पुण्याचा स्वाभिमान की मुंबईचा स्पष्टवक्तेपणा..? मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटाला दहा वर्षे पूर्ण..

mpm
mpm
Updated on

मुंबई ः गौतम आणि गौरी. गौतम पुण्याचा तर गौरी मुंबईची. दोघेही स्वतंत्र आणि मोकळ्या विचाराचे. गौरी मुंबईची असल्याने स्पष्टवक्तेपणा, व्यवहारीपणा आणि अभिमान ठायी ठायी भरलेला तर गौतम तद्दन पुणेरी बाण्याचा. स्वतंत्रपणे विचार करणारा आणि तितकाच समंजस आणि पुण्याबद्दल कमालीचा आदर आणि आपुलकी...पुण्यातीलच माणसे किती ग्रेट असतात, हे पटवून देणारा आणि तितकाच प्रेमळदेखील. एके दिवशी गौरी पुण्यात गौतमला भेटायला येते आणि त्यालाच त्याच्या घरचा पत्ता विचारते. कारण गौतम आणि गौरी पहिले कधीही
भेटलेले नसतात. त्यांची ही पहिलीच भेट. त्यानंतर सुरू होतो गप्पांचा फड आणि त्यातून होते मैत्री. 

हळूहळू मजल-दरमजल करीत समज-गैरसमजातून ही मैत्री प्रेमात कधी रूपांतर होते हे त्यांचे त्यांनाच कळत नाही.  त्याच गौतम आणि गौरीच्या लव्हस्टोरीला अर्थात मुंबई-पुणे-मुंबई या चित्रपटाला आज तब्बल दहा वर्षे पूर्ण होत आहेत. 11 जून 2010 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. दिग्दर्शक सतीश राजवाडे आणि निर्माते संजय छाब्रिया यांनी मुंबई पुणे मुंबई हा चित्रपट 11 जून 2010 मध्ये आणलेला होता. या चित्रपटात स्वप्नील जोशीने गौतमची तर मुक्ता बर्वेने गौरीची व्यक्तिरेखा निभावली होती. ही एका दिवसाची कहाणी होती आणि केवळ दोन व्यक्तिरेखांभोवती फिरणारी होती. 

खरे तर सतीश राजवाडे याच्यासमोर हे मोठे आव्हान होते. परंतु त्याने ही कथा अशी काही मांडली की प्रेक्षकांनी चित्रपटाचे चांगले स्वागत केले. स्वप्नील आणि मुक्ताचा सदाबहार अभिनय, सतीशचे नेमके आणि नेटके दिग्दर्शन, सुमधुर संगीत आणि खुसखुशीत व चटपटीत संवाद अशा सगळ्याच बाजू जुळून आल्या आणि पावसाळ्याच्या हंगामामध्येही चित्रपट यशस्वी ठरला. गौतम गौरीच्या खरेपणाच्या आणि तिच्या विचाराच्या प्रेमात पडतो तर गौरी गौतमच्या स्वभाव मनमिळावू आणि तितकाच गमतीशीर व समंजस असल्यामुळे प्रेमात पडते. 

त्यानंतर 12 नोव्हेबर 2015 मध्ये 'मुंबई-पुणे-मुंबई 2' हा चित्रपट आला. ऐन दिवाळीत आलेल्या या चित्रपटासमोर हिंदीतील बड्या सिनेमाचे मोठे आव्हान होते. राजश्री प्रॉडक्शनचा सलमान खानची मुख्य भूमिका असलेला 'प्रेम रतन धन पायो' हा चित्रपट याच वेळी प्रदर्शित झाला. परंतु गौतम आणि गौरीच्या लव्हस्टोरीने आपली लोकप्रियता कायम ठेवली आणि हा चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. या दुसऱ्या भागामध्ये गौतम आणि गौरीची प्रेमकथा अधिक बहरली. मग त्यांच्या लग्नाचा घाट घातला गेला. त्याकरिता साहजिकच दोन्ही घरची मंडळी एकत्र आली अर्था गौतम आणि गौरीच्या आई-वडिलांचे आगमन झाले. दोन्ही कुटुंबांनी ठरवून गौतम आणि गौरीचे लग्न लावून दिले.

मग तिसऱ्या भागाची तयारी सतीश राजवाडे आणि टीमने सुरू केली. हा तिसरा भाग 7 डिसेंबर 2018 मध्ये प्रदर्शित झाला. गौतम आणि गौरीच्या लग्नानंतरची कथा यामध्ये मांडण्यात आली. दुसऱ्या आणि तिसऱ्या भागामध्ये प्रशांत दामले, विजय केंकरे, सविता प्रभुणे, मंगल केंकरे आदी कलाकारांनी काम केले. गौतम आणि गौरीची ही लव्हस्टोरी हेवे-दावे, रुसवे-फुगवे यातून पहिल्यांदा सुरू झाली. दुसऱ्या भागात त्यांचे लग्न अर्थात एक कौटुंबिक सोहळा आणि तिसऱ्या भागामध्ये  त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या नव्या पाहुण्याने समाप्त झाली आहे. एकूणच ही फ्रेन्चाईजी प्रेक्षकांना भावते आहे. त्यामुळे मुंबई-पुणे-मुंबई या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देताना चौथ्या भागाची अपेक्षा करायला काही हरकत नाही.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.