉर्ड ब्रेक खप झाला व माझं गाणं ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवण्यात आलं. आता ‘कोलावरी डी’ या गाण्याने जशी दंगल केली. त्याहीपेक्षा जास्त दंगल माझ्या ‘नवीन पोपट’ने झाली होती.
व्हिनस कंपनीने हे गाणं गाण्यासाठी मला ५०० रुपये मानधन दिलं होतं. कॅसेटचा एवढा खप झाला की, कंपनीने मला मारुती ८०० व टीव्हीएस सुझुकी भेट दिली. ज्यांनी माझं गाणं करायला नकार दिला, ते व्हिनस कंपनीचे मालक रतन जैन, चंपक जैन हे मला भेटायला गोरेगावच्या भगतसिंग झोपडपट्टीत आले. त्यांना दुसरा अल्बम करायचा होता. तेव्हा मी विटी-दांडू खेळत होतो. ते मला थेट रेकॉर्डिंगसाठी घेऊन गेले... आजही ही लकी गाडी मी जपून ठेवली आहे. पुढे ‘पोपट फेम’ म्हणून मला खूप प्रसिद्धी मिळत गेली. आजही माझ्या गाडीवर मी ‘एएस’ आणि ‘पोपट’चा लोगो वापरतो.
पोपट गाण्याचा एवढा बोलबाला झाला की हिंदी चित्रपटामध्ये महागायक किशोर कुमार यांनी अभिनेता चंकी पांडेसाठी ‘मेरा दिल तोता बन जाये ऐसा मिठू मिठू बोले हाय’ हे गाणं गायलं. पुढे नवीन पोपट सोबतच, ताशाचा आवाज, अंटीची घंटी अशी कितीतरी गाणी गायली. ती सर्वच्या सर्व गाणी लोकांनी डोक्यावर घेतली. अभिनेता गोविंदा, हास्य सम्राट जॉनिलिव्हर, गायक सुदेश भोसले अशी मातब्बर मंडळी माझ्यासोबत तेव्हा एकत्र शो करू लागली. वर्षभर आम्ही कार्यक्रम करायचो. त्यावेळचे आघाडीचे गायक बप्पी लहिरी यांनी मला प्लॅटिनम डिस्क भेट दिली व ‘महाराष्ट्र का मायकल जॅक्सन’ म्हणून संबोधलं.
मराठी चित्रपटात ‘नवीन पोपट’ गाणं पुन्हा घेण्यात आलं. संगीतकार अनिल मोहिले यांनी हे गीत नव्याने अरेंज केलं, मात्र चित्रपटातील माझ्याच हिट गाण्यातून माझाच आवाज वगळला गेला. त्यानंतर सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे व महेश कोठारे यांच्यासाठी ‘चंबू गबाळे’, ‘थरथराट’ व अन्य सहा-सात चित्रपटांत गायलो.
प्रल्हाद शिंदे त्यावेळचे आघाडीचे गायक होते. ‘ऐका सत्यनारायणाची कथा’, ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ असली गाजलेली गाणी त्यांनी गायली. तरीही त्यावेळचे चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रपटाच्या संगीतकारांनी त्यांच्या आवाजाची दखल घेतली नाही. तोच अनुभव मलाही सुरुवातीच्या कारकिर्दीत आला. माझी सर्व गाणी सुपरहिट होती, अल्बम गाजले. मात्र चित्रपटात हवी तशी संधी मिळाली नाही. अन्यथा रसिकांची सेवा करायची अधिक संधी मिळाली असती, याची खंत वाटते. मात्र आज काळ बदलला. मी सर्व चित्रपटांत गातो. भरपूर भक्तिगीते, लोकगीते, कोळीगीते, कव्वाल्या, महामानवांचे पोवाडे, नाना प्रकारची वेगवेगळ्या भाषेतील गाणी गायली आणि गाडी रुळावर धावू लागली. आदर्श जीवन जगू लागलो, तिसरा मुलगा झाला, त्याचे नाव आदर्श ठेवले. पावलो पावली ‘विजया’ची साथ मिळाली, सर्व भावांना तिने आईसारखी माया दिली. माझ्या कार्यक्रमातून जमवलेल्या पैशांतून माझी पत्नी विजयाने काही पैसे बाजूला काढत पैशांची बचत केली. मिलिंदचे लग्न लावून दिले. व्हिनस, एचएमव्ही, टी-सीरीज, टिप्स आदी अनेक आघाडीच्या कंपन्यांसोबत मी काम करत गेलो. जगण्यातला खरा आनंद कमावण्यासाठी अनेक सुख-दु:खाच्या प्रसंगांनी आयुष्य सजवले आहे, त्यातले एकेक पुढे सांगेन... तूर्तास थोडासा अवकाश, आजच्यापुरता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.