औरंगाबाद : पाच टक्के निंबोळी अर्क हे कोणत्याही पिकावरील किडींसाठी प्राथमिक फवारणीसाठी योग्य असते. सध्या निंबोळ्या परिपक्व अवस्थेत आहेत. निंबोळी अर्काची फवारणी ही रासायनिक कीटकनाशकासारखी बाधक नसून पिकांसाठी फायदेशीर असल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. किशोर झाडे यांनी दिली.
असा करा निंबोळी अर्क
पिकलेल्या निंबोळ्या खाली पडल्यानंतर गोळा करून सावलीत वाळवून साठवणूक करा. निंबोळ्या दगडाने ठेचून घ्या, ठेचलेल्या गोडंब्या (निंबोळ्या) पावडर स्वरूपात ५ किलो घ्या. ९ लिटर पाण्यात रात्रभर भिजू द्या. नंतर १ लिटर पाण्यात दोनशे ग्रॅम वॉशिंग पावडर टाकून भिजत ठेवावे. फवारणीच्या दिवशी नऊ लिटर पाण्यात भिजत ठेवलेली भुकटी हे द्रावण गाळून घ्या. हे द्रावण व वॉशिंग पावडरचे द्रावण अशी दोन्ही द्रावणे एकत्र करून घ्या. हे दहा लिटरचे द्रावण होईल. फवारणीच्या पंपात ९ लिटर चांगले पाणी व हे द्रावण घ्या आणि पिकांवर फवारणी करा.
किडींची मोडते पिढी
हे पाच टक्के निंबोळी अर्क फवारल्याने पिकांवरील किडी नष्ट होतात. दरम्यान, फवारणी करताना काही किडी उडतात, मात्र औषधाचा काही अंश किडींवर पडल्याने अशा किडी नपुंसक होतात. त्यांना अपंगत्व येते. त्यांचे जनरेशन होत नाही. यातून कोणतेही दुष्परिणाम नसल्याचेही डॉ. झाडे यांनी सांगितले.
कडुनिंबाचाच का करायचा अर्क?
कडुनिंबाच्या झाडामध्ये असलेले ‘अझाडीरेक्टिन’ कीटकनाशकाचे काम करते. या घटकाचे प्रमाण याच्या बियांमध्ये जास्त प्रमाणात असते. मावा, अमेरिकन बोंडअळ्या, तुडतुडे, पाने पोखरणारी व देठ कुरतडणारी अळी, कोबीवरील अळ्या, फळमाशा, लिंबावरील फुलपाखरे, खोडकिडा आदी अनेक किडींवर याचा प्रभाव पडतो.
निंबोळी अर्काच्या फवारणीमुळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. सर्वप्रकारच्या पिकांवर १५ दिवसांच्या अंतराने नियमित फवारणी घेतल्यास, रसशोषक किडींच्या जीवनचक्रात अडथळा येऊन किडींचे नियंत्रण होते. महत्त्वाचे म्हणजे निंबोळी अर्क फवारणीच्या दिवशीच तयार करून वापरावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.