दिल, दोस्ती : कॉफी, मॅगी आणि गप्पा!

आपल्या ध्यानीमनी नसताना एखाद्या व्यक्तीशी छान मैत्री होऊन जाते, इतकी की कालांतराने ती व्यक्ती आपल्या कुटुंबाचा एक भाग बनते! मराठी चित्रपटसृष्टीतील अशाच दोन जिवलग मैत्रिणी म्हणजे तेजश्री प्रधान आणि सुरुची अडारकर.
suruchi adarkar and tejashree pradhan
suruchi adarkar and tejashree pradhansakal
Updated on
Summary

आपल्या ध्यानीमनी नसताना एखाद्या व्यक्तीशी छान मैत्री होऊन जाते, इतकी की कालांतराने ती व्यक्ती आपल्या कुटुंबाचा एक भाग बनते! मराठी चित्रपटसृष्टीतील अशाच दोन जिवलग मैत्रिणी म्हणजे तेजश्री प्रधान आणि सुरुची अडारकर.

- सुरुची अडारकर, तेजश्री प्रधान

आपल्या ध्यानीमनी नसताना एखाद्या व्यक्तीशी छान मैत्री होऊन जाते, इतकी की कालांतराने ती व्यक्ती आपल्या कुटुंबाचा एक भाग बनते! मराठी चित्रपटसृष्टीतील अशाच दोन जिवलग मैत्रिणी म्हणजे तेजश्री प्रधान आणि सुरुची अडारकर. मुंबई बॉक्स क्रिकेट लीगदरम्यान सात-आठ वर्षांपूर्वी त्यांची पहिली भेट झाली. पहिल्याच भेटीत भरपूर गप्पा झाल्या. गंमत म्हणजे, काही वर्षांपूर्वी सुरुचीच्या ‘ओळख’ व तेजश्रीच्या ‘तुझं नि माझं घर श्रीमंताचं’ या मालिकांचे सेट एकाच ठिकाणी अगदी बाजूबाजूला होते. तेजश्री सुरुचीला बास्केटबॉलची प्रॅक्टिस करतानाही बघायची, पण तेव्हा एकमेकींशी बोलणं लांबच, एकमेकांच्या समोर येण्याचाही योग त्यांना आला नाही. मात्र, काही वर्षांनी त्यांची ओळख होऊन घट्ट मैत्रीही झाली.

तेजश्री म्हणते, ‘सुरुची माझ्या आयुष्यातला ऊर्जास्रोत आहे. मला दु:खी वाटत असल्यास तिच्याशी फक्त बोलल्यानं मला माझी गेलेली ऊर्जा परत मिळते. सुरुची अत्यंत मोकळी, मनमिळाऊ आणि लाघवी आहे. सुरुची कोणाला आवडत नाही, असे फार क्वचित लोक असतील. ती समोरच्याचा खूप विचार करुन वागणारी आहे. गोष्ट छोटी असो वा मोठी; तिला काय हवंय यापेक्षा समोरच्याला काय हवंय, याचा विचार ती आधी करते. तिचा हा गुण मला अतिशय आवडतो. कोणत्याही दोन माणसांच्या नात्यामध्ये असा विचार करणारी एखादी व्यक्ती असल्यास ते नातं खूप सोपं होऊन जातं; तशी सुरुची माझ्या बाबतीत आहे. अशा खूप कमी अभिनेत्री असतात ज्यांचा अभिनय नैसर्गिक वाटतो; माझ्यासाठी त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे सुरुची. तिनं ‘ओळख’ या मालिकेत साकारलेली भूमिका मला प्रचंड आवडली. माझ्या आयुष्यात माझे सगळ्यात जास्त लाड कोणी केले असतील, तर ते सुरुचीनं. आमच्या सगळ्या आवडी-निवडीही साधारण सारख्याच आहेत. आम्हाला एकाच प्रकारच्या गोष्टी टीव्हीवर बघायला आवडतात, आम्ही दोघींनीही सारख्याच वेबसिरीज ‘बिंज वॉच’ केल्या आहेत. तिला माझ्या हातची कॉफी खूप आवडते, तर मला तिनं बनवलेली मॅगी. आम्हा दोघींच्याही ‘लॉस्ट’ आणि ‘प्रिटी लिट्ल लायर्स’ या दोन आवडत्या वेबसिरीज आहेत, ज्या आम्ही एकत्र बघितल्या; सोबत मॅगीचा बोल, कॉफीचा मग आणि अधून-मधून माझ्या व सुरुचीच्या छान गप्पा....आणि काय हवं?’’

सुरुचीनं सांगितलं, ‘मनोरंजन क्षेत्रात आल्यावर दोन-तीन मैत्रिणी मला खूप छान मिळाल्या. त्यातलीच एक जुनी मैत्रीण तेजश्री. ती खूप चांगली अभिनेत्री आहे. तिच्याशी ओळख होण्याच्या आधीपासून मी तिची कामं पाहते आहे. खास करून ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातलं तिचं काम मला फार आवडलं. ती जितकी चांगली अभिनेत्री आहे, तितकीच माणूस म्हणूनही खूप चांगली आहे. तेजश्री स्पष्टवक्ती आहे आणि तशीच ती तिच्या जवळच्या माणसांबरोबर आहे. एखादी गोष्ट आवडली, तर ती ते आवर्जून सांगते आणि त्याचं कौतुकही करते. एखादी गोष्ट आवडली नाही, तर तेही ती तितक्याच स्पष्टपणे कारणांसह स्पष्ट करते व ती गोष्ट आणखीन चांगली कशी होईल हेही सांगते. ती उत्तम समीक्षक आहे; ती उगाचच कोणाचं खोटं कौतुक करत नाही. हे सगळं करत असताना तिच्या बोलण्यानं कोणीही दुखावलं जाणार नाही याचीही ती काळजी घेते. माझा स्वभाव तिच्यापेक्षा बऱ्यापैकी वेगळा आहे. मला सुरुवातीला स्पष्टपणे कोणाला ‘नाही’ म्हणणं जमायचं नाही. मात्र, दुसऱ्यांचा विचार करता करता कधीतरी स्वतःचाही विचार केला पाहिजे व कोणाला न दुखावताही नकार देता येतो हे मी इतक्या वर्षांच्या आमच्या मैत्रीमध्ये तिच्याकडून शिकले. आमच्या स्वभावातल्या वेगळेपणामुळंच आमची मैत्री इतकी वर्षं चांगली टिकून आहे आणि यापुढंही तशीच राहील.’’

(शब्दांकन - राजसी वैद्य)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.