'पुलं' असं व्यक्तिमत्व पुन्हा न होणे...

पुलंनी केवळ मनोरंजन असा विनोदाचा दृष्टिकोन ठेवला नाही. त्यातून त्यांनी नेहमी एक विचार मांडला.
p l deshpande
p l deshpande Team esakal
Updated on

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु.ल.देशपांडे उर्फ भाई ऊर्फ पुल यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ रोजी मुंबईत झाला. पु.लं.ची ओळख एका वाक्यात करुन देणे केवळ अशक्य आहे. कारण लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार, पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक अशा नानाविविध छटांमध्ये त्यांचे व्यक्तिमत्व सामावलेले आहे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. पु.ल.या दोन आद्याक्षराचे गारुड युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत आजही कायम आहे.

पु.लं.चे साहित्य आणि त्या साहित्याचे आजच्या परिपेक्षातील संदर्भ असा अनेकदा चर्चेचा विषय होतो. 'पु.ल. वाचण्याचे देखील एक वय असते' अशा विधानाला कधी कधी सामोरे जावे लागते. पंरतू असे विधान करणा-यांना पु.ल.काय व्यक्तिमत्व काय होते हे कळलेच नाही, असेच सर्वानुमते म्हणावे लागेल. आणीबाणीच्या काळात आणि आणीबाणी नंतरच्या काळात पुलंनी जे लेखन केले ते आजच्या काळालाही लागू होते, इतकी ताकद पुलंच्या लेखनात होती. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक वयात, प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीसाठी पुलं महत्त्वाचे आहेत. आजच्या काळातही पुलं चे विनोद मनाला उभारी देतात. करोना सारख्या महामारीच्या काळात मानसिक संतुलन राखण्यासाठी किती तरी व्यक्तिंनी पुलंच्या साहित्याचा आणि त्यांच्या कडून निर्मित विविध नाट्य,चित्रपटांचा आधार घेतला असेल.

पुलंचे विनोद हे खळखळून हसविण्यासोबतच आत्मपरिक्षण करण्यास देखील प्रवृत्त करायचे. हसता हसता अंतमुर्ख करायचे. पुलंनी केवळ मनोरंजन असा विनोदाचा दृष्टिकोन ठेवला नाही. त्यातून त्यांनी नेहमी एक विचार मांडला. 'गुळाचा गणपती' या सबकुछ पु.ल. म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते.पु.ल.देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, होते. त्यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट,नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत काम केले.पु.ल. देशपांडे यांचे मराठी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. त्यांच्या भाषाप्रभुत्वाचे अनेक किस्से आहेत.पुलं हे हजरजबाबीही होते. त्यामुळे त्यांची शेकडो वाक्यसुमने आणि विनोदी किस्से आहेत. दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते.

साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी या दोहोंचे पुरस्कार मिळवणाऱ्या मोजक्या प्रतिभावंतात पुलंचा समावेश होतो.मुंबईच्या ’नॅशनल सेंटर फॉर परर्फॉर्मिंग आर्ट्‌स‘ या संस्थेत पुलंनी अनेक प्रयोग केले. संशोधकांना आधारभूत होतील असे असंख्य संदर्भ, कलांचा इतिहास, ध्वनिफिती, मुलाखती, लेख आदी बरेच साहित्य पु.लंनी जमा करून ठेवले आहे. मराठी नाटकाचा आरंभापासूनचा इतिहास त्यांनी अशा जबरदस्त प्रयत्‍नान्ती जमा केला की त्यांच्यावरून स्फूर्ती घेऊन भारतातील अनेक जणांनी त्यांच्या त्यांच्या प्रांतांतील कलांचा इतिहास जमा करून नोंदवण्यास सुरुवात केली. नॅशनल सेंटर फॉर परर्फॉर्मिंग आर्ट्‌सच्या रंगमंचावर पु.ल.देशपांडे यांनी देवगाणी, बैठकीची लावणी, दोन पिढ्यांची गायकी असे काही अनोखे कार्यक्रम सादर केले. पु.ल. भाषाप्रेमी होते. त्यांना बंगाली, कानडी येत असल्याने ते त्या त्या समाजातील लोकांत सहज मिसळत. पु.ल. देशपांडे यांच्या जीवनावर महेश मांजरेकर यांनी 'भाई: व्यक्ती की वल्ली' या नावाचा मराठी चित्रपट काढला आहे. पु.ल.देशपांडे यांच्या साहित्यकृतींवर आजवर बरीच नाटके आणि चित्रपट झाले आहेत.

