Shahrukh Khan: 1990 साल हे बॉलीवूडसाठी(Bollywood) तसं धोक्याचंच गेलं. बॉलीवूडवर अंडरवर्ल्डची मोठी दहशत होती त्यावेळी. १९९७ मध्ये गुलशन कुमार यांना गोळ्या घालून मारण्यात आलं आणि निर्माता राजीव रायवरील हल्ल्यानंतर इंडस्ट्रीतील अनेक जणांना हाय अलर्ट देण्यात आला होता. तो असा काळ होता,जेव्हा सगळ्याच बड्या स्टार्सना अंडरवर्ल्डच्या डॉन लोकांचे धमकी देणारे फोन यायचे. शाहरुख खान हा त्यावेळी सुपरस्टार पदावर विराजमान झालाच होता,खोऱ्यानं पैसा ओढू लागला होता. मग तो अंडरवर्ल्डच्या नजरेतून कसा वाचेल. अनुपमा चोप्रा यांच्या 'किंग ऑफ बॉलीवूड-शाहरुख खान एंड द सेडक्टिव्ह वर्ल्ड ऑफ इंडियन सिनेमा' या पुस्तकात या घटनेविषयी सगळं सविस्तरपणे सांगण्यात आलं आहे.(When Shahrukh Khan gor scared with gangster abu salem continues phone calls)
त्या काळात शाहरुख सुपरस्टार पदावर आरुढ झाला होता. 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' नंतर तो जणू बॉलीवूडवर राज्य करू लागला. या दरम्यान राकेश मारिया, जे तेव्हा वरिष्ठ पोलिस अधिकारी होते,त्यांनी दिग्दर्शक महेश भट्ट यांना तातडीने बोलावणं धाडलं. त्यांना बातमी मिळाली होती की अबू सलेम शाहरुख खानला मारणार आहे. गुलशन कुमार यांच्या हत्येत सलेमच मास्टरमाइंड होता आणि निर्मात्यांकडून खंडणीची वसूली करण्यासाठी तो ओळखला जायचा. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार,अबू सलेम शाहरुखला मारणार होता कारण किंग खाननं सलेमच्या एका मित्राचा सिनेमा करण्यास नकार दिला होता. त्यासंदर्भात शाहरुखला धमकी देणारा कॉल अंडरवर्ल्डमधून तोपर्यंत आला नव्हता. जसं महेश भट्ट यांना मारियांकडून याविषयी कळलं तेव्हा ते लगेचच शाहरुखला घेऊन राकेश मारिया यांच्या कार्यालयात गेले.
त्यानंतर शाहरुखच्या कुटुंबाला घरातच राहण्याची ताकीद सुरक्षेच्या कारणास्तव दिली गेली. त्या दरम्यान शाहरुख आपली पत्नी गौरीसोबत एका क्रिकेटरच्या लग्नामध्ये सामिल होणार होता. तेव्हा एका चाहत्यानं शाहरुखचा ऑटोग्राफ घेण्यासाठी खिशातून पेन काढला पण शाहरुखला स्वतःपेक्षा बायकोच्या सुरक्षेची काळजी होती त्यामुळे त्यानं त्यावेळी घाबरुन त्या चाहत्याला धक्का दिला होता.
शाहरुख तेव्हा यश चोप्रा यांच्या 'दिल तो पागल है' सिनेमाचं शूटिंग करत होता. आणि अचानक एक दिवस त्याला अखेर अबू सलेमचा फोन आलाच. तेव्हा अबू सलेमनं शाहरुखला फोनवरनं विचारलं,'काय सुरू आहे?' तेव्हा शाहरुखला कळलं नाही कोणाचा फोन आहे. त्यानं विचारलं,'कोण बोलतंय?' पण यामुळे सलेमचा अहंकार दुखावला. आणि त्यानं शाहरुखला शिव्या देणं सुरू केलं.
शाहरुखनं गॅंगस्टर अबू सलेमला विचारलं,'शिव्या का देताय,काय अडचण आहे तुमची?' तेव्हा सलेम म्हणाला,'तू एका मुस्लिम निर्मात्याला सिनेमासाठी नाही म्हटलं आहेस, ते मला आवडलेलं नाही'. सलेम पुढे शाहरुखला म्हणाला,'तु भविष्यात मुस्लिम समाजाचं समर्थन करशील अशी मला आशा आहे'. त्यावेळी शाहरुख मंसूर खान,अब्बास मस्कान,अजीझ मिर्झा यांच्यासोबत काम करत होता. आणि त्यानं तसं सलेमला सांगितलं देखील. तेव्हा सलेम म्हणाला,' मी लोकांकडून ऐकलेलं तुझ्याविषयी तसा तू नाहीयस. मला सांगितले होते तू घमेंडी आहेस पण तू तर खूपच सज्जन आहेस. आता पोलिसांची गरज नाहीय तुला, मी नाही मारणार तुला'.
भले सलेमने शाहरुखला मारणार नाही असं कबूल केलं होतं पण तरीदेखील पोलिसांनी शाहरुखची कडक सुरक्षा हटवली नाही. त्यानंतर सलेमनं शाहरुखला अनेकदा फोन केले पण ते फोन इतरांविषयी चौकशी करण्यासाठी असायचे. तो नेहमी शाहरुखला म्हणायचा की, त्याला किंग खान केव्हा,कधी,कुठे असतो याविषयी सगळं माहित असतं. शाहरुख एकदा म्हणाला होता की,''सलेम मला म्हणायचा की तो मला पाहू शकतो. आणि ती खूप टेन्शन वाढवणारी आणि घाबरवणारी गोष्ट होती. कोणीतरी सतत आपल्यावर नजर ठेवून आहे ही गोष्ट चिंता वाढवते''.
राकेश मारिया यांनी शाहरुखला दिलेल्या सल्ल्यानुसार त्याला गॅंगस्टरशी खूप विनम्र होऊन बोलायचं होतं. कोणतीही माहिती शेअर करायची नव्हती. पण हे सतत सलेम सोबत बोलणं त्याला टेन्शन देणारं होतं. शाहरुख एकदा म्हणाला देखील होता की, ''मी इतकाही धाडसी नाही की बिनधास्त म्हणू शकेन की मी कशालाच घाबरत नाही, मी त्यावेळी प्रचंड तणावात होतो''. सलेमने कधीच शाहरुखकडे खंडणी मागितली नाही.पण तो नेहमी कलाकारांना सल्ले मात्र द्यायचा की त्यांनी कोणता सिनेमा निवडावा. एकदा शाहरुख म्हणे त्याला खूप विनम्रपणे बोलला होता की,''मी तुम्हाला कोणाला शूट कर असा जर सल्ला देत नाही तर तु्म्हीही मला मी कोणता सिनेमा करायला हवा असा सल्ला देऊ नका''. शेवटी अनेक महिने कडक सुरक्षेत राहिल्यानंतर शाहरुखनं कंटाळून सुरक्षा काढून टाकण्यास सांगितली. कारण तो पर्यंत त्याचा विश्वास बसला होता की सलेम त्याला आता मारणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.