मराठी चित्रपटाचा सुवर्णकाळ म्हणजे तमाशापट आणि तमाशा म्हंटलं की बाई आणि बाईसोबत नाचणारा नाच्या आलाच. पण नाच्या हे दोन शब्द जरी आले तरी एकाच चेहरा डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे अभिनेते गणपत पाटील.
सडपातळ बांधा, लव्हाळे हलावे तशी लवचिक शरीरयष्टी, चेहऱ्यावर तेज आणि डोळ्यात भलतीच नशा. याच चेहऱ्याने महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावलं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक भूमिका केल्या, पण लक्षात राहिला तो नाच्या. पण याच 'नाच्या'च्या भूमिकेने त्यांच्या आयुष्याचा प्रवास अधिकच संघर्षमय केला.
आज गणपत पाटील यांचा स्मृतिदिन त्यानिमित्ताने पाहूया, त्यांचा संघर्षमय प्रवास नेमका कसा होता..
(veteran actor Ganpat Patil death anniversary his struggle story movies career last days)
गणपत नायकू पाटील असे त्यांचे पूर्ण नाव. २० ऑगस्ट १९२० रोजी कोल्हापूर येथील एका गरीब कुटूंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणीच वडिलांचे निधन झाल्यमुळे घराची जबाबदारी त्यांच्या आईवर पडली. सर्वांची जबाबदारी आईवर पडल्यामुळे गणपत पाटील यांनाही नाईलाजाने कुटुंबासाठी मोलमजुरी करावी लागली.
भाजीपाला विकण्यापासून ते सर्व प्रकारची कामं त्यांनी केली. त्या दरम्यान कोल्हापूरमध्ये जे मेळावे असत त्यात त्यांनी काम करायला सुरवात केली. तसेच ' रामायण ' मध्ये सीतेची भूमिकाही ते करत. ह्या अशा कामामुळे त्यांना ' कॉलेजकुमारी ' या नाटकात काम करण्याची संधी मिळाली.
वयाच्या १४ व्या वर्षी त्यांना राजा पंडित यांच्या ' बाल ध्रुव ' या चित्रपटात काम केले. परंतु त्यावेळी त्यांना मॉब सीन मध्ये काम करावे लागले. या क्षेत्रात पैसे मिळत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी उदरनिर्वाहासाठी इतर पडेल ती कामे करायला सुरवात केली .
पण त्यांनी अभिनय सोडला नाही. पुढे गणपत पाटील यांची अभिनेते राजा गोसावी यांच्याशी झाली आणि त्यांच्या ओळखीने त्यांनी मा. विनायक यांच्या संस्थेमार्फत चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. तेथे त्यांनी सुरवातीच्या काळात सुतारकाम , रंगभूषा करणे अशी कामे केली.
सर्व प्रकारची कामे करत असताना त्यांची अनेकांशी ओळख झाली. त्यामुळेच त्यांना राजा परांजपे यांच्या ' बलिदान ' आणि राम गबाले यांच्या ' वन्दे मातरम् ' या चित्रपटातून काम करता आले. त्यांचे काम बघून भालजी पेंढारकर यांनी त्यांच्या ' मीठभाकर ' या चित्रपटात खलनायकाची भूमिका त्यांना दिली.
त्यानंतर त्यांनी खूप चित्रपटात कामे केली आणि त्यांचे नाव मोठ्या अदबीने घेतले जाऊ लागले. चित्रपटातील कमाई अपुरी पडत असल्यामुळे त्यांनी मेकअपची कामे करायला सुरवात केली आणि नाटकातही काम करू लागले.
जयप्रकाश दानवे यांच्या ' ऐका हो ऐका ' या अस्सल ग्रामीण स्वरूपाच्या तमाशाप्रधान नाटकात त्यांना तृतीयपंथी सोगाड्याची भूमिका करायला मिळाली आणि ती भूमिका त्यांनी इतकी जबरदस्त केली की ते नाटक लोकप्रिय झाले. त्यामुळे आय. बारगीर यांनी त्यांच्या ' जाळीमधी पिकली करवंद ' या नाटकात घेतले.
गणपत पाटील यांची नाच्याची भूमिका पाहून कृष्णा पाटील यांनी ' वाघ्या मुरळी ' या चित्रपटात त्यांना तृतीयपंथी पुरुषाची भूमिका दिली. त्यासाठी त्यांना १९५४ चा ' चरित्र अभिनेत्याचा ' महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार ' मिळाला.
या चित्रपटानंतर पाटलांच्या अभिनयकौशल्यामुळे नाच्याची भूमिका आणि गणपत पाटील हे समीकरण मराठी तमाशापटांत दृढावत गेले आणि त्याना अनेक चित्रपटामध्ये नाच्याच्या भूमिका मिळाल्या. त्यांनी एक गाव बारा भानगडी , मल्हारी मार्तंड , देवा तुझी सोन्याची जेजुरी , पावनखिंड , नायकिणीचा किल्ला , आकाशगंगा , शिकलेली बायको , गावची इज्जत , केला इशारा जाता जाता , थोरातांची कमळा , सवाल माझा ऐका , धन्य ते संताजी धनाजी , गणानं घुंगरू हरवलं , सोंगाड्या , दोन बायका फजिती ऐका , नेताजी पालकर , मंत्र्याची सून , पिजरा अशा अनेक चित्रपटातून भूमिका केल्या .
त्याचप्रमाणे त्यांनी कॉलेजकुमारी (स्त्री भूमिका) , स्टेट काँग्रेस , बेबंदशाही , आगऱ्याहून सुटका , झुंझारराव , मानापमान , सोळावं वरीस धोक्याचं , राया मी डाव जिंकला , लावणी भुलली अभंगाला , आता लग्नाला चला , आल्या नाचत मेनका रंभा अशा अनेक नाटकातून भूमिकाही केल्या.
' लावण्यवती ' हा त्यांचा शेवटचा चित्रपट म्हणावा लागेल. परंतु २००६ साली मा. मुख्यमंत्री गणप्या गावडे या चित्रपटात त्यांनी अत्यंत वेगळी पण छोटी भूमिका मिळाली. अनेक नाटकांच्या त्यांच्या भूमिकाही गाजल्या.
गणपत पाटील यांनी सुरवातीला खूप प्रकारच्या भूमिका केल्या अगदी खलनायकापासून , परंतु लोकांच्या लक्षात राहिल्या त्या त्यांच्या नाच्यांचाच भूमिका. त्यामुळे त्यांच्या कुटूंबाला बराच मनस्ताप भोगावा लागला एकीकडे बघावे तर नाच्याच्या भूमिकेने इतकी त्यांना प्रसिद्धी दिली की ते एक पुरुष आहेत आणि त्यांनाही मुले आहेत, कुटूंब आहे हे त्यांना सांगावे लागले. अशा या वेगळ्या अभिनेत्याचे २३ मार्च २००८ रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी कोल्हापूर येथे निधन झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.