१९३७पासून पुलंचा नभोवाणीशी संबंध आला होता. १९५५मध्ये पु.ल.देशपांडे ’आकाशवाणी‘त नोकरीला लागले. आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक श्रुतिका लिहिल्या आणि भाषणे दिली. ५६-५७मध्ये ते आकाशवाणीवर प्रमुख नाट्यनिर्माता झाले. बदलीवर दिल्लीला गेले असताना त्यांनी व सुनीताबाईंनी ’गडकरी दर्शन‘ नावाचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमातूनच ’बटाट्याची चाळ’चा जन्म झाला. बटाट्याच्या चाळीला अभूतपूर्व लोकप्रियता लाभली. १९५८मध्ये पुलंना आकाशवाणीने युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर मीडिया ऑफ मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमासाठी लंडनला बीबीसीकडे पाठवले. १९५९मध्ये पु.ल. देशपांडे भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते झाले. दिल्ली दूरदर्शनवर सुरू झाले त्यावेळचा पहिला कार्यक्रम पुलंनी निर्मिला होता. दूरदर्शनवरील बिरजू महाराजांच्या नृत्याचा कार्यक्रम होता. संथ गतीत सुरू झालेल्या नृत्याची लय वाढत वाढत चौपट झाली. अश्या वेळी त्या द्रुतगतीतही तबला वाजवून पुलंनी आपले तबला प्रावीण्य दाखवून दिले. पुलंना घरात खूप वाचन करायला आणि रेडिओवरील संगीत ऐकायला मिळाले. त्यांच्या घरी संगीताच्या बैठकीही होत असत. ते घरीच बाजाची पेटी शिकले

टिळक मंदिरात एकदा बालगंधर्व आले असताना पु.लं.नी त्यांना पेटी वाजवून दाखवली. बालगंधर्वांनी त्यांना शाबासकी दिली आणि भावी कलाजीवनासाठी शुभेच्छा दिल्या. लोकांच्या वागण्यातील विसंगती आणि हास्यास्पद गोष्टी हेरून पु.ल. त्या लोकांच्या नकला करायचे, म्हणून घरी कुणी आले असताना पुरुषोत्तम जवळ नसलेलाच बरा असे त्यांच्या आईला वाटे. देशपांड्यांची आई कारवारी, वडील कोल्हापूरचे आणि बहीणीचे सासर कोकणातले. त्यामुळे घरात भोजनात विविधता असे. यातूनच पु.ल. खाण्याचे शौकीन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर देशपांडे गाण्याच्या, पेटीच्या व अन्य शिकवण्या करू लागले. ते शाळेत असल्यापासूनच भावगीते गायचे आणि गीतांना चाली लावायचे. कॉलेजात असताना त्यांनी राजा बढे यांच्या 'माझिया माहेरा जा' या कवितेला चाल लावली. आज ते गाणे मराठी भावसंगीतातील अनमोल ठेवा समजला जातो. ग.दि.माडगूळकरांनी लिहिलेल्या आणि भीमसेन जोशी यांनी गायलेल्या 'इंद्रायणी काठी' या रचनेला पु.लं.नी चाल लावली होती. हेही गाणे अजरामर झाले. आज त्यांची आठवण आणि त्यांच्या कार्यकर्तावाचा आढाव घेणे हे औचित्याचे ठरते.

सुनील महाजन - (संस्थापक संवाद पुणे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()