इच्छुकांनी वाढविले एमआयएमचे टेन्शन 

इच्छुकांनी वाढविले एमआयएमचे टेन्शन 
Updated on

औरंगाबाद : महापालिकेच्या मागील निवडणुकीत तब्बल २६ जागा जिंकून जोरदार कामगिरी करणाऱ्या ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाकडून यावेळीसुद्धा इच्छुक उमेदवारांच्या उड्या पडल्या आहेत. एक वॉर्डातून तब्बल दहा ते पंधरा जण इच्छुक असल्याने एक जण अंतिम करून इतर नाराजांना समजूत काढताना नेत्यांच्या नाकीनऊ येण्याची शक्यता आहे.

मागील महिन्यांत हैदराबादच्या टीमच्या उपस्थितीत इच्छुकांना अर्ज वाटप करून भरून घेण्यात आले. जवळपास ४०८ इच्छुकांनी अर्ज भरले. इच्छुकांनी अर्ज भरले तरीही एमआयएमकडे अजून जवळपास ५०० इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वॉर्डरचना अंतिम झाल्यानंतर एमआयएमकडून ७५ ते ८० वॉर्डांत उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे. या वॉर्डांत त्यांच्याकडे इच्छुकसुद्धा आहेत; मात्र जवळपास २५ ते ३० वॉर्डांत त्यांचे अस्तित्व नसून येथे इच्छुक उमेदवार नाही. जेथे इच्छुक उमेदवार आहे ते बहुतांश वॉर्ड मुस्लिम, दलित, ओबीसीबहुल आहेत.

मागील महिन्यात पक्षाकडून हैदराबादच्या टीमच्या उपस्थितीत इच्छुकांना अर्ज वाटप करून भरण्यात आले. आता लवकरच या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. यावेळी पक्षाचे संख्याबळ कसे वाढता येईल याची तयारी पक्षाकडून करण्यात येत आहे; मात्र यंदा वॉर्डाची झालेली रचना एमआयएमसाठी डोकेदुखी ठरली आहे.


दिला होता काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का 

वर्ष २०१५ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत एमआयएमने जबरदस्त कामगिरी करीत २६ जागा जिंकल्या. यापैकी बहुतांश जागा मुस्लिमबहुल होत्या. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला याचा जबर फटका बसला. काँग्रेस-राष्ट्रवादीकडील विरोधी पक्षाची जागा एमआयएमकडे गेली. आता महाविकास आघाडी होईल, असे गृहीत धरून एमआयएमची तयारी सुरू आहे. मागील काही दिवसांपासून एमआयएमचे बैठकांचे सत्र सुरू आहे. 

लोकसभा, विधानसभेत लक्षणीय मते

लोकसभा निवडणुकीत एमआयएमने औरंगाबाद मध्य व पूर्वमधून आघाडी मिळविली होती. यावेळी त्यांच्यासोबत वंचित होती; तर विधानसभा निवडणुकीत एमआयएम स्वतंत्रपणे लढली होती. औरंगाबाद मध्यमधून नासेर सिद्दिकी यांना ६८ हजार ३२५ मते मिळाली, तर पूर्वमधून डॉ. गफ्फार कादरी यांनी ८० हजार ३६ मते मिळविली होती. त्यामुळे या दोन विधानसभा मतदारसंघातील वॉर्डांवरच एमआयएमची जास्त मदार आहे; तसेच विधानसभा निवडणुकीत मध्यमधून वंचित बहुजन आघाडीच्या अमित भुईगळ यांना २७ हजार ३०२ तर औरंगाबाद पश्‍चिममधून संदीप शिरसाट यांना २५ हजार ६४९ मते मिळाली होती. त्यामुळे वंचित-एमआयएम सोबत येणार का? याकडे सर्वांच्या नजरा आहेत. 

हैदराबादच्या टीमच्या उपस्थितीत अर्ज वाटपाची प्रक्रिया झालेली आहे. आमच्याकडे अनेक वॉर्डांत इच्छुक आहेत. आता राहिला प्रश्‍न वंचित सोबत आघाडी करण्याचा तर याचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी, खासदार इम्तियाज जलील हे घेतली. आता आमची पूर्ण तयारी असून यंदा आमचे संख्याबळ वाढविण्याचा प्रयत्न करू. 
- डॉ. गफ्फार कादरी (प्रदेश कार्याध्यक्ष, एमआयएम) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.