विठ्ठल शिंदे यांची संगीतावर जबरदस्त पकड होती. त्यांनी अनेक चित्रपटांना संगीतदेखील दिले होते.
माझ्या संगीत क्षेत्रातील यशामध्ये माझे मोठे बंधू विठ्ठल शिंदे यांचा मोठा वाटा आहे. विठ्ठल शिंदे यांनीच मला गाण्याची पहिली संधी दिली. त्यांनीच माझ्यासाठी पहिला अल्बम बनवला व त्यांचीच गाणी गाऊन मला महाराष्ट्रभरात प्रसिद्धी मिळाली, माझं नाव झालं. विठ्ठल शिंदे यांच्याशिवाय आनंद शिंदे पूर्णच होऊ शकत नाही, इतकं मोठं आणि महत्त्वाचं योगदान विठ्ठल शिंदे यांचं माझ्या आयुष्यामध्ये आहे.
विठ्ठल शिंदे यांची संगीतावर जबरदस्त पकड होती. त्यांनी अनेक चित्रपटांना संगीतदेखील दिले होते. त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, सुरेश वाडकर यांच्यासारख्या अनेक दिग्गज गायकांनी गाणी गायली आहेत. स्वतः विठ्ठल दादांचा फार सुंदर गळा होता. त्यांची अनेक गीतं प्रसिद्ध आहेत. चित्रपटातील त्यांची काही गाजलेली गाणी आजही रसिकांच्या ओठावर आणि हृदयात आहेत. अशा या गुणी संगीतकार आणि गायकाचा परिसस्पर्श मला झाल्याने माझ्या आयुष्याच सोनं होणार हे निश्चित होते. त्यांच्यामुळेच माझ्या आवाजाला न्याय आणि गाण्याला धार मिळाली.
विठ्ठल दादा संगीतकार म्हणून शिस्तीचे फार कडक होते. मात्र ते स्वभावाने तेवढेच दयाळू आणि मायाळूदेखील. मी जरी गाणी गात असलो, संगीताची आवड असली तरी पुरेशी व्यावसायिक संधी मिळाली नव्हती. एके दिवशी माझ्या आईने विठ्ठल दादांना मला गाण्याची संधी देण्याची विनंती केली. तिने दादांना सरळ सांगितलं की, ‘‘आनंदला गाण्याची फार आवड आहे, गाणंही सुंदर गातो, मात्र त्याच्या बाबांचे त्याच्याकडे लक्ष नाही. ते त्याला गाण्याची संधी देतील, असे वाटत नाही. पण तू त्याला तुझ्याकडे गाण्याची संधी दे.’’ विठ्ठल दादा जरी वयाने आईपेक्षा मोठे असले तरी आईची विनंती त्यांनी मनापासून स्वीकारली आणि ज्या दिवशी मला गाण्यासाठी बोलावलं तो दिवस माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या दिवसांपैकी एक आहे.
माझी आवड आणि गाण्याचा बाज ऐकून विठ्ठल दादांनी मला लोकगीतांवर आधारित गाण्यांचा अल्बम काढायचे असे सांगितले. त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली जो माझा पहिला अल्बम ध्वनिमुद्रित झाला त्याचे नाव ‘पावणी आली लाडाला.’ गंमत म्हणजे या अल्बमची सर्व गाणी दादा म्हणजे प्रल्हाद शिंदे गाणार होते. दादांची त्या काळामध्ये प्रचंड चलती होती. ‘चंद्रभागेच्या तीरी’, ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ यांसारखी दादांची गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यामुळे विठ्ठल दादादेखील प्रल्हाद शिंदेंसोबत अल्बम बनवत होते. अशाच एका अल्बमचे काम सुरू होते. या अल्बममध्ये एकूण दहा गाणी होती. मात्र आईच्या सांगण्यावरून विठ्ठल दादांना मला गाण्याची संधी द्यायची होती. त्यामुळे त्यांनी त्या अल्बममधील दोन गाणी मला दिली, तर ८ गाणी दादांनी गायली. ‘दाट गर्दी ग सखे, पुना गाडीला’ आणि ‘दोन वर्षांची थकबाकी, झाली एकदम दोन पोरं’ ही दोन गाणी मी गायली होती. ही दोन गाणी मायबाप रसिकांना प्रचंड आवडली. त्यांनी ही दोन्ही गाणी डोक्यावर घेतली आणि आनंद शिंदे या गायकाचा उदय झाला. यानंतर विठ्ठल दादांनीच ‘शुभमंगल’च्या माध्यमातून प्रसिद्ध गायिका रंजना शिंदे यांच्यासोबत पहिला सामना करण्याची संधी दिली. ‘बंगला बांधू खंडाळा घाटात’ अशी गाणी तुफान लोकप्रिय झाली. इथूनच सामना, कव्वाली आणि माझ्या गाण्याच्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
