मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये लेखन करणाऱ्या लेखकांच्या हितासाठी कार्यरत असणाऱ्या 'मालिका नाटक चित्रपट' अर्थात मानाचि लेखक संघटनेचा आठवा वर्धापन दिन नुकताच रवींद्र नाट्य मंदिरमधील मिनी थिएटरमध्ये संपन्न झाला.
या सोहळ्याला मालिका, नाटक आणि चित्रपट क्षेत्रातील नामवंत लेखक मंडळी उपस्थित होती. या सोहळ्यात ज्येष्ठ नाटककार व पटकथाकार गंगाराम गवाणकर यांना 'लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.
जाहिरात क्षेत्रात कार्यरत असलेले भरत दाभोळकर या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गतवर्षीचे 'मानाचि'चे लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कार विजेते ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी गंगाराम गवाणकर यांना सन्मानपूर्वक रंगमंचावर आणले.
(veteran writer gangaram gavankar honored by manachi award marathi drama natak vastraharan)
'मानाचि'चे अध्यक्ष विवेक आपटे यांच्या उपस्थितीत दाभोळकरांच्या हस्ते गवाणकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरणानंतर विवेक आपटे यांनी मुलाखत घेताना गवाणकरांना बोलतं केलं.
गवाणकरांनी आपला बालपणापासूनचा संपूर्ण प्रवास गंमतीशीर पद्धतीने सांगितला. गवाणकरांच्या मिश्किल शैलीत तो ऐकताना उपस्थितांच्या हसून-हसून पोटात अक्षरश: गोळा आला. यात गावापासून मुंबईपर्यंतच्या प्रवासात विमानतळावरील बिगारी काम, जेजे स्कूल आॅफ आर्टसमधल शिक्षण, नाईट हायस्कूलमधील शालेय शिक्षण, फुटपाथवरील जगणं, जीपीओमध्ये नोकरी, साईन बोर्ड रंगवणं, 'वस्त्रहरण' नाटकाचे सुरुवातीचे फसलेले प्रयोग, पु. ल. देशपांडेंनी दाद दिल्यानंतर नाटकाने घेतलेली गरुडझेप सर्व काही सांगितलं.
'मानाचि'ने केलेला गौरव म्हणजे लेखकांनी लेखकाचा केलेला सन्मान असल्याची भावना व्यक्त करताना ही खूप मोठी दाद असल्याचेही गवाणकर म्हणाले. गवाणकरांवर पहिलं प्रेम करणाऱ्या मैसम्मावर रचलेल्या कवितेने त्यांनी आपल्या मुलाखतीची सांगता केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
गतवर्षीचे पुरस्कार विजेते पुरुषोत्तम बेर्डे म्हणाले की, गवाणकरांना पुरस्कार देण्यासाठी रंगमंचावर आणताना मला खूप आनंद झाला. ते जिथून आले तिथूनच मी देखील आलो आहे. ते म्हणजे जेजे इन्स्टिट्यूट आॅफ आर्टस... गवाणकर आम्हाला खूप खूप सिनीयर आहेत. त्या काळात जेजेमध्ये नोकरी करून चित्रकला शिकता यावी असा कोर्स होता.
अशाप्रकारे जी मंडळी शिकली त्यातील आदर्श गवाणकर आहेत. ते जीपीओमध्ये कामाला होते आणि जवळच असलेल्या जेजेमध्ये शिकले. १९६२ मध्ये त्यांनी डिप्लोमा घेतला आणि माझा १९७५ मधला म्हणजे मला किती सिनीयर होते ते समजेल. माझे गुरू दामू केंकरे हे त्यांचेही गुरू होते. त्यानंतर त्यांनी एकांकीका आणि नाटकांकडे झेप घेतली आणि 'वस्त्रहरण' हे माईलस्टोन नाटक मराठी रंगभूमीला दिल्याची भावना बेर्डे यांनी व्यक्त केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.