Veteran actor Junior Mehmood: भारतीय मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते - कॉमेडियन आणि गायक ज्युनियर मेहमूद यांची प्रकृती चिंताजनक आहे. ज्युनियर मेहमूद यांना कर्करोगाचे निदान झाले आहे.
काही दिवसांपुर्वी अभिनेते जॉनी लिव्हर यांनी ज्यु. मेहमूद यांची भेट घेऊन त्यांची विचारपुस केली होती. या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यानंतर अनेकांना त्यांच्या प्रकृतीबद्दल कळालं होतं.
आता जॉनी लिव्हर यांच्यानंतर अभिनेता जितेंद्र आणि अभिनेता सचिन पिळगावकर यांनीही ज्युनियर मेहमूद यांची भेट घेतली आहे. ज्युनियर मेहमूद यांना भेटण्यासाठी जितेंद्र त्यांच्या घरी पोहचले होते.
ज्युनियर महमूद यांनी त्यांचे जुने मित्र ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर जितेंद्र आणि सचिन पिळगावकर ज्युनियर महमूदला भेटायला आले होते.
आपल्या मित्राची अशी अवस्था पहिल्यानंतर जितेंद्र यांचे डोळे पाणावले होते. तर सचिन पिळगावकर यांनी ज्युनियर महमूद यांच्याशी व्हिडीओ कॉलवरही चर्चा केली आणि नंतर त्यांची भेट घेतली.
सचिन पिळगावकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ज्युनियर महमूद लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करा असे सांगितले.
पुढे त्यांनी लिहिले की, मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, माझा बालपणीचा मित्र ज्युनियर महमूद हा आजाराने ग्रस्त आहे. तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करा. काही दिवसांपूर्वी मी त्याच्याशी व्हिडिओ कॉलवर बोललो होतो आणि आज त्याला भेटायला गेलो होतो पण तो झोपला होता.
काही दिवसांपूर्वी सलाम काझी यांनी ज्युनियर महमूद यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना सांगितले होते की, दोन महिन्यांपासून ते आजारी होते.
सुरुवातीला आम्हाला वाटलं की त्यांना काही किरकोळ तब्येतीची समस्या असेल पण नंतर अचानक त्यांचे वजन कमी होऊ लागलं. जेव्हा मेडिकल रिपोर्ट आला तेव्हा कॅन्सर असल्याचे सांगण्यात आले.
ज्युनियर मेहमूदने जितेंद्रसोबत कारवां या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात त्याने जितेंद्रच्या धाकट्या भावाची भूमिका साकारली होती.
ज्युनियर मेहमूद हे नाव त्यांना खुद्द दिग्गज अभिनेते महमूद यांनी दिले होते. ज्युनियर मेहमूद यांनी बाल कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे काही सिनेमांमध्ये अभिनय करुन त्यांनी नंतर चित्रपटांचे दिग्दर्शन करण्यास सुरुवात केली.
265 चित्रपटांच्या फिल्मोग्राफीसह, त्यांनी ब्रह्मचारी (1968), मेरा नाम जोकर (1970), परवरिश (1977), आणि दो और दो पांच (1980) मधील भूमिकांसाठी अभिनेता म्हणुन स्वतःची ओळख मिळवली. ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.