विठ्ठल दादांनी आपल्या संगीत साजाने सजवलेल्या अल्बमने मला खऱ्या अर्थानं ओळख मिळवून दिली. आमचा हा तिसरा अल्बम होता. या अल्बममुळे माझे नाव घराघरांत पोचले. त्या अल्बममधली गाणी आजही रसिकांच्या मनावर राज्य करत आहेत. तो अल्बम होता ‘माझा नवीन पोपट’. या अल्बममध्ये मी आणि मिलिंदने गाणी गायली होती. संपूर्ण अल्बममधली गाणी रसिकांना आवडली. हा अल्बम प्रचंड हिट ठरला. यातील माझं ‘नवीन पोपट हा, लागला विठू विठू बोलायला’ या गाण्याने तर इतिहास रचला. या गाण्याविषयी सर्वांना शंका होती. हे गाणं चालेल की नाही, लोकांना आवडेल की नाही, असेही अनेकांना वाटत होते. हे गाणं अल्बममधून वगळू या, असेही काहींनी सुचवले होते. मात्र विठ्ठल दादा या गाण्यावर ठाम होते. हे गाणं चालेल, असा विश्वास त्यांना होता. इतकेच नाही तर गाणं मी गावे व हे गाणं कॅसेटमध्ये पहिलं ठेवावे हा त्यांचाच आग्रह होता. यानंतरचा इतिहास आपण सर्व जाणताच. त्यानंतर ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण आणि शैला चिखले यांच्यासोबतही माझ्या मुकाबलाच्या अनेक कॅसेट बाजारात आल्या. माझी एकामागून एक गाणी येऊ लागली. माझ्या गाण्यातील करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. यानंतरचा सुरू झालेला प्रवास आजपर्यंत सुरूच असून, याचे सर्व श्रेय विठ्ठल दादा यांनाच जाते.
माझी गाणी, माझे अल्बम जगप्रसिद्ध होत असले तरी ध्वनिमुद्रणाचा फारसा अनुभव माझ्याकडे नव्हता किंवा गाण्याचं मी शास्त्रीय प्रशिक्षणदेखील घेतले नव्हते. त्यामुळे माझ्यासाठी या सर्व गोष्टी नवीन होत्या. मात्र विठ्ठल दादांनी मला सांभाळून घेतले. ते मला सतत तालमीला बोलवायचे. अगदी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत माझी तालीम चालायची. अगदी बारा-बारा तास ते माझ्याकडून तालीम घेऊन मला तयार करायचे. कधी कधी तर मला घरी म्हणजे कल्याणला जायला ट्रेनदेखील मिळायची नाही. त्यामुळे मग प्लॅटफॉर्मवर जाऊन सकाळी चारच्या पहिल्या ट्रेनची वाट बघावी लागायची. मात्र मीही मेहनत, कष्ट घेणे सोडले नाही. विठ्ठल दादा ज्याप्रमाणे सांगायचे त्याचप्रमाणे मी गाणं शिकायचो, तालीम करायचो. त्यावेळी आजच्यासारखी ध्वनिमुद्रणाची आधुनिक व्यवस्था नव्हती. त्यावेळी लाईव्ह रेकॉर्डिंग चालायची. त्याच्यामुळे गाणं पाठ करून शंभर टक्के तयार करणे महत्त्वाचे असायचे. त्यासाठी विठ्ठल दादा माझ्याकडून एकेका गाण्याची महिना-महिना तालीम घ्यायचे. मी गाणं ध्वनिमुद्रित करीत असताना मला योग्य संकेत मिळावेत, नेमके कधी गाणे सुरू करायचे, कधी थांबायचे हे कळावे यासाठी त्यांनी माझ्यासाठी प्रसिद्ध संगीत संयोजक विलास जोगळेकर यांची नियुक्ती केली होती. कारण संगीतातले बारकावे त्यावेळी मला फारसे कळत नव्हते. त्यामुळे विलास दादा मला इशारा करायचे. त्यांच्या इशाऱ्यावरून आणि हातवारे यावरूनच मी गाणं गात असे. विठ्ठल दादा यांच्या सांगण्यावरून विलास दादांनीही माझ्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यांनी इशारा केल्याशिवाय मी गाणं गात नव्हतो. त्यामुळे विठ्ठल दादांचा आग्रह होता की, जेव्हा कधी माझं गाणं असेल तेव्हा माझ्या सोबतीला विलास दादा असायलाच हवे, त्यासाठी विलासदादांनी कधीही नकार दिला नाही.
विठ्ठल दादांचा स्वभाव प्रचंड वेगळा होता. ते जेवढे शिस्तीचे कडक होते तेवढेच हळूवार मनाचे होते. मला आठवतं, ते जेव्हा कधी भेटायचे तेव्हा नेहमीच खुश असायचे. त्यांना माझा आवाज खूप आवडायचा. त्यामुळे ते माझ्यावर खूप जीवदेखील लावायचे. ‘‘आनंदा, तुझा आवाज फार जोरदार आहे. तुझे उच्चार स्पष्ट आहेत, तू गाण्यावर दादागिरी करून जातोस, त्यामुळे गाण्याला अंतर देऊ नकोस, गाणं गात रहा’’ असं सतत सांगायचे. गाण्यातली एखादी गोष्ट मला समजत नसेल तर त्यांनी कधीही कंटाळा केला नाही. मला शंभर वेळा एखादी गोष्ट प्रेमाने समजवायचे. त्यांना हवी असणारी गोष्ट ते माझ्याकडून करून घ्यायचे. कधी कधी ते मला सांगायचे की, ‘‘आनंद तुला कधीही काही सुचले, एखादे गाणे तुझ्याकडे असले तर थेट माझ्याकडे ये, बिनधास्त बोल, आपण नक्की गाणे करू’’ असे मला सांगून माझा उत्साह वाढवायचे. माझ्याकडे गाणी असायची, मात्र त्यातील काही गाणी डबल मीनिंगची असायची. दादा हे माझे वडील बंधू असल्याने अशी डबल मीनिंगची गाणी त्याला सांगायला मला प्रचंड लाज वाटायची. मात्र विठ्ठल दादा मला नेहमी सांगायचे, ‘‘आनंदा लाजू नकोस, गाणं हे गाणं असते. तुझ्याकडे जे काही आहे ते मला बिनधास्त सांगत जा. कारण आपल्याला गाणी करायची आहेत, आपल्याला अल्बम बनवायचे आहेत, हे काम सर्व व्यावसायिक असतं. गाण्याचे काम करत असताना तू एक गायक आहेस आणि मी एक संगीतकार आहे. त्यामुळे मनात कोणताही किंतु-परंतु न ठेवता माझ्याशी तू कोणत्याही गोष्टीची चर्चा करू शकतोस,’’ अशी मोकळीक मला विठ्ठल दादांनी दिली होती. त्यामुळेच मला सुचलेली अनेक गाणी मी त्यांना सांगू शकलो. यातूनच अनेक गाणी, अनेक अल्बम तयार झाले, गाणी प्रचंड लोकप्रिय झाली, ज्यातून मी प्रसिद्ध झालो. आज जो मी काय आहे, त्याच्यात सर्वात मोठा वाटा हा विठ्ठल दादांचा आहे. माझ्या मनात त्यांच्या अनेक आठवणी आजही ताज्या आहेत. या आठवणींच्या रूपात दादा माझ्या आजही सोबत आहेत आणि पुढेदेखील कायम राहतील.
vijayaanandmusicpvtltd@gmail.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.