वैजापूर (जि.औरंगाबाद) : वैजापूर येथील तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागात कार्यरत असलेल्या गुरूजीने मद्यप्राशन करुन राडेबाजी केली. झिंगलेल्या अवस्थेत गुरूजीसह अन्य एकामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याची घटना ता.13 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास तालुक्यातील जांबरगाव येथे घडली. गुरूजीच्या या प्रतापामुळे तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सदरील शिक्षक हा उचापतीखोर असून तो नेहमीच वादग्रस्त ठरत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील जांबरगाव येथील रहिवासी व तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागात कार्यरत असलेला 'तो' शिक्षक आपल्या काही मित्रांसह 12 फेब्रुवारी रोजी गावाजवळच असलेल्या हाॅटेलमध्ये रात्रीच्या सुमारास 'श्रमपरिहार' करीत होता.
त्याचवेळी त्याच्याच गावातील तरूण तेथे जाऊन बाजूला असलेल्या टेबलवर बसला. तो बसल्यानंतर शिक्षकाचा अहंकार दुखावला गेला व त्याने त्या तरुणाला तुझी माझ्या बाजूला बसण्याची औकात आहे का ? तुला माहित आहे का? मी कोण आहे? अशी पाठोपाठ प्रश्नांची सरबत्ती करून मी तहसील कार्यालयात कार्यरत आहे. मी काहीही करू शकतो. असे म्हटल्यावर दोघांमध्ये शिव्यांची लाखोली वाहत त्यांच्यात बाचाबाची झाली. आजूबाजूला असलेल्या काही ग्राहकांनी भांडण सोडविण्यासाठी गेल्यामुळे हे प्रकरण तेथेच मिटले. परंतु दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा जांबरगावमध्ये दोघांची पुन्हा समोरासमोर गाठ पडल्यामुळे त्यांची फ्रीस्टाईल हाणामारी झाली.
दोघांनीही मद्यप्राशन केलेले होती. तुंबळ हाणामारी झाल्यामुळे गावकऱ्यांना वैजापूर पोलिसांना बोलविण्याची वेळ आली. वैजापूर पोलिस ठाण्याचे फौजदार चंपालाल चरभरे, सहायक फौजदार रज्जाक शेख यांनी जांबरगाव येथे जाऊन दोघांनाही घेऊन आले. या प्रकरणी परस्परविरोधी दिलेल्या तक्ररीवरून दोघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान येथील तहसील कार्यालयात अनागोंदी कारभार सुरू असून कुणाचे कुणावर नियंत्रण राहिले नाही. कार्यालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांची मुजोरी वाढत चालली असून वरिष्ठ अधिकारी त्यांना लगाम घालायला तयार नाहीत. हे कर्मचारी अधिकाऱ्यांच्या तोऱ्यात वावरत असतात. परिणामी सामान्य नागरिक त्यांच्या मुजोरीमुळे हवालदिल झाले आहेत.
त्या गुरूजीला अभय कुणाचे?
दरम्यान तहसील कार्यालयात प्रतिनियुक्तीवर असलेला तो शिक्षक नेहमीच वादग्रस्त ठरला आहे. नागरिकांनीही त्याच्याविरुध्द असंख्य तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केलेल्या आहेत. तक्रारी असतानाही गेल्या काही वर्षांपासून तो शिक्षक निवडणूक विभागात ठाण मांडून आहेत. तत्कालीन उपविभागीय अधिकारी डॉ. संदिपान सानप यांनी या उचापतीखोर शिक्षकाला तत्काळ कार्यालयातून कार्यमुक्त करण्याचे आदेश तत्कालीन तहसीलदार सुमन मोरे यांना दोनवेळा दिले होते.
औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा येथे क्लिक करा
परंतु उपविभागीय अधिकाऱ्यांचे हे आदेश तहसीलदारांनी धाब्यावर बसवून त्या शिक्षकाला तेथेच कार्यरत ठेवले. त्यामुळे या गुरूजीला नेमके अभय कुणाचे ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या शिक्षकाने दारू पिऊन राडेबाजी केली. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी त्याची गच्छंती करतात का? पुन्हा त्याला अभय देतात? हा प्रश्न मात्र सध्या अनुत्तरीत आहे.
संपादन - गणेश पिटेकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.