वृक्षलागवडीचा ‘रामपुरी पॅटर्न’ आता संपूर्ण जिल्ह्यात

lagwad
lagwad
Updated on

परभणी ः रामपुरी बु (ता.मानवत) या गावातील युवकांनी लोकसहभागातून चळवळ राबवत वृक्ष लागवड व संगोपन करुन गावाला हरित केले आहे. त्यामुळे हा पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. त्यासाठी ता.एक ते ३१ जुलै दरम्यान हरित ग्राम सामाजिक दायित्व अभियान सुरू करणार आहे.

राज्यात वृक्षलागवडीचा कार्यक्रम सर्वत्र सुरू आहे. अशा कार्यक्रमांसाठी लोकसहभाग व लोकप्रबोधन महत्वाचे आहे. रामपुरी बु (ता.मानवत) या गावातील युवकांनी व नागरिकांनी एकत्र येऊन सन २०१७ पासून लोकसहभागातून वृक्षलागवड केली आहे. त्यासाठी सामाजिक दायित्व ही संकल्पना राबविल्याने लावलेल्या वृक्षांचे संगोपन होऊन सद्यस्थितीला गाव हरित झाले आहे. तोच आदर्श समोर ठेवुन संपूर्ण परभणी जिल्हा हरित करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्विराज बी.पी. व पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्या पुढाकारातून लोकांना प्रेरीत करण्यासाठी लोकप्रतिनिधी, नागरिक, युवक, अधिकारी, कर्मचारी यांचा सक्रीय
सहभाग वाढाविण्यासाठी रामपुरी पॅटर्ननुसार सामाजिक दायित्व व वृक्ष पालकत्व यांची सांगड घालुन हरित ग्राम सामाजिक दायित्व अभियान ता.एक जुलै ते ३१ जुलै दरम्यान राबवले जाणार आहे. त्यासाठी ‘हरित गाव, माझे दायित्व’ हे घोषवाक्य दिले आहे.

ही आहेत उदिष्ठे
वृक्ष लागवड व संगोपनाचे महत्व रुजविणे व जागृती करणे, लोकप्रतिनिधी, नागरिक, युवक, अधिकारी, कर्मचारी यांचा सक्रीय सहभाग वाढवणे, पर्यावरणविषयी अभ्यासवृत्ती व संदेश वाहक ग्रामस्तरावर निर्माण करणे, लागवड व संगोपन कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने काम करणे, वृक्षदाता व वृक्षपालक यांची सांगड घालुन मानवी स्वारस्याची साखरी निर्माण करणे

अशी असेल वृक्षलागवड
अंगणवाडी-चिकु, संत्रा, मोसंबी, शेवगा
रस्त्याच्या कडेला-कडुलिंब, करंज, अमलतास, वड, पिंपळ
शेताच्या बांधावर-बांबु, हतगा, शेवगा, शेवरी, तुती
देवालय,मंदिर-वड, उंबर, बेल, आपटा, चाफा
शोभेची झाडे-गुलमोहर, अशोक, सरु, बदाम


असे असेल दायित्व
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, उपाध्यक्षा,सभापती -१५, सदस्य-दहा, पंचायत समिती सभापती -दहा, सदस्य-पाच, सरपंच -पाच, सदस्य -एक, उपसमिती सदस्य-एक, मुख्य कार्यकारी अधिकारी-१५, विभागप्रमुख-दहा, गटविकास अधिकारी-दहा, सहायक गटविकास अधिकारी-पाच, विस्तार अधिकारी सर्व-पाच, ग्रामसेवक-पाच, ग्रामपंचायत कर्मचारी-एक याप्रमाणे वृक्षलागवड संगोपन दायित्व राहणार आहे. तसेच अन्य कुठल्याही क्षेत्रातील व्यक्ती, सामान्य नागरिक यामध्ये सहभागी होऊ शकतात.

शाळा, आरोग्य केंद्रात होणार लागवड
जिल्ह्यातील सर्व शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी केंद्र आदी ठिकाणी दायित्व वाटप करून वृक्षलागवड होणार आहे. त्यासाठी आरोग्य अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, आरोग्य कर्मचारी यांना दायित्व दिले जाणार आहे. दायित्व घेतलेल्या वृक्षपालकांनी उपलब्ध करुन दिलेले वृक्षरोप व ट्रिगार्ड याचा वापर करून वृक्ष लागवड व संगोपन करावे लागणार आहे.


सर्वांचा सहभाग महत्वाचा
रामपुरी येथील वृक्षवल्ली फाऊंडेशनच्या माध्यमातून वृक्षचळवळ उभी राहिली आहे. तोच पॅटर्न आता संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यासाठी सिईओ पृथ्विराज बी.पी. यांच्या नेतृत्वाखाली या अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. हे अभियान प्रत्येकासाठी असून सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे.
- ओमप्रकाश यादव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, परभणी. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.