Renuka Kokate
Renuka Kokate

माझं लेकरु तहसीलदार झालं, हे कळलं तेव्हा मी रानात होते, मग काय इतका आनंद झाला म्हणून सांगू....

Published on

औरंगाबाद: परंडा (जि. उस्मानाबाद) हा कायम दुष्काळी असलेला तालूका. त्यातलं कुंभेजा हे साधारण हजारावर लोकसंख्या असलेलं गाव. या गावातून पहिली वर्ग एक ची अधिकारी बनलीय रेणुका जगन्नाथ कोकाटे. गुणवत्ता प्रत्येकात असते, फक्त ती सिद्ध करण्यासाठी कसरत करावी लागते, त्यासाठी काही वेळही येऊ द्यावा लागतो, अशी भावना रेणुकाने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. तर रेणुकाच्या आईने "माझं लेकरु तहसीलदार झालं, हे कळलं तेव्हा मी रानात होते, मग काय इतका आनंद झाला म्हणून सांगू"....या शब्दात त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.

आई निरक्षर असतानाही तिने शिक्षणाचं महत्त्वं जाणलं अन् त्यामुळेच आज मी तहसीलदार झाले. या शब्दात रेणुका व्यक्त होत होती. आई निरक्षर, तर बाबा दहावीपर्यंत शिकलेले. त्यातून शिक्षणाचा मार्ग काढत रेणुकाने घेतलेली भरारी २३ सदस्य असणाऱ्या आमच्या घरातील लहान मोठ्यांनाही उभारी देण्यासारखीच आहे असं तिचे काका कृषी सहायक बंडू कोकाटे यांनी सांगितले. रेणुका सांगते. मी विज्ञान शाखा असूनही मी डीएड केलं, याचं सुरवातीला वाईट वाटलेलं पण एकदा एमपीएसस्सीत रमले तर पून्हा मागे वळून पाहिलेच नाही.

संधी येतच गेली

बारावीनंतर पुण्यात डीएड करताना त्याचदरम्यान टीईटी पद्धत सुरु झालेली. त्यामुळे अभ्यास करताना स्पर्धा परिक्षेसारखाच अभ्यास करु लागल्याचे रेणुका नमूद करते. स्पर्धा परिक्षा दिल्या. आणि २०१९ मध्ये दीडच महिन्यात तब्बल चार राज्य उत्पाद शुल्क, पोलिस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक आणि नायब तहसीलदार पदांवर विविध पदांवर निवड झाली होती. सध्या रेणुका बीड जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार पदावर कार्यरत आहे.

गावातच झाले प्राथमिक शिक्षण

रेणुकाचे चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण गावातच (कुंभेजा) झाले. ११ वी १२ वी महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे केले. त्यानंतर पुण्यातील पार्वतीबाई अध्यापिका विद्यालयात डीएड केले. तिने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी घेतली. डीएड करत असताना स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरु केला होता.

आपल्यातही गुणवत्ता आहे, ती ओळखता यायला हवं, मग सगळेच मार्ग सुकर होतात. माझंही तेच झालं, ध्येच निश्‍चित केलं होतं. ते मिळविण्यासाठीची धडपड स्वस्थ बसू देत नव्हती. आईबाबांच्या पाठिंब्याशिवाय इथपर्यंत पोहचणं शक्यत नव्हतं.
- रेणुका कोकाटे

माझं लेकरु आज तहसीलदार झालं, हे ऐकून खूप आनंद झाला. ही वार्ता कळली तेव्हा रानात तुर लागवड करत होते. आपल्या लेकरांसोबत असणं हे त्यांच्यासाठी खूप बळ देणारं असतं आणि एक आई म्हणून मीही नेहमी तिच्यासोबत राहिले. शेतकऱ्यांची मुलगी तहसीलदार होते याची खुप खुशी आहे.
- लताबाई कोकाटे, रेणूकाची आई.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.