Vitthal Maza Sobati Review : आषाढी एकादशी आता जवळ आलेली आहे. विठूरायाच्या तमाम भक्तांना आता आस त्याच्या दर्शनाची लागलेली आहे. कित्येक वारकरी तहान-भूक-ऊन-पाऊस यापैकी कशाचीही पर्वा न करता पंढरीच्या वारीमध्ये सहभागी झाले आहेत.
विठूमाऊलीचा गजर करीत ते प्रवास करीत आहेत. अशा या भक्तिमय वातावरणात विठ्ठल माझा सोबती हा विठ्ठलाचा महिमा वर्णन करणारा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. नाईंटी नाईन प्राॅडक्शन यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती फक्त मराठीने केली आहे. संदीप मनोहर नवरे हा दिग्दर्शक आहे.
या चित्रपटाची कथा एका विठ्ठल भक्ताची आहे. दादासाहेब देशमुख (अरुण नलावडे) हे एक श्रीमंत व्यक्तिमत्त्व. त्यांनी अपार कष्ट आणि मेहनत घेऊन मोठा उद्योग उभारलेला असतो. त्यांची विठ्ठलावर निस्सीम श्रद्धा असते. त्यांना दोन मुले असतात. मुलाचे नाव प्रशांत (आशय कुलकर्णी) तर मुलीचे नाव ललिता (अश्विनी कुलकर्णी) असते.
या मुलीचे लग्न झालेले असते. रमेश (राजेंद्र शिसाटकर) असे त्यांच्या जावयाचे नाव असते. त्यांची दोन्ही मुले आणि जावई काहीही कामधंदा करीत नसतात. वडिलांच्या पैशावर ते मौजमस्ती करीत असतात. त्यामुळे दादासाहेब आणि त्यांच्या नात्यामध्ये गोडवा नसतो.
आपल्या मुलांच्या अशा वर्तणुकीला दादासाहेब कंटाळलेले असतात. त्यातच एके दिवशी विठ्ठल (संदीप पाठक) नावाची एक व्यक्ती भेटते. ती त्यांच्या घरी येते आणि मग कशा व कोणत्या घडामोडी घडतात हे प्रत्यक्ष पडद्यावर पाहिलेले बरे. दिग्दर्शक संदीप नवरेने या चित्रपटाची कथा लिहिली आहे आणि पटकथा व संवाद विक्रम एडकेने लिहिले आहेत.
गौरव चाटी व गणेश सुर्वेने संगीत दिले आहे. या चित्रपटाची कथा सरळ आणि साधी आहे. या कथेला चांगला न्याय देण्याचा प्रयत्न कलाकारांनी आपल्या अभिनयाद्वारे केला आहे. ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी या चित्रपटात दादासाहेब देशमुख या श्रीमंत व्यक्तीची भूमिका साकारली आहे.
नलावडे हे जाणकार आणि अनुभवी कलाकार आहेत आणि त्यांनी दादासाहेबांची भूमिका सहजरीत्या साकारली आहे. एकीकडे आपला उद्योगधंदा सांभाळता सांभाळता दुसरीकडे आपल्या बिघडलेल्या मुलांमुळे होणारा मनस्ताप तसेच त्यांची चिंता... असे भूमिकेचे बेअरिंग त्यांनी व्यवस्थित पकडलेले आहे. अभिनेत्री दिव्या पुगांवकरने या चित्रपटात सोज्वळ आणि सालस अशा सुमनची भूमिका साकारली आहे. मुलगी झाली हो या मालिकेत तिने माऊ ही भूमिका साकारली होती.
या भूमिकेमुळे ती घरोघरी पोहोचली होती. विठ्ठलाची निस्सीम भक्त असलेल्या सुमनची भूमिका तिने या चित्रपटात उत्तम प्रकारे निभावली आहे. अश्विनी कुलकर्णीने थोडीशी नटखट आणि बिनधास्त स्वभावाच्या अशा ललिताची व्यक्तिरेखा आपल्या स्टाईलने साकारली आहे. मात्र विशेष कौतुक करावे लागेल ते अभिनेता संदीप पाठकचे.
विठ्ठलाच्या भूमिकेत त्याने आपल्या अभिनयाद्वारे चांगलेच रंग भरलेले आहेत. चित्रपटातील संवाद उद््बोधक आणि मार्मिक आहेत. या चित्रपटातील अभंग प्रसंगानुरूप आहेत आणि ते आपल्याला भक्तिरसात तल्लीन व्हायला लावणारे आहेत. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी गौरव पोंक्षेने सुरेख केली आहे. परंतु चित्रपटाच्या कथेचा गाभा मुळात छोटा आहे.
त्यामध्ये फारसे टर्न आणि ट्विस्ट नाहीत. तसेच चित्रपटाची गतीदेखाील काहीशी संथ आहे. चित्रपटाची कथा सरळ आणि साध्या पद्धतीने हळूहळू पुढे सरकते आणि आपण विठ्ठलाच्या भक्तिरसात गुंतून जातो. एकूणच हा चित्रपट म्हणजे विठ्ठलाचा महिमा वर्णन करणारा आहे.
Rating -तीन स्टार